जयंत धुळप

पनवेल- बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आपटा(पनवेल)येथे गाय-बैलांची बेकायदा कत्तल करून मांस विक्रीकरिता घेऊन जाण्याच्या प्रयत्नातील दहा जणांपैकी चार जणांना अटक करून, त्यांच्या स्कॉर्पिओ व कॉलिस अशा दोन गाड्या, मांस आणि जनावरे असा एकूण ८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल रसायनी पोलिसांनी जप्त केला. सहा आरोपी मात्र फरार झाले आहेत.
ही सर्व जनावरे कत्तलीसाठी योग्य असल्याचे कोणतेही प्रमाणपत्र न घेता, त्यातील काही जनावरांची कत्तल करून इतर जनावरे कत्तलीसाठी ताब्यात बाळगून स्कॉर्पिओ व कॉलिस गाडीमधून जनावरांना क्रूरतेने वागवून, काही जनावरांची कत्तल करीत असताना ही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी रसायनी पोलिसांनी भा.दं.वि.कलम ४२९, ३४ महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा अधिनियम, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०, पशू वाहतूक अधिनियम, मोटार वाहन कायदा कलम ८३,१७७ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक डी.एन.बोराटे हे करीत आहेत.