Panvel Corporation's plastic ban on paper? | पनवेल महानगरपालिकेची प्लास्टिक बंदी कागदावरच ?

वैभव गायकर 
पनवेल : पनवेल महानगरपालिकेने पर्यावरणावर आघात करणा-या प्लास्टिक पिशव्या नष्ट करण्यासाठी पालिका क्षेत्रात प्लास्टिकबंदी केली. विशेष म्हणजे, अशाप्रकारे प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालणारी राज्यातील पहिली महानगरपालिका होण्याचा मान पनवेल महानगरपालिकेने मिळविला. प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाºया दुकानदार, फेरीवाल्यांवर वचक ठेवण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने विशेष मोहीम राबवत तीन टनांपेक्षा जास्त प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. मात्र, काही दिवसांपासून प्लास्टिक पिशव्यांवर कारवाईची मोहीम थंडावल्याने पनवेल महानगरपालिका क्षेत्रात खुलेआम प्लास्टिक पिशव्यांची विक्री होत आहे.
२ आॅक्टोबर रोजी पालिकेने किरकोळ व्यापाºयांमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीवर आणि वापरावर संपूर्ण बंदी घातली. विशेष म्हणजे, राज्यभर ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीवर बंदी असताना, पनवेल महानगरपालिकेने सर्वच प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीवर बंदी घातल्याने अशाप्रकारे बंदी घालणारी राज्यातील पनवेल महानगरपालिका पहिलीच महानगरपालिका असल्याचा दावा आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. मात्र, डिसेंबर महिन्यात प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाºया दुकानदार, फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम थंडावल्याने सर्वत्र सर्रास विक्री सुरू आहे.
>घरोघरी कापडी पिशवी वितरित कधी होणार -
प्लास्टिक पिशव्यांवर बंदीनंतर घरोघरी कापडी पिशव्या वाटप केल्या जातील, असे पालिकेने सांगितले होते. महापौर डॉ. कविता चौतमोल यांनीही अशाप्रकारे घरोघरी प्लास्टिक पिशव्या वितरण करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र, बंदीनंतर तीन महिने उलटूनही अद्याप घरोघरी कापडी पिशव्या वितरित करण्यात आलेल्या नाहीत.
<पालिकेच्या मार्फत प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले गेले नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.
>पाळेमुळे भिवंडी-उल्हासनगरात :
५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालूनही अशा पिशव्यांची निर्मिती केली जाते. भिवंडी, उल्हासनगरात अशा प्लास्टिक पिशव्यांच्या निर्मितीचे अनधिकृत कारखाने असल्याने या ठिकाणाहून पनवेलमध्ये प्लास्टिक पिशव्यांची विक्री केली जात आहे.
>पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विभागीय अधीक्षकांवर कारवाईची जबाबदारी देऊन पालिका प्रशासन मोकळे झाले आहे. मात्र, दुकानदार, फेरीवाल्यांचे यामुळे चांगलेच फावल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, कारवाईकरिता सक्षम यंत्रणा नसल्याने पालिकेच्या प्लास्टिकबंदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
>सर्वप्रथम नागरिकांनी दुकानदारांकडून पिशव्या खरेदी करणे बंद केले पाहिजे. मनुष्यबळ कमी असल्याने प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई करीत वेगळे पथक नेमले नाही. प्लास्टिक पिशव्यांची विक्री होत असेल, तर पालिकेच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी.
- संध्या बावनकुळे, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका
>शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांची विक्री सुरू आहे. दुकानदारांना पालिकेची भीती राहिली नाही. नागरिकांच्या तक्रारीची वाट न पाहता, पालिकेने प्लास्टिक पिशव्या जप्तीची
मोहीम जोरदारपणे राबविण्याची गरज आहे.
-वैशाली ठाकूर,
रहिवासी, मुर्बीगाव, खारघर
>पनवेल महानगरपालिकेने प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीचा निर्णय चांगला घेतला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी योग्य दिशेने होताना दिसून येत नाही. पालिका हद्दीत दाखल होणाºया पिशव्या कोणाच्या मार्फत या ठिकाणी पुरविल्या जातात, त्यांच्यावरही कारवाई केल्यास पालिका हद्दीत प्लास्टिक विक्री होणार नाही.
- बीना गोगरी, अध्यक्ष, शाश्वत फाउंडेशन