Increasing number of women in Panvel taluka | पनवेल तालुक्यात महिलांची संख्या वाढतेय

- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली - शहरीबहुल समजल्या जाणाºया पनवेल परिसरात महिलांचे प्रमाण कमीच असल्याचे मागील जनगणना आणि मतदार नोंदणी आकडेवारीवरून उघड झाले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत मुलीचा जन्मदर वाढत आहे, ही बाब अतिशय समाधानकारक असल्याचे एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालेली आहे. अकरा महिन्यात एकात्मिक बाल विकास प्रकल्प-२ मध्ये नोंद झालेल्या आकडेवारीचा विचार केला तर मुलांच्या तुलनेत मुलींचा आकडा ३८ने जास्त आहे.
तीन वर्षांपूर्वी सोनोग्राफी मशिनच्या नोंदणीचे नूतनीकरण न करणे, माहिती व्यवस्थित न ठेवणे त्यामुळे दोन वैद्यकीय व्यावसायिकांना पनवेल न्यायालयाने शिक्षाही दिली. मध्यंतरी काही सामाजिक संस्थांनी लेक लाडकी अभियान राबवून जनजागृती केली. २०११ मध्ये या परिसराची जनगणना झाली, त्याचबरोबर नव्याने मतदार नोंदणीही झाली. त्या आकडेवारीहून पनवेल परिसरातील महिलांचे प्रमाण एक हजार पुरुषांमागे ९०० च्याही खाली गेले होते. २००८ मध्ये झालेल्या एका पाहणीत हे प्रमाण ९४१ होते. त्यानंतर ७६ ने खाली घसरून ८६५वर आले होते. ही बाब अतिशय चिंतेची असल्याने सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. गेल्या अकरा महिन्यात एकात्मिक बाल विकास प्रकल्प-२ मध्ये नोंद झालेल्या
आकडेवारीचा विचार केला तर मुलांच्या तुलनेत मुलींचा आकडा ३८ ने जास्त आहे.
प्रकल्प अधिकारी आर.एन. सांबरे, विस्तार अधिकारी संतोष ठोंबरे, प्रकल्प पर्यवेक्षिका जे.एम. गांधी, पी.पी.कदम, ए.ए.दाते, व्ही.एन.तांडेल, दीपा मटकर यांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस आशा वर्कर यांच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहचले. अंगणवाडी सेविका आणि गरोदर माता यांचा जास्त संपर्कयेत असल्याने त्यांच्या माध्यमातून स्त्री जन्माचे महत्त्व पटवून दिले जात आहे. केवळ मातेलाच नाही तर घरातील सर्वांना मुलींचे स्वागत करण्यास प्रवृत्त केले. त्याचबरोबर प्रबोधन, जनजागृती आणि महिला मेळाव्याचे आयोजन सुद्धा करण्यात येते. त्याचा परिणाम पनवेल तालुक्यातील बहुतांशी भागात जाणवू लागला आहे.
प्रकल्प-२च्या अखत्यारीत तालुक्याचा बराचसा भाग येतो त्याचबरोबर त्यामध्ये आदिवासी वाड्या आणि पाड्यांचा समावेश आहे.

१५ ते ४५ या वयोगटातील लाभार्थ्यांबरोबर आमचा थेट संबंध असतो. अंगणवाडी सेविकांचे गृहभेटीत या महिलांबरोबर सलोख्याचे संबंध निर्माण होतात. त्या थेट चुलीपर्यंत पोहचतात त्यामुळे मुलींच्या जन्माबाबत त्यांना पटवून देता येते त्यामुळे हळूहळू मानसिकता बदलत जाते.
- जे.एम.गांधी, पर्यवेक्षिका

या भागात विविध विकास प्रकल्प आले असून, नागरीकरण वाढत आहे. पायाभूत सुविधांचा विकास होत असताना दळणवळणाची साधनेही वाढली आहेत. त्यामुळे पनवेल आणि मुंबईचे अंतरही कमी झाले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे समाजाच्या मानसिकतेत बदल होऊन दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या वाढत चालली आहे.
- संतोष ठोंबरे,
एकात्मिक बालविकास सेवा योजना,
प्रकल्प-२

जन्मदराची २०१७-१८ मधील आकडेवारी
महिना मुले मुली
एप्रिल ८७ ७९
मे ५७ ६३
जून ७२ ९८
जुलै ७८ ७९
आॅगस्ट ५६ ६६
सप्टेंबर ६३ ७५
आॅक्टोबर ४४ ५०
नोव्हेंबर ८८ ८४
डिसेंबर ७९ ६९
जानेवारी ७० ७१
फेब्रुवारी ३७ ४५
एकूण ७३१ ७६९


Web Title:  Increasing number of women in Panvel taluka
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.