Interruption of flyover works | उड्डाणपुलाच्या कामांचा वाहतुकीस अडथळा
उड्डाणपुलाच्या कामांचा वाहतुकीस अडथळा

- वैभव गायकर

पनवेल : सायन-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलाच्या काँक्रीटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले आहे. मात्र या उड्डाणपुलाच्या कामांचा फटका येथील वाहतुकीला बसत आहे. देशातील सर्वात व्यस्त महामार्गापैकी एक असलेल्या सायन-पनवेल महार्गावरील वाहतूककोंडी ही दैनंदिन समस्या बनली आहे.
सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करताना संपूर्ण महामार्गावर काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. यामध्ये उड्डाणपूल वगळण्यात आले होते. मात्र पावसाळ्यात उड्डाणपुलावर मोठे खड्डे पडत असल्याने अपघात होतात. महामार्गावरील अपघातांची आकडेवारी पाहता, यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर उड्डाणपुलाचे काम गेल्या चार महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहेत. यात वाशी, सानपाडा उड्डाणपूल, जुईनगर - शिरवणे, कोपरा उड्डाणपूल, तळोजा लिंक रोड उड्डाणपूल, कामोठे उड्डाणपूल आदी ठिकाणच्या उड्डाणपुलावर कामे सुरू आहेत. मात्र या सर्व कामाचा फटका महामार्गावरील वाहतुकीवर बसत आहे. वाशीपासून खारघर गाठण्यासाठी यापूर्वी दहा ते पंधरा मिनिटांचा कालावधी लागे, मात्र उड्डाणपुलांच्या कामांमुळे हेच अंतर गाठण्यासाठी सुमारे ३० मिनिटांचा कालावधी लागत आहे. हे काम सुरू असल्याने दररोज महामार्गावर वाहतुकीत बदल केला जात आहे.
महामार्गावर अनेक ठिकाणी बत्ती गुल असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण होणे गरजेचे आहे, अन्यथा वाहने घसरणे, अपघातांत वाढ होण्याची शक्यता चालकांकडून व्यक्त होत आहे. सध्या उड्डाणपुलावरील कामांची गती पहाता, ती वेळात पूर्ण होतील अशी शक्यता आहे. मात्र त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने संबंधित यंत्रणा अधिक गतीने कार्यान्वित करणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबई-गोवा महामार्गावरील खांदा वसाहतीतील उड्डाणपूल सुरू
गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या खांदा वसाहतीत जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून रविवारी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे खांदेश्वर स्थानकातून खांदा वसाहतीत येणाºया वाहनांची कोंडीतून सुटका झाली आहे. मुंबई-गोवा मार्ग हा कायमच वर्दळीचा असतो. सुटी, वीकेण्ड, गणेशोत्सवात या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने वाहतूककोंडीची समस्या उद्भवत होती. त्यातच खांदा वसाहतीतून खांदेश्वर रेल्वे स्थानकात जाण्यासाठी हा मार्ग ओलांडून जावे लागत असल्याने वाहनचालक तसेच रिक्षाचालकांमध्ये अनेकदा शाब्दिक वादही व्हायचे. मात्र आता उड्डाणपूल सुरू झाल्याने खांदा वसाहतीत होणारी वाहतूककोंडी टळेल, अशी शक्यता चालकांकडून वर्तवण्यात येत आहे.

सायन-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलाच्या काँक्र ीटीकरणाच्या कामांचा कालावधी १८ महिने आहे. मात्र पावसाळ्यापूर्वीच सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
- आर. पी. पाटील,
उपअभियंता, सायन-पनवेल महामार्ग

सायन-पनवेल महामार्गावरून प्रवास करताना दररोज मार्गिकेमध्ये बदल केला जात आहे. हे धोकादायक आहे. चालक अनेकदा संभ्रमात पडतात. त्यातच पथदिवे बंद असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पथदिवे सुरू करावेत.
- सचिन पवार, वाहन चालक


Web Title:  Interruption of flyover works
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.