नवी मुंबई : बालकामधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. ‘मिशन इंद्रधनुष्य’ मोहिमेकरिता नमुंमपा कार्यक्षेत्रातील ९,१४,६११ लोकसंख्येमध्ये सर्वेक्षण करण्यात आले असून २,७१,६६८ घरांमध्ये सर्व्हे करण्यात आला आहे. तसेच ८६ बाह्यसत्र आणि ३ मोबाइल, असे एकूण ८९ विशेष मिशन इंद्रधनुष्यची सत्रे वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत दोन वर्षांपर्यंतच्या ३५५६ मुले व ८३१ गरोदर माता अशा एकंदर ४३८७ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे.
नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, अर्धवट लसीकरण झालेले तसेच लसीकरण न झालेली बालके, ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. यास्तव या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करायचे आहे. याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समिती स्थापन केली असून, सदर मोहिमेमध्ये दोन वर्षे वयोगटातील बालके व गरोदर माता ज्यांना राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकाप्रमाणे यापूर्वी देय असलेल्या सर्व लसींची मात्रा मिळालेली नाही, अथवा लसीकरण न घेतलेल्या बालकांना व गरोदर मातांना लसीकरण करण्यात येणार आहे.
यासाठी आवश्यक मनुष्यबळ, लस, सर्व तयारी करण्यात आली असून, जनतेमध्ये जनजागृतीकरिता भित्तीपत्रके, हस्तपत्रके, बॅनर, पताका, होर्डिंगच्या माध्यमातून प्रसिद्धी करण्यात आली आहे. प्रत्येक लाभार्थीला दिवाळीच्या शुभेच्छांसहित लसीकरणाची आठवण करून देण्याकरिता भेटकार्ड दिले जाणार आहे. तरी सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संस्था, सर्व राजकीय पक्ष, संघटना, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, बालरोगतज्ज्ञ, सार्वजनिक मंडळे, महाविद्यालये, शिक्षण संस्था यांनी सदर राष्ट्रीय अभियानाअंतर्गत बालके आणि गरोदर माता यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे व ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे व महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले आहे.