नामदेव मोरे
नवी मुंबई : राष्ट्रवादीकडून सत्ता हिसकावून घेण्याची वल्गना करणा-या शिवसेनेला दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले. अर्ज भरताना तटस्थ राहून व मतदानावर बहिष्कार टाकून भाजपानेही सेनेला धक्का दिला. अडीच वर्षे किंगमेकर राहिलेल्या काँगे्रसला उपमहापौरपद मिळाले असले तरी पक्षातील बंडखोरी थांबविण्यास पक्षश्रेष्ठींना अपयश आले. गणेश नाईक यांनी विरोधकांचे सर्व मनसुबे उधळून महापालिकेवर पुन्हा राष्ट्रवादीचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे.
नवी मुंबई महापालिकेवर पुढील महापौर शिवसेनेचाच असा विश्वास युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला होता. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली होती. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना उमेदवारी देवून राष्ट्रवादीचे जवळपास १२ नगरसेवक फोडण्याची तयारी केली होती. दोन महिन्यांपासून राष्ट्रवादीचे किती व कोण नगरसेवक फोडले याविषयी शिवसेना नेते जाहीर वल्गना करू लागले होते. राष्ट्रवादीमध्ये फूट पाडायची, भाजपाचे सहा, अपक्ष व काँगे्रसच्या दहा नगरसेवकांच्या मतांवर पालिकेवर सत्ता मिळविण्याची रणनीती आखली होती. राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांना जबर धक्का देण्याचा संकल्प अनेकांनी केला. राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते गणेश नाईक यांनी मात्र निवडणुकीपर्यंत शांत असल्याचे दाखवून राजकीय डावपेचामध्ये एकाच वेळी सर्व विरोधकांचे मनसुबे पूर्णपणे उधळून लावले. पहिल्यांदा महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही थेट मदत घेण्यात आली. पवार यांनी राजकीय वजन वापरल्यामुळे काँग्रेस नेत्यांनी आघाडी कायम ठेवली व भाजपाने तटस्थ राहून राष्ट्रवादीचा विजय सुकर केला. मुख्यमंत्र्यांनी स्वत: विजय चौगुले यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
निवडणुकीपूर्वी दोन महिने राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडणार असल्याचे बोलले जात होते. परंतु प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे एकही मत फुटले नाही. पाचही अपक्ष त्यांच्यासोबत राहिले. महापौर पदाच्या उमेदवाराला काँगे्रसच्याही सर्व दहा नगरसेवकांनी मतदान केले. दुसरीकडे उपमहापौर पदासाठी काँगे्रसमध्येच बंडखोरी झाली. जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांच्या पत्नी वैजयंती भगत यांनी उमेदवारी कायम ठेवली. त्यांना फक्त तीन मतांवर समाधान मानावे लागले. भाजपाने निवडणुकीवरच बहिष्कार टाकला. या निवडणुकीमध्ये काँगे्रस, भाजपा व शिवसेना सर्वच पक्षांवर राजकीय मात करण्यात राष्ट्रवादीचे नेते यशस्वी झाले आहेत. नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

शिवसेनेचा शेवटपर्यंत संभ्रम
पालिकेवर भगवा फडकविण्याच्या वल्गना करणाºया शिवसेनेला दणदणीत पराभवास सामोरे जावे लागले. विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करून भाजपानेही सेनेची कोंडी केली. उपमहापौरपदासाठी माघार घेवून काँगे्रस बंडखोरांना पाठिंबा द्यायचा का याविषयी निर्णयही शेवटच्या क्षणापर्यंत होवू शकला नाही. पालकमंत्री एकनाथ शिंदे शेवटपर्यंत नगरसेवकांच्या संपर्कात होते. परंतु कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याने अखेर महापौरपदासाठी पक्षाच्या उमेदवाराला मतदान करून सेनेच्या नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर जाणे पसंत केले.

मुख्यालयाबाहेर जल्लोष
निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी तसेच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यालयाबाहेर जल्लोष केला. महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आल्याने याचा आनंद याठिकाणी साजरा करण्यात आला. महापौर आणि उपमहापौर पदाच्या विजयी उमेदवारांची घोषणा करताच शुभचिंतकांनी शुभेच्छा देण्यासाठी मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

राष्ट्रवादीचा ड्रेसकोड
राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाºयांनी एका रंगाच्या साड्या आणि फेटे तर नगरसेवकांनी फेटे परिधान केले होते. विजयाच्या आत्मविश्वासानेच पक्षाच्या पदाधिकाºयांनी पूर्वतयारी केल्याचे पाहायला मिळाले. विजयाचे चिन्ह दाखवतच या पदाधिकाºयांनी मुख्यालयात प्रवेश केला.

मोबाइलवर नेत्यांशी संपर्क
महापौर व उपमहापौर निवडणुकीदरम्यान सभागृहात मोबाइलचा वापर करण्यास बंदी घालणे आवश्यक होते. जुन्या मुख्यालयामध्ये जामर बसविण्यात येत होता. परंतु तशाप्रकारे काहीही उपाययोजना नसल्याने निवडणुकीदरम्यान बिनधास्तपणे नगरसेवक मोबाइलवर नेत्यांशी संपर्क साधत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.
विरोधकांकडून
शुभेच्छाही नाहीत
निवडणुकीसाठीचे मतदान झाल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी तत्काळ सभागृहाबाहेर जाणे पसंत केले. नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांना शुभेच्छा देण्यासाठीही विरोधक थांबले नाहीत. यामुळे प्रेक्षागृहातील उपस्थितांनीही नाराजी व्यक्त केली.

अनुभवी महापौर
महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक जयवंत सुतार यांची निवड झाली. १९९५ पासून चार वेळा ते महापालिकेवर निवडून आले आहेत. सर्वाधिक वेळा सभागृह नेते म्हणून त्यांनी काम पाहिले असून एकवेळ स्थायी समितीचे सभापतीपदही भूषविले आहे. गणेश नाईक यांचे विश्वासू ज्येष्ठ नगरसेवक असल्यामुळेच महापौर पदासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

१९९५ पासूनचे
महापौर
संजीव गणेश नाईक
सुषमा प्रमोद दंडे
दशरथ तथा चंदू राणे
विजया विनायक म्हात्रे
तुकाराम रामचंद्र नाईक
संजीव गणेश नाईक
संजीव गणेश नाईक
मनीषा शशिकांत भोईर
अंजनी प्रभाकर भोईर
सागर ज्ञानेश्वर नाईक
सुधाकर संभाजी सोनावणे
उपमहापौर
सुलोचना महादेव पाडळे
सावित्री रामनाथ पाटील
गोपीनाथ शंकर ठाकूर
माधुरी मधुकर परब
भोलानाथ रामदास पाटील
अनिल कौशिक
रमाकांत नारायण म्हात्रे
भरत सहादू नखाते
शशिकांत बिराजदार
भरत सहादू नखाते
अशोक अंकुश गावडे
अविनाश शांताराम लाड
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.