ठाणे : बनावट चावीने कार चोरणाऱ्या चौघा जणांच्या टोळीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून २५ लाख ४० हजारांच्या तीन महागड्या कार आणि लॅपटॉप, कॅमेऱ्यांसह कारचोरीची सामग्री असा २७ लाख ८६ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
रणजित चौधरी (२८), ठाकूरचाळ, पालघर, महंमद सलामत शेख (३५, रा. नालासोपारा), रवींद्र शर्मा (२१, रा. फिल्म सिटी रोड, मुंबई) आणि सुमित सिंग (२४, रा. अंधेरी) अशी याप्रकरणी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. रणजित चौधरी हा सराईतपणे कारचोरी करणारा कासारवडवली भागात चोरीची कार विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार सुरेश कदम यांना मिळाली. त्यांच्याकडे मिळालेल्या १९ एसीएम पार्टवरून त्यांनी १९ कार चोरल्याचे उघड झाल्याचे घेवारे यांनी सांगितले. त्यांच्याकडील चौकशीत रवींद्र आणि सुमित या दोघांना नंतर अटक केली. (प्रतिनिधी)