ऐरोलीतील उद्यानाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 01:37 AM2018-06-17T01:37:05+5:302018-06-17T01:37:05+5:30

ऐरोली सेक्टर-१८ येथील महापालिकेच्या स्व. रामदास बापू पाटील उद्यानाची दुरवस्था झाली आहे.

Ground Flooring in Airli | ऐरोलीतील उद्यानाची दुरवस्था

ऐरोलीतील उद्यानाची दुरवस्था

googlenewsNext

नवी मुंबई : ऐरोली सेक्टर-१८ येथील महापालिकेच्या स्व. रामदास बापू पाटील उद्यानाची दुरवस्था झाली आहे. या उद्यानातील खेळणी व बाकडे तुटलेली आहेत. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या मुलांची मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे, उद्यानाचे लोखंडी प्रवेशद्वार गंजलेल्या अवस्थेत असून, काही दिवसांपूर्वी कोपरखैरणे येथील शाळेत घडलेल्या दुर्घटनेची पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उद्यानाच्या संरक्षण भिंतीचा दक्षिणेकडील भाग कोसळून अनेक महिने झाले तरी त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. उद्यानाच्या प्रवेशद्वाराचे लोखंडी फाटक पूर्णत: गंजले आहे. त्याला कुलूपही लावता येत नाही. त्यामुळे उद्यानात दिवस-रात्र गर्दुल्ले आणि प्रेमीयुगलांचा वावर दिसून येतो. विशेष म्हणजे, उद्यानाला गेट आहे; पण तुटलेल्या आणि गंजून सडलेल्या लोखंडी गेटला कुलूपसुद्धा लावता येत नाही. उद्यानाची वेळ पहाटे ५ ते सकाळी १० आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ अशी आहे. मात्र, ही वेळ केवळ नावापुरतीच राहिली आहे. कारण कुंपणाच्या तुटलेल्या भिंती आणि प्रवेशद्वारातून कोणीही कोणत्याही वेळी आत प्रवेश करीत असल्याचे दिसून येते.
उद्यानाच्या पदपथावरील लाद्या तुटलेल्या आहेत, त्यामुळे अनेकदा खेळताना लहान मुले पडण्याच्या घटना घडत आहेत. उद्यानातील दिवे आणि हायमास्ट नियमित बंद असतात. गर्दुल्ले आणि मद्यपींना ही बाब सोयीची ठरली आहे.
या उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळील संरक्षण भिंतीला लागून आरसीसी गटारांच्या दुरु स्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे उद्यानात प्रवेश करताना ज्येष्ठ नागरिकांना कसरत करावी लागत आहे. गटाराचे काम पूर्ण करण्याची मुदत कधीच संपून गेली आहे. तरीही हे काम सुरूच असल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. उद्यानाच्या दुरवस्थेकडे महापालिका प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे.
कोपरखैरणे येथील शाळेचे लोखंडी प्रवेशद्वार अंगावर पडून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. ऐरोलीतील उद्यानाची अवस्था पाहता, कोपरखैरणेतील दुर्घटनेची पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

.स्व. रामदास बापू पाटील या महापालिकेच्या उद्यानाची दुरु स्ती करण्यासाठी प्रभाग समितीमार्फत निधी मंजूर करण्यात आला आहे, त्यामुळे लवकरच या उद्यानाची डागडुजी करण्यात येईल. कोपरखैरणे सारखी दुर्घटना घडू नये, यासाठी पुरेपूर काळजी घेऊन सर्वप्रथम प्रवेशद्वाराचे काम करण्यात येणार आहे, तसेच संरक्षण भिंत, पदपथावरील लाद्या, खेळणी आणि बसण्याची बाके आदीची युद्धपातळीवर डागडुजी केली जाईल.
- जयंत कांबळे,
उपअभियंता, स्थापत्य विभाग, ऐरोली (महापालिका)

Web Title: Ground Flooring in Airli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.