एनएमएमटीने थकविले इंधनाचे पाच कोटी; थकबाकी वाढल्यास गॅसपुरवठा बंद होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:20 AM2019-02-10T00:20:11+5:302019-02-10T00:20:20+5:30

महानगरपालिका परिवहन उपक्रम (एनएमएमटी)चा तोटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. इंधनाचे पैसेही वेळेत देणे शक्य होत नाही. महानगर गॅसचे जवळपास चार कोटी ९२ लाख रुपये थकले असून, विलंब शुल्कासह थकबाकी देण्याची मागणी कंपनीने केली आहे.

 NMMT consumes five million tired fuel; Likely to stop gas supply if the outstanding increase | एनएमएमटीने थकविले इंधनाचे पाच कोटी; थकबाकी वाढल्यास गॅसपुरवठा बंद होण्याची शक्यता

एनएमएमटीने थकविले इंधनाचे पाच कोटी; थकबाकी वाढल्यास गॅसपुरवठा बंद होण्याची शक्यता

Next

नवी मुंबई : महानगरपालिका परिवहन उपक्रम (एनएमएमटी)चा तोटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. इंधनाचे पैसेही वेळेत देणे शक्य होत नाही. महानगर गॅसचे जवळपास चार कोटी ९२ लाख रुपये थकले असून, विलंब शुल्कासह थकबाकी देण्याची मागणी कंपनीने केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाने २०१९-२० वर्षासाठी ३०५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा करण्यात आली. २५ नवीन बसेस खरेदी करणे, तुर्भेमध्ये प्रशासकीय इमारत उभारण्यासह अनेक योजनांचा समावेश केला आहे; परंतु प्रत्यक्षात मात्र एनएमएमटीची स्थिती बिकट होत चालली आहे. जून २०१८ पासून परिवहनचा तोटा प्रमाणापेक्षा जास्त वाढत चालला आहे. इंधनाच्या दरामध्ये वाढ होत आहे. अवैध प्रवासी वाहतूक व इतर कारणांमुळे उत्पन्नावर परिणाम होत आहे. सद्यस्थितीमध्ये उपक्रमाच्या ताफ्यात ४७७ बसेस आहेत. यामधील जवळपास १३० बसेस गॅसवर चालत आहेत. या बसेससाठी रोज ८२०० किलो गॅसची गरज आहे. साधारणत: सरासरी चार लाख रुपये गॅस खरेदीसाठी लागत आहेत. तुर्भे डेपोमध्ये गॅस भरण्यासाठीचे केंद्र उभारण्यात आले आहे. गॅस भरल्यानंतर साधारणत: १५ दिवसांमध्ये पैसे देणे आवश्यक आहे; पण एनएमएमटीची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे जुलै महिन्यापासून गॅसचे बिल वेळेत देणे शक्य होत नाही. थकबाकीची रक्कम दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महानगर गॅस कंपनीच्या व्यवस्थापनानेही एनएमएमटीला पत्र देऊन थकीत रक्कम वेळेत भरण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
गॅस कंपनीने २० नोव्हेंबरला एनएमएमटीच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्याला पत्र दिले होते. त्या पत्रामध्ये जुलै २०१८ पासून १५ नोव्हेंबरपर्यंत पाच महिन्यांचे चार कोटी ९२ लाख रुपये बिल झाले असून ते लवकरात लवकर जमा करावे, असे कळविले होते.
या बिलामध्ये वेळेत बिल भरणा केला नसल्यामुळे विलंब शुल्क चार कोटी ६१ लाख रुपये आकारले आहे. एकूण नऊ कोटी ५४ लाख रुपयांची मागणी केली आहे. नवी मुंबईचा देशातील श्रीमंत महानगरपालिकांमध्ये समावेश होतो. तीन हजार कोटी रुपयांच्या मुदत ठेवी महापालिकेने केल्या आहेत; परंतु दुसरीकडे महापालिकेच्याच परिवहन उपक्रमाला बसच्या इंधनाचे पैसे वेळेत भरता येत नाहीत.
एनएमएमटीचे पदाधिकारीही तोटा वाढत चालला असल्याचे मान्य करू लागले आहेत. गॅसची बिले वेळेत भरली नाहीत, तर संबंधित कंपनीकडून इंधन पुरवठा बंद होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
परिवहन उपक्रमाने नुकतेच दीड कोटीचे बिल कंपनीला दिल्याची माहिती अधिकाºयांनी दिली असून उर्वरित पैसे लवकर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

महानगरपालिकेची नामुष्की
नवी मुंबई महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. तीन हजार कोटींपेक्षा जास्त बचत ठेवी असून एमएमआरडीएचे काही दीर्घ मुदतीचे कर्जही एकरकमी फेडण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. अशा स्थितीमध्ये एनएमएमटीला इंधनाचे पैसेही वेळेत भरता येत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. ही महानगरपालिकेची नामुष्की असल्याचे बोलले जात आहे. चार ते पाच महिन्यांचे बिलही प्रलंबित राहात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

एनएमएमटीला प्रत्येक महिन्याला साधारणत: सव्वा कोटी रुपयांचा गॅस लागतो. या महिन्यामध्ये गॅस कंपनीचे दीड कोटी रुपये दिले असून, तीन कोटी रुपये शिल्लक असून ते देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- रामचंद्र दळवी,
सभापती, एनएमएमटी

परिवहनच्या बसेससाठी घेतलेल्या इंधनाचे दीड कोटी रुपये नुकतेच दिले आहेत. इंधनाचे पैसे मुदतीमध्ये भरण्यात येतात. सद्यस्थितीमध्ये शिल्लक रक्कमही त्याप्रमाणे भरली जाणार असून त्याविषयी काही समस्या नाही.
- नीलेश नलावडे,
मुख्य लेखा व वित्त अधिकारी, एनएमएमटी

Web Title:  NMMT consumes five million tired fuel; Likely to stop gas supply if the outstanding increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.