MDC's old headquarters became warehouse, dissatisfaction with administration's apathy | एमआयडीसीचे जुने मुख्यालय झाले गोदाम, प्रशासनाच्या उदासीनतेविषयी असंतोष
एमआयडीसीचे जुने मुख्यालय झाले गोदाम, प्रशासनाच्या उदासीनतेविषयी असंतोष

- नामदेव मोरे
नवी मुंबई : एमआयडीसीच्या जुन्या मुख्यालय परिसराचे भंगार गोदाम झाले आहे. सर्वत्र कचºयाचे साम्राज्य निर्माण झाले असून, कर्मचारी वसाहतीमधील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियानालाही प्रशासनाने हरताळ फासला असून, अतिक्रमण कारवाईमध्ये जप्त केलेल्या वस्तूही याच परिसरामध्ये ठेवल्या आहेत.
एमआयडीसी प्रशासनाने महापेमध्ये भव्य प्रशासकीय इमारत उभारली असून सर्व कार्यालये नवीन इमारतीमध्ये स्थलांतर केली आहेत. जुन्या मुख्यालयाचा वापर बंद करून परिसरामध्ये भंगार साहित्य ठेवण्यास सुरुवात केली आहे. कर्मचारी वसाहतीच्या समोरच लोखंडी पाइप व अतिक्रमण विभागाने कारवाई केलेले साहित्य ठेवण्यास सुरुवात केली आहे. सर्वत्र कचºयाचे ढिगारे तयार झाले आहेत. आवारामध्ये कचरा कुंड्याही ठेवलेल्या नाहीत. एका कोपºयामध्ये कचरा टाकला जात आहे. वृक्षांच्या पाला-पाचोळ्याचे ढीगही तयार झाले आहेत. जुनी कार्यालये बंद केली आहेत. प्रसाधनगृह व काही खोल्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. कचरा व भंगाराच्या ढिगाºयामुळे कर्मचारी वसाहतीमध्ये राहणाºया नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डासांचा उपद्रव वाढला असून रात्री पाच मिनिटेही घराबाहेर थांबणे शक्य होत नाही. दिवस मावळला की दारे, खिडक्या बंद करून घ्याव्या लागत आहेत. येथील कर्मचाºयांनी व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी एमआयडीसी प्रशासनाकडे वारंवार लेखी अर्ज केले आहेत, परंतु या अर्जांवर काहीही कार्यवाही केलेली नाही. कर्मचाºयांना घरे खाली करण्यासाठी हे षड्यंत्र सुरू आहे का, असा संशय निर्माण होवू लागला आहे.
एमआयडीसी मुख्यालयामध्ये कामानिमित्त अनेक उद्योजक येत असतात. समोरच अंबानी समूहाचे डीएकेसी हे मुख्यालय आहे. ठाणे-बेलापूर रोड व शिळ फाटा रोडवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. महापालिका मुख्यालयासमोरच्या महत्त्वाच्या भूखंडावर पडलेले भंगार पाहून सर्वांनीच नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. महापालिका स्वत:च्या मुख्यालयासमोरील भूखंडाचे सुशोभीकरण करू शकत नसेल तर एमआयडीसीमध्ये चांगल्या सुविधा कशा देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अतिक्रमण विभागाने एमआयडीसी परिसरातील अनेक मंदिरांवर कारवाई केली आहे. कारवाईनंतर देवी, देवतांच्या मूर्तीही जुन्या मुख्यालय परिसरामध्ये अस्ताव्यस्त स्वरूपात ठेवल्या आहेत. यामुळेही नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने नवीन मुख्यालयाला संरक्षण भिंत बांधून त्याची रंगरंगोटी केली आहे. पण जुन्या मुख्यालयाची मोडकळीस आलेली संरक्षण भिंत दुरुस्तही केली जात नाही व त्या भिंतीला साधा चुनाही लावण्यात आलेला नाही. यामुळे उद्योजकांसह नागरिकांनीही एमआयडीसी प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

एमआयडीसी जुन्या मुख्यालय परिसराची प्रचंड दुरवस्था झाली आहे. कर्मचारी वसाहतीमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील सर्व भंगार हटवून परिसराचे सुशोभीकरण करण्याची मागणी उद्योग मंत्र्यांकडे करणार आहोत.
- महेश कोठीवाले,
शिवसेना शाखा प्रमुख
भंगार व कचºयामुळे परिसराची दुरवस्था झाली आहे. डासांचे प्रमाण वाढल्यामुळे आमचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार पत्र देवूनही प्रशासन दखल घेत नाही.
- रहिवासी,
कर्मचारी वसाहत

आग लागल्याने फ्रीजचा स्फोट
याठिकाणी एक महिन्यापूर्वी कचºयाला आग लागली होती. शेजारी अतिक्रमण विभागाने जप्त केलेला फ्रीज ठेवला होता. आगीमुळे फ्रीजच्या कॉम्प्रेसरमध्ये मोठा स्फोट झाला होता. सुदैवाने जवळ कोणी नसल्याने कोणी जखमी झाले नाही व मालमत्तेचेही नुकसान झालेले नाही.

वृक्षामुळे कंपनीला धोका
एमआयडीसी मुख्यालयाच्या आवारामधील वृक्षाच्या फांद्या शेजारील लोकमत प्रेसवर टेकल्या आहेत. यामुळे बांधकामाला धोका निर्माण झाला आहे. वृक्षाच्या फांद्या छाटण्याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. याशिवाय आवारामध्ये मोठ्या प्रमाणात पालापाचोळा पडला असून तो कुजल्यामुळे दुर्गंधी पसरू लागली असून त्याकडेही प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

देवतांच्या मूर्तींची विटंबना

एमआयडीसी प्रशासनाने अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करून मूर्ती जुन्या मुख्यालय परिसरामध्ये ठेवल्या आहेत. अनेक मूर्ती उघड्यावर धूळखात पडल्या आहेत. नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली असून मूर्तींचे योग्य पद्धतीने विसर्जन करावे, अशी मागणी केली जात आहे.

कचरा कुंडीही नाही
कर्मचारी वसाहतीमधील कचरा बाहेर टाकला जात नाही. कचरा साठविण्यासाठी कचरा कुंडीही ठेवली जात नाही. वसाहतीच्या एका बाजूला कचरा साठविला जात असून त्याचे ढीग तयार झाले की त्याला आग लावली जात आहे. कचरा वाहतुकीविषयी काहीही तयारी केलेली नाही.


Web Title:  MDC's old headquarters became warehouse, dissatisfaction with administration's apathy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.