खारकोपर लोकल रियल इस्टेटच्या पथ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 01:31 AM2019-04-18T01:31:08+5:302019-04-18T01:31:15+5:30

नेरुळ-खारकोपर लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Kharkopar on the path of local real estate | खारकोपर लोकल रियल इस्टेटच्या पथ्यावर

खारकोपर लोकल रियल इस्टेटच्या पथ्यावर

Next

नवी मुंबई : नेरुळ-खारकोपर लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, ही सेवा सुरू झाल्यापासून म्हणजेच मागील चार महिन्यांत या मार्गावरून सुमारे साडेचार लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. लोकलच्या माध्यमातून दळणवळणाचे सक्षम साधन उपलब्ध झाल्याने या परिसराच्या विकासालाही चालना मिळाली आहे. याचा परिणाम म्हणून मागील अनेक वर्षांपासून विक्रीअभावी पडून असलेल्या मालमत्तांना उठाव आला आहे. मागील चार महिन्यांत मालमत्तांच्या किमतीतही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. एकूणच नेरुळ-खारकोपर लोकल सेवा या क्षेत्रातील रियल इस्टेटच्या पथ्यावर पडल्याने विकासक आणि गुंतवणूकदारांनी समाधान व्यक्त केले आहे.
सिडकोने उलवे नोडची उभारणी केली. या नोडमध्ये अनेक प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले. त्यामुळे या क्षेत्रातील भूखंडांचे दर वाढले. उलवे नोडचा संभाव्य विकास लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. साडेबारा टक्के योजनेअंतर्गतच्या भूखंडाचे ट्रेडिंग वाढले, त्यामुळे या भूखंडांनीही कोटीची उड्डाणे घेतली. विशेष म्हणजे, मागील दहा वर्षांत या परिसरातील रियल इस्टेट क्षेत्रात मोठी उलाढाल झाली. खासगी विकासकांनी अनेक मोठमोठे प्रकल्प प्रस्तावित केले. काही ठिकाणी भूमिपूजनही झाले. तर काहींचे प्रत्यक्षात कामही सुरू झाले. मात्र, पायाभूत सुविधांअभावी येथील मालमत्तांचे दर स्थिर राहिले. त्यामुळे बड्या विकासकांसह गुंतवणूकदारांचे कंबरडे मोडले. यातच सिडकोने या विभागात उन्नती हा गृहप्रकल्प साकारला. त्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण होतील, असा अशावाद बांधकाम व्यावसायिकांत निर्माण झाला; परंतु आंतरराष्ट्रीय विमानतळ व मेट्रोसारख्या प्रकल्पांना झुकते माप देणाऱ्या सिडकोला या क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा पुन्हा विसर पडला, त्यामुळे उन्नती प्रकल्पात राहावयास गेलेल्या चाकरमान्यांची कसरत सुरू झाली. नाले, गटारे, दिवाबत्ती, पिण्याचे पाणी, रस्ते तसेच वाहतुकीची साधने आदीचा अभाव असल्याने येथील रहिवाशांना कमालीची कसरत करावी लागली. विशेष म्हणजे या क्षेत्रात घरे व दुकाने खरेदी केलेल्यांची मोठी पंचाईत झाली. लोकवस्तीच नसल्याने या मालमत्ता पडून राहिल्या. एनएमएमटीने या भागात बसेसच्या काही फेºया सुरू केल्याने त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. त्यामुळे बहुप्रतीक्षित नेरुळ-उरण लोकल सेवेची सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली होती. अखेर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या मार्गाच्या खारकोपरपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला.
पहिल्या टप्प्यात बेलापूर ते खारकोपर आणि नेरुळ ते खारकोपर अशा सेवा सुरू झाल्याने या परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या चार महिन्यांत परिसरातील मालमत्तांच्या खरेदी-विक्री व भाडेकराराचे प्रमाणही वाढले आहे. इतकेच नव्हे, तर अनेक गृहसंकुलात कुलूप बंद असलेले वाणिज्यिक गाळ्यातून लहान-मोठे व्यवसाय सुरू झाल्याचे दिसून आले आहे. स्थानक परिसरात फेरीवाले, हातगाडी व इतर लहान व्यावसायिकांची संख्या वाढू लागली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून मागील दहा वर्षांपासून स्थिर राहिलेल्या येथील स्थावर मालमत्तेला काही प्रमाणात उठाव मिळाला आहे. मागणी वाढल्याने मालमत्तांचे दरही वाढू लागले आहेत, त्यामुळे या क्षेत्रातील इस्टेट एजंटच्या कार्यालयात ग्राहकांची गर्दी वाढल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
>उलवे परिसरात मालमत्तांचे सध्याचे दर
सध्या उलवे परिसरात मालमत्तांचे दर प्रतिचौरस फूट ५५०० ते ७००० रुपये प्रतिचौरस फूट इतके आहेत. मागील चार महिन्यांत यात ५०० रुपये वाढ झाल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. येत्या काळात यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
>पायाभूत सुविधांवर सिडकोचा भर
सिडकोने या क्षेत्रात पायभूत सेवा निर्माण करण्यावर भर दिला आहे. रस्ते, नाले, गटारे, दिवाबत्ती, सांडपाणी प्रक्रिया करणारे केंद्र, शाळा, उद्याने, खेळाची मैदाने, पेट्रोल पंप आदीबाबत कार्यवाही सुरू केली आहे. नागरी सुविधांची कोट्यवधींची कामे या विभागात सुरू आहेत. नेरुळ-उरण मार्गाचा दुसरा टप्पा पुढील वर्षभरात पूर्ण करण्याचा निर्धार सिडको व मध्य रेल्वेने व्यक्त केला आहे. त्यानुसार कामाला गती देण्यात आली आहे, तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामही प्रगतिपथावर आहे. या पार्श्वभूमीवर उलवेसह नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या पुष्पकनगर नोडमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे.

Web Title: Kharkopar on the path of local real estate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.