माथाडी संघटनेमध्ये फूट पडू देणार नाही - नेत्यांचे मेळाव्यात आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 04:32 AM2019-03-24T04:32:56+5:302019-03-24T04:33:48+5:30

माथाडी कामगार ही संपत्ती असून ती जपण्याचा प्रयत्न करून कामगारांच्या हितालाच कायम प्राधान्य दिले जाईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये राजकीय फायद्यासाठी संघटनेमध्ये फूट पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही माथाडी नेत्यांनी शुक्रवारी वाशी येथे दिली.

 Mathadi will not break apart - assurances in leaders' meeting | माथाडी संघटनेमध्ये फूट पडू देणार नाही - नेत्यांचे मेळाव्यात आश्वासन

माथाडी संघटनेमध्ये फूट पडू देणार नाही - नेत्यांचे मेळाव्यात आश्वासन

Next

नवी मुंबई : माथाडी कामगार ही संपत्ती असून ती जपण्याचा प्रयत्न करून कामगारांच्या हितालाच कायम प्राधान्य दिले जाईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये राजकीय फायद्यासाठी संघटनेमध्ये फूट पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही माथाडी नेत्यांनी शुक्रवारी वाशी येथे दिली. संघटनेच्या नेत्यांमध्ये कोणतेही मतभेद राहिले नसल्याचे स्पष्ट करून अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला.
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबई बाजार समितीमध्ये मेळाव्याचे आयोजन केले होते. संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी अनेक दिवसांपासून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमधील राजकीय मतभेदाविषयी सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य केले. पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही पक्षाचे काम करावे; पण संघटनेमध्ये राजकारण आणू नये, असे आवाहन केले. कोणत्याही स्थितीमध्ये राजकारणासाठी कामगारांशी प्रतारणा करणार नाही. संघटना अभेद्यच ठेवली जाईल. स्वार्थासाठी अनेकांनी बोगस माथाडी संघटना काढल्या असून त्यांच्यामुळे चळवळ धोक्यात आली आहे. कामगारांचे अनेक प्रश्न सरकारने सोडवले, काही शिल्लक आहेत. प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी यापूर्वीही आंदोलने केली आहेत. भविष्यातही वेळ पडली, तर रस्त्यावर उतरण्यास मागेपुढे पाहणार नाही. कामगारांनीही अपयशाला घाबरू नये. हक्कासाठी न्याय मिळेपर्यंत लढा देत राहावे, असे आवाहनही यावेळी केले.
आमदार शशिकांत शिंदे यांनीही, कामगारांसमोर अनेक आव्हाने आहेत. कायदा व कामगारांचे अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वांना एकत्रपणे लढा द्यावा लागणार आहे. चळवळीला कोणाचीही दृष्ट लागणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. सत्ता येईल व जाईलही, राजकारण बाहेर ठेवून संघटना एक ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. सरकार कोणाचेही असू द्या, जर कोणी माथाडी कायदा व कामगारांच्या हिताला बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या वेळी गुलाबराव जगताप, वत्सला पाटील, एकनाथ जाधव, वसंत पवार, आनंद पाटील, ऋषीकांत शिंदे, चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, सुरेश कोपरकर, अ‍ॅड. भारती पाटील, रमेश पाटील, भानुदास इंगुळकर, गुंगा पाटील व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मदतीचे जाहीर आश्वासन देणे टाळले
माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी सातारा जिल्ह्णातून लोकसभा लढवण्याचा मानस असल्याचे स्पष्ट केले. माथाडींचा एकतरी खासदार असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीविषयीही भाष्य केले. शिवसेनेने उमेदवारी दिलीच तर संघटनेचे नेते व राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेही मदत करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला; परंतु शिंदे यांनी मात्र या विषयावर भाष्य करणे खुबीने टाळले. यामुळे पाटील यांना उमेदवारी मिळालीच, तर शिंदे राष्ट्रवादीचे काम करणार की, संघटनेमधील सहकाºयाला मदत करणार, याविषयी कामगारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादी, शिवसेनेसह भाजपाचे कौतुक
२०१४ मध्ये याच मेळाव्यामधून राष्ट्रवादी काँगे्रसने प्रचार सुरू केला होता; परंतु यावर्षी कोणत्याच पक्षाच्या नेत्यांना बोलावण्यात आले नाही. नरेंद्र पाटील यांनी त्यांच्या भाषणामध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले काम व सहकार्याबद्दल कौतुक केले. राष्ट्रवादीच्या नवी मुंबईमधील नेत्यांचेही कौतुक केले. यापूर्वी सरकारवर टीका करणाºया शशिकांत शिंदे व गुलाबराव जगताप यांनीही कोणावर टीका करणे टाळले. नरेंद्र पाटील यांनी यापूर्वीच्या सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी दिला नव्हता. आताच्या सरकारने निधी दिल्यामुळे अनेकांना मदत करता आल्याचे स्पष्ट केले.

संघटनेबाहेरील नेते नाहीत
निवडणूक आचारसंहिता व मागील काही दिवसांपासून नेत्यांमध्ये निर्माण झालेले राजकीय मतभेद यामुळे यावर्षी मेळाव्याला संघटनेच्या बाहेरील कोणत्याच पक्षाच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले नव्हते. यापूर्वी मुख्यमंत्री, महत्त्वाचे मंत्री, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे राज्यातील व नवी मुंबईचे नेते मेळाव्याला उपस्थित राहत होते. प्रथमच संघटनेबाहेरील कोणीच मेळाव्याला उपस्थित नव्हते.

मेळाव्याला तुलनेने गर्दी कमी
माथाडी मेळाव्याला प्रत्येक वर्षी कामगारांची प्रचंड गर्दी असते. कांदा-बटाटा मार्केटमधील लिलावगृहाच्या बाहेरील मंडप टाकावा लागतो. सकाळी ९ वाजताच लिलावगृह व मंडप भरलेला असतो; परंतु यावर्षी १० वाजून गेल्यानंतरही लिलावगृह भरले नव्हते. नेत्यांची भाषणे सुरू होईपर्यंत लिलावगृह पूर्ण भरले असले, तरी यापूर्वीच्या मेळाव्यांच्या तुलनेमध्ये गर्दी कमीच होती.

फूट टळली हे महत्त्वाचे
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माथाडी नेत्यांमध्ये दोन गट निर्माण झाले होते. शशिकांत शिंदे व गुलाबराव जगताप राष्ट्रवादीच्या बाजूला व नरेंद्र पाटील भाजपाची बाजू मांडू लागले होते. एकमेकांवर टीका सुरू केल्यामुळे संघटनेमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. परंतु, मेळाव्यानिमित्त नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्यामुळे कामगारांनी सुटकेचा श्वास सोडला.

Web Title:  Mathadi will not break apart - assurances in leaders' meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.