उघड्यावर मालवाहतुकीमुळे अपघातांना निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 05:27 AM2019-03-19T05:27:05+5:302019-03-19T05:27:18+5:30

शहरातून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. दगड, माती, विटा तसेच रेती यांची बंदिस्त वाहनातून वाहतूक होणे आवश्यक आहे.

Invitations for accident due to freight traffic at the open | उघड्यावर मालवाहतुकीमुळे अपघातांना निमंत्रण

उघड्यावर मालवाहतुकीमुळे अपघातांना निमंत्रण

googlenewsNext

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : शहरातून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. दगड, माती, विटा तसेच रेती यांची बंदिस्त वाहनातून वाहतूक होणे आवश्यक आहे. मात्र उघड्या डम्परमधून सर्रास वाहतूक होत असतानाही त्यावर कारवाईकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
सायन-पनवेल मार्गावर मागील काही दिवसांपासून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येत कमालीची भर पडली आहे. या वाहनांमधून उलवे अथवा लगतच्या परिसरातून मुंबईच्या दिशेने दगड, खडी, माती, वाळू तसेच विटा नेल्या जातात. मात्र बांधकामासाठी लागणाºया या मालाची वाहतूक करताना संबंधित ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून पुरेशी खबरदारी घेतली जात नाही. यामुळे सायन- पनवेल मार्गावर अपघातांना निमंत्रण मिळत असून जागोजागी मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत. त्यात सर्वाधिक धोका दुचाकीस्वारांना निर्माण होत आहे. माती, रेती अथवा दगड यांची वाहतूक बंदिस्त वाहनातून अथवा त्यावर आवरण टाकून करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र तसे होत नसल्याचे सायन-पनवेल मार्गावर दिसून येत आहे. मालवाहतूक करणारे हे डम्पर निष्काळजीपणे अती वेगात पळवले जात असल्याने अपघातांचा धोका निर्माण होत आहे.
सायन-पनवेल मार्गाची अनेकदा डागडुजी झाल्याने ठिकठिकाणी चढ-उतार तयार झाले आहेत. त्याठिकाणी भरधाव डम्पर आपटून त्यामधील खडी, रेती उडून रस्त्यावर जागोजागी सांडत आहे. यामुळे मार्गालगत सर्वत्र रेतीचे थर साचलेले दिसतात. शिवाय डम्परमधून उडणाºया खडी अथवा मातीमुळे पाठीमागून येणाºया दुचाकीस्वारांच्या डोळ्यात धूळफेक होते. याच प्रकारामुळे शहरातील धूलिकणांमध्ये वाढ होत असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र उघड्या डम्परमधून दगडांची वाहतूक होत असताना, एखादा दगड उडून रस्त्यावर पडल्यास पाठीमागून येणाºया वाहनांचा गंभीर अपघात घडू शकतो.
बहुतांश डम्परमध्ये उघड्यावर मालवाहतूक करण्यास त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरला जातो. या अवस्थेत डम्पर वेगात पळवले जात असल्याने रस्त्यांची जलद गतीने झीज होत आहे. त्याच कारणाने पामबीच मार्गावर डम्परसारख्या जड वाहनांना पालिकेने बंदी घातलेली आहे. यानंतरही रहदारीच्या दृष्टीने शहरातील महत्त्वाच्या मार्गावर नियमांची पायमल्ली करून उघड्यावर मालवाहतूक करणाºया डम्पर चालकांवर कारवाई होत नसल्याने वाहतूक पोलिसांसह आरटीओच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे.

नवी मुंबईतून मुंबईकडे बांधकाम साहित्याची वाहतूक करताना संबंधित ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना पनवेल, नवी मुंबई व मुंबई आरटीओच्या कार्यक्षेत्रातून जावे लागते. त्यामुळे ओव्हरलोड मालवाहतूक तसेच उघड्यावर मालवाहतूक करणाºया डम्पर चालकांवर तीनपैकी एकातरी ठिकाणी कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र तसे होत नसल्याने तिथल्या संपूर्ण यंत्रणेच्याच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

तीन दिवसांपूर्वी एनआरआय पोलीस ठाण्यात एका डम्पर चालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्या डम्परमध्ये क्षमतेपेक्षा सुमारे १४ हजार किलो जास्त माल भरलेला होता. शिवाय माल बंदिस्त न करताच त्याची वाहतूक केली जात होती. अशा प्रकारच्या कारवायांमध्ये सातत्य राहिल्यास बांधकामाच्या साहित्याच्या वाहतुकीला शिस्त लागू शकेल. मात्र किल्ले जंक्शन येथूनच मोठ्या प्रमाणात इतरही डम्परमधून उघड्यावर मालाची वाहतूक होत असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुंबई परिसरात कोट्यवधीची विकासकामे सुरू असून त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य नवी मुंबईच्या पनवेल, उलवे परिसरातून नेले जाते. त्याकरिता मुंबईला जोडणारा सायन-पनवेल एकमेव मार्ग असल्याने दिवस-रात्र जड अवजड वाहनांची रहदारी सुरू असते. मात्र अनेकदा मुंबईत जड वाहनांना निश्चित वेळीच प्रवेश दिला जातो. त्यामुळे वाशी टोलनाक्यापूर्वी अथवा सानपाडा, उरण फाटा यासह ठिकठिकाणी रस्त्यालगत कित्येक तास उभी केली जातात. यामुळे रहदारीला अडथळा होऊन अपघाताची शक्यता निर्माण होत आहे.
 

Web Title: Invitations for accident due to freight traffic at the open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.