लोकमत न्यूज नेटवर्क
महाड : तालुका कुपोषण मुक्त असल्याचा दावा आरोग्य विभाग करीत असला, तरी सोमवारी महाड तालुक्यात एक तीन वर्षीय कुपोषित बालक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
या बालकाची तपासणी केल्यानंतर महाड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्याचा सल्ला त्या बालकाच्या पालकांना दिला. मात्र, त्यांनी अलिबाग येथे उपचारास स्पष्ट नकार दिल्याने ग्रामीण रुग्णालय प्रशासन हतबल झाले आहे. त्यामुळे या बालकावर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.
रोशन चव्हाण असे या कुपोषित बालकाचे नाव असून त्याचे वडील लोहारकाम करतात. नांगलवाडी, हनुमाननगर येथील एका भाड्याच्या खोलीत हे चव्हाण कुटुंब राहते. सोमवारी दुपारी या बालकाची आई महाड शहरात बाजारासाठी आली असता एका अंगणवाडी सेविकेने त्या बाईकडील कुपोषित बालक पाहिल्यावर त्याला ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. कुले या बालकावर उपचार करीत आहेत.