तळोजातील वाहतूक समस्येचा प्रश्न ऐरणीवर, अनधिकृत पार्किंगचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 11:47 PM2018-09-05T23:47:52+5:302018-09-05T23:48:03+5:30

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये सध्याच्या घडीला वाहतुकीची समस्या गंभीर बनत चालली आहे. मुंब्रा-पनवेल बायपासचे काम सुरू असल्याने अवजड वाहनांना हेडूसने-तळोजा एमआयडीसी मार्गे नावडे फाटा या ठिकाणाहून वाहतूक वळविण्यात आलेली आहे.

On the issue of traffic problem in taloja, the number of unauthorized parking lots increased | तळोजातील वाहतूक समस्येचा प्रश्न ऐरणीवर, अनधिकृत पार्किंगचे प्रमाण वाढले

तळोजातील वाहतूक समस्येचा प्रश्न ऐरणीवर, अनधिकृत पार्किंगचे प्रमाण वाढले

Next

- वैभव गायकर

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये सध्याच्या घडीला वाहतुकीची समस्या गंभीर बनत चालली आहे. मुंब्रा-पनवेल बायपासचे काम सुरू असल्याने अवजड वाहनांना हेडूसने-तळोजा एमआयडीसी मार्गे नावडे फाटा या ठिकाणाहून वाहतूक वळविण्यात आलेली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. अनधिकृत पार्किंगसह वाहतूककोंडीची समस्या ऐरणीवर आली आहे.
तळोजा वाहतूक शाखेतील कर्मचारी अतुल गागरे (वय- ३३) यांचा आज पहाटे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर वाहतूकसमस्येचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग हाच सर्वात मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणतीही परवानगी नसताना या मार्गावर नावडे फाटा ते आयजीपीएल, दीपक फर्टिलायझर ते वलप रोडवर अवजड वाहने बिनदिक्कतपणे थांबलेली असतात. तळोजा एमआयडीसीमधील विविध कारखान्यांत येणारी मालवाहतूक ट्रक, कंटेनर, टँकर, टेम्पो सर्रास रस्त्याच्या दुतर्फा थांबलेली असतात. यामध्ये रसायनाने भरलेल्या ज्वलनशील पदार्थांच्या वाहनांचादेखील समावेश आहे. नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनीही वेळोवेळी या संदर्भात आवाज उठवला आहे. प्रदूषणासह तळोजा एमआयडीसीमधील अनधिकृत पार्किंगही अतिशय बिकट विषय बनला आहे, यामुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. खुद्द वाहतूक पोलिसालाच अशाप्रकारे दुर्दैवी घटनेत आपला जीव गमवावा लागला असल्याने पोलीस दलामध्ये या घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तळोजा एमआयडीसीमध्ये केवळ ट्रक टर्मिनल आहे. संपूर्ण एमआयडीसीची व्याप्ती पाहता ते पुरेसे नाही. मुंब्रा बायपासच्या कामामुळे तळोजा एमआयडीसीमधील मार्गावर मोठ्या संख्येने अवजड वाहनांची ये-जा वाढली आहे. रात्रीपासून पहाटेपर्यंत अवजड वाहने मोठ्या संख्येने या ठिकाणी वाहतूक करीत असतात, तर अनेक जण रस्त्याच्या कडेला थांबलेले आढळतात.
अनेक वेळा वाहतूक पोलिसांशी पत्रव्यवहार करूनही वाहतूक पोलीस ठोस उपाययोजना राबवत नाहीत. तळोजा एमआयडीसी परिसरात असलेल्या दहा ते पंधरा गावांतील रहिवाशांना देखील या अनधिकृत पार्किंगचा त्रास सहन करावा लागत आहे.

मनुष्यबळाअभावी इतर पोलीस कर्मचाऱ्यांची भरड
तळोजा वाहतूक शाखेकडे एकूण २८ कर्मचाºयांचे पोलीस बळ कार्यरत आहे. मात्र, मध्यरात्रीच्या पाळीसाठी अवघ्या दोन पोलिसांवरच येथील जबाबदारी दिली जाते, अशी माहिती वाहतूक कर्मचारी यांनी दिली, त्यामुळे एक कर्मचारी चौकीत व एक वाहतूककोंडी सोडवण्यासाठी धावत असतो. या ठिकाणी पोलीस कर्मचाºयांच्या पाळीबाबत दर वेळी नियोजन केले जाते. मात्र, रात्री वाहतूककोंडी कमी असल्याच्या अंदाजाने दोन कर्मचाºयांवर जबाबदारी दिली जाते.

पार्किंगसंदर्भातील तक्र ारींकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
तळोजा एमआयडीसीमधील वाहतूक समस्येसंदर्भात व अनधिकृत पार्किंगसंदर्भात खैरणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच व मनसेचे तालुका उपाध्यक्ष कैलाश माळी यांनी ८ आॅगस्ट रोजी तळोजा वाहतूक शाखेशी पत्रव्यवहार केले होते. अनधिकृत पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी या पत्रात केली होती. तळोजा वाहतूक पोलिसांनी या पत्राची दखल घेतली नाही.

पथदिवे, सीसीटीव्हीची आवश्यकता
तळोजा नावडे फाटा या ठिकाणाहून नितळज फाटा साधारण दहा किलोमीटरचे अंतर आहे. दिवसा या मार्गावर पथदिवे उभे दिसत असले, तरीदेखील रात्रीच्या वेळेस बºयाच ठिकाणी काळा गडद अंधार पडत असतो, त्यामुळे बºयाचदा या मार्गावरून प्रवास करणाºयांची देखील गैरसोय होत असते. तसेच या मार्गावर सुसज्ज अशा सीसीटीव्ही कॅमेºयांचा अभाव जाणवतो. अतुल यांच्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या त्या अज्ञात वाहनाला शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केलेला असला, तरी या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याने तपासात मोठा अडथळा निर्माण होत आहे.

मुंब्रा बायपासच्या कामामुळे एमआयडीसीमध्ये वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काम पूर्ण झाल्यावर या वाहनाचा ओघ कमी होईल. रात्रीच्या वेळेला अनधिकृत पार्किंगवर कारवाई करण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांना नाही.
- राजेंद्र आव्हाड,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
तळोजा वाहतूक शाखा

एमआयडीसीमधील अनधिकृत पार्किंग संदर्भात वारंवार वाहतूक विभागाशी पत्रव्यहार करूनदेखील वाहतूक पोलीस काहीच कारवाई करीत नाहीत. आजच्या दुर्दैवी घटनेत वाहतूक पोलिसालाच जीव गमवावा लागला. वाहतूक पोलिसांनी आता तरी जागे व्हावे अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.
- कैलास माळी,
उपरसरपंच, खैरणे ग्रामपंचायत

Web Title: On the issue of traffic problem in taloja, the number of unauthorized parking lots increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.