गणरायाचे आगमन होणार खड्ड्यांतूनच!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 02:34 AM2018-09-12T02:34:31+5:302018-09-12T02:34:48+5:30

गणरायाचे आगमन दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यानुसार बाप्पाच्या स्वागतासाठी नवी मुंबईकरांची लगबग सुरू झाली आहे.

Ganapati will arrive from the potholes! | गणरायाचे आगमन होणार खड्ड्यांतूनच!

गणरायाचे आगमन होणार खड्ड्यांतूनच!

Next

नवी मुंबई : गणरायाचे आगमन दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यानुसार बाप्पाच्या स्वागतासाठी नवी मुंबईकरांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, नादुरुस्त रस्त्यांचा ताप भाविकांना जाणवत आहे. गणेशोत्सवाअगोदर शहरातील रस्त्यांची डागडुजी होणे आवश्यक होते; परंतु महापालिकेने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने गणरायाचे स्वागत खड्ड्यांतूनच करण्याची वेळ शहरवासीयांवर ओढावली आहे.
शहरातील प्रमुख मार्गासह अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांची कसरत होत आहे. शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या सायन-पनवेल महामार्गाची तर अक्षरश: चाळण झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी या मार्गावरील खड्डे बुजविण्याचा सोपस्कार पूर्ण करण्यात आला; परंतु अवघ्या २४ तासांत या कामाचे पितळ उघडे पडले. महामार्गापेक्षा शहरवासीयांना अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न सतावत आहे. कारण बहुतांशी रस्ते उखडले आहेत. वसाहतीअंतर्गतच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पादचाºयांनाही त्रास होत आहे. वाहनधारकांना तर कसरत करावी लागत आहे. कोपरी सिग्नलपासून ब्ल्यू डायमंड चौकाकडे जाणाºया अंतर्गत रस्त्याची वाताहत झाली आहे. रस्त्याच्या मध्यभागी असलेले मलनि:सारणाच्या चेंबरचे झाकण उखडले आहे. हा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. विशेष म्हणजे अनेकदा या मार्गावरील पथदिवे बंद असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी सुसाट धावणाºया दुचाकी व रिक्षांच्या अपघाताची शक्यता वाढली आहे. कोपरखैरणेच्या काही भागात मध्यंतरी डांबराचा भराव टाकून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले; परंतु हे कामसुद्धा निकृष्ट दर्जाचे ठरले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर हे खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. कोपरखैरणेप्रमाणेच वाशी, घणसोली, ऐरोली, तुर्भे, सानपाडा, नेरूळ व बेलापूर विभागातील अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे गणेशभक्तांची चिंता वाढली आहे. १३ सप्टेंबर रोजी गणेशाचे आगमन होत आहे. त्याधर्तीवर शहरवासीयांची लगबग सुरू झाली आहे; परंतु लाडक्या बाप्पाच्या स्वागतात खड्ड्यांचे विघ्न घोंगावू लागल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
>सार्वजनिक गणेश मंडळांना चिंता
शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाचा वेगळाच थाट असतो. मागील काही वर्षांत आकर्षक व मोठ्या गणेशमूर्तींवर मंडळांनी भर दिला आहे.
काही गणेशोत्सवाला ३० ते ४० वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीअगोदर थाटामाटात श्रींची मूर्ती आणली जाते.
यावर्षी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गणेशमूर्ती आणताना मंडळांची तारांबळ उडाली. काही मंडळांच्या गणेशमूर्ती आदल्या दिवशी आणल्या जातात.
खडतर रस्त्यातून मंगलमूर्ती आणण्याचे चिंताजनक आव्हान गणेशमंडळांसमोर उभे ठाकले आहे.
>लोकप्रतिनिधींची चुप्पी
स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनात देशात अव्वल ठरलेल्या नवी मुंबईत रस्त्यांची समस्या गंभीर बनली आहे. सायन-पनवेल महामार्गाच्या दुरवस्थेचा फटका शहराच्या लौकिकाला बसलाच आहे. यात आता अंतर्गत रस्त्यांच्या समस्येचीही भर पडू लागली आहे. या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनीही चुप्पी साधल्याने गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Ganapati will arrive from the potholes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.