म्हात्रे-नाहटा वाद युतीच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:47 PM2019-03-15T23:47:21+5:302019-03-15T23:47:47+5:30

शिवसेनेतही गटबाजी, राजन विचारेंची होणार कसरत; आनंद परांजपेंची नाईक कुटुंबीयांवर मदार

Mhatre-Nahata Debate | म्हात्रे-नाहटा वाद युतीच्या मुळावर

म्हात्रे-नाहटा वाद युतीच्या मुळावर

Next

- कमलाकर कांबळे

ठाणे लोकसभा क्षेत्रात सहापैकी विधानसभेचे ऐरोली आणि बेलापूर हे दोन मतदारसंघ नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मोडतात. या दोन्ही मतदारसंघांत राष्ट्रवादीचा बोलबोला असला, तरी मोदीलाटेत बेलापूरचा किल्ला मात्र भाजपाने सर केला. निवडणुकीच्या ऐन तोंडावर कार्यकर्त्यांचे कोणतेही पाठबळ नसताना भाजपात डेरेदाखल झालेल्या मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांचा अवघ्या दीड हजार मतांनी पराभव केला. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विजय नाहटा तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. असे असले तरी नाहटा यांना मिळालेल्या मतांच्या आधारे होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीचे गणित मांडले, तर राजन विचारे यांना मतांची आघाडी सोपी वाटते. परंतु, आमदार मंदा म्हात्रे आणि विजय नाहटा यांच्यातील वाद युतीचे उमेदवार राजन विचारे यांच्या मुळावर बेतण्याची शक्यता आहे.

लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत राजन विचारे यांनी राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांचा जवळपास दोन लाख मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत विचारे यांना बेलापूर मतदारसंघातून तब्बल २५ हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर, लगेच झालेल्या परंतु सेना व भाजपाने स्वतंत्र लढलेल्या विधानसभा निवडणुकीत सेनेचे विजय नाहटा यांना ५०,९८३ मते पडली होती, तर नाईक यांच्यापेक्षा अवघ्या दीड हजार मताधिक्यांनी विजयी झालेल्या मंदा म्हात्रे यांना ५५,३१६ इतकी मते मिळाली होती. आता या लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपाची युती आहे. त्यामुळे सेना आणि भाजपाची एकगठ्ठा मते मिळाल्यास विचारे यांचा मार्ग सुकर होणार आहे. मात्र, आमदार म्हात्रे आणि नाहटा यांच्यातील वादाचा फटका विचारे यांना बसण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या ईटीसी केंद्राच्या चौकशीच्या मुद्यावरून मंदा म्हात्रे व नाहटा यांच्यात बेबनाव निर्माण झाला. तो आजतागायत कायम आहे. विशेष म्हणजे या वादात विचारे यांनी नाहटा यांना झुकते माप दिल्याने म्हात्रे त्यांच्यावर नाराज आहेत. शिवाय, नाहटा यांनी मागील वर्षभरापासून पुन्हा बेलापूरमधून पुन्हा विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मतदारसंघातील अनेक कामांच्या श्रेयावरून युतीच्या या दोन नेत्यांत संघर्षमय स्थिती निर्माण झाली आहे. या संघर्षाची झळ विचारे यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. बेलापूर क्षेत्रात भाजपाचे केवळ चार नगरसेवक आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत हे महापालिकेचे नगरसेवक आहेत. मागील चार वर्षांत पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. मंदा म्हात्रे यांनी वैयक्तिक पातळीवर आपला मतदारसंघ हलता ठेवला आहे. त्याचा विचारे यांना किती फायदा होईल, हे काळच ठरवेल. शिवसेनेची अवस्थासुद्धा फारशी वेगळी नाही. शिवसेनेचे उभे दोन गट पडले आहेत. एका गटाचे नेतृत्व विजय नाहटा यांच्याकडे आहे. बेलापूर विधानसभा क्षेत्रात सेनेचे १४ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी नाहटा यांना मानणारे किती नगरसेवक आहेत, याबाबतसुद्धा संभ्रम आहे. म्हात्रे व नाहटा यांच्यातील वाद, शिवसेनेतील गटबाजी, त्यामुळे कार्यकर्त्यांत निर्माण झालेला संभ्रम अशा परिस्थितीत बेलापूरमधून मतांची आघाडी घेताना विचारे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
लोकसभेच्या बेलापूर विधानसभा क्षेत्राचे राजकीयस्तरावर वेगळे महत्त्व आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर भाजपात दाखल झालेल्या मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांचा याच मतदारसंघातून पराभव केला होता. पराभव निसटता असला, तरी तो नाईकांच्या जिव्हारी लागला. याचा परिणाम म्हणून मागील साडेचार वर्षे नाईक यांनी बेलापूर मतदारसंघाकडे पाठ फिरवली. महापालिका निवडणुकीत त्यांना अपेक्षित यश मिळाले. त्यानंतर, मात्र त्यांचा सर्वसामान्यांबरोबरच संवाद संपला. गाठीभेटींना पूर्णविराम मिळाला. परिणामी, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. त्यांना भेटायचे किंवा बोलायचे असेल, तर आजही पहिल्यांदा पांडुरंगाचा धावा करावा लागतो. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांची सर्व मदार नाईक कुटुंबीयांवर आहे. ही वस्तुस्थिती असली, तरी विद्यमान परिस्थितीत परांजपे यांना बेलापूर विधानसभा क्षेत्रात मतांचा जोगवा मागताना घाम गाळावा लागणार आहे.

काँग्रेसची भूमिका महत्त्वाची
विधानसभेच्या बेलापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे २८, तर काँग्रेसचे सात नगरसेवक आहे. शिवाय,महापालिकेतील सत्तेत काँग्रेस भागीदार आहे. काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळल्यास परांजपे यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मतदारांत नाराजी
राजन विचारे यांनी आपल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात बेलापूर विधानसभा क्षेत्राकडे दुर्लक्ष केले. कोणत्याही नव्या योजना राबवल्या नाहीत. सार्वजनिक कार्यक्रमालासुद्धा फारसे फिरकले नाहीत. याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे.
मागील निवडणुकीतील मतांचा गोषवारा
लोकसभेच्या मागील निवडणुकीत राजन विजारे यांना बेलापूर मतदारसंघातून ९०,९८६ मते पडली होती, तर राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांना ६५,२०२ मतांवर समाधान मानावे लागले होते. या मतदारसंघातून विचारे यांनी २५,७८४ मतांची आघाडी घेतली होती. याच मतदारसंघातून आपच्या उमेदवाराला जवळपास साडेआठ हजार मते मिळाली होती, तर मनसेचे अभिजित पानसे यांना ५४१८ मते पडली होती.

Web Title: Mhatre-Nahata Debate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.