स्वच्छ भारत अभियानावरील खर्च व्यर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:33 PM2018-10-15T23:33:31+5:302018-10-15T23:33:53+5:30

कचऱ्याचे ढिगारे कायम : नवी मुंबईसह पनवेलमधील खतनिर्मितीचे प्रयोग फसले : लोकसहभाग नाहीच

The expenditure on Swachh Bharat Abhiyan was waste | स्वच्छ भारत अभियानावरील खर्च व्यर्थ

स्वच्छ भारत अभियानावरील खर्च व्यर्थ

Next

- नामदेव मोरे 


नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानामध्ये सलग दोन वर्षे नवी मुंबईने राष्ट्रीय पुरस्कार मिळविले. अभियान राबविण्यासाठी प्रत्येक वर्षी करोडो रुपये खर्च केले आहेत, परंतु प्रत्यक्षात स्वच्छता मोहिमांवरील खर्च व्यर्थ जात असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. शहरात कचºयाचे ढिगारे साचले आहेत. कंपोस्ट पीटचा प्रयोग फसला आहे. लोकसहभाग फक्त नावापुरताच असून नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करण्यातही सहकार्य करत नाही. नवी मुंबईपेक्षा पनवेलमधील स्थिती अत्यंत बिकट आहे.


सानपाडा रेल्वे स्टेशनच्या बाहेर स्वच्छता अभियानाविषयी जनजागृती करण्यासाठी गतवर्षी भिंत रंगवण्यात आली होती. अभियान संपताच जवळील हॉटेलचालकाने त्या फलकाच्या बाजूलाच कचरा टाकण्यास सुरवात केली आहे. कचऱ्याचे ढिगारे उचलण्याकडे पालिका प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. हॉटेलचालकानेही हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. घनकचरा व्यवस्थापनामध्ये महापालिकेला देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये शहरातील कचरा वेळेवर उचलला जात नाही. तुर्भे गाव, सानपाडा, घणसोली परिसरामध्ये कचºयाचे ढिगारे पहावयास मिळत आहेत. अभियानाअंतर्गत पालिकेच्या शाळा व उद्यानामध्ये कंपोस्ट पीट तयार करण्यात आले होते. त्या कंपोस्ट पीटचा वापर केला जात नाही. अनेक ठिकाणी फक्त नावापुरते खतनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत. गृहनिर्माण सोसायटीमधील नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करत नाहीत. एकाच डब्यामध्ये ओला व सुका दोन्ही प्रकारचा कचरा टाकला जात आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नवीन प्रसाधनगृहे उभारण्यात आली आहेत, परंतु देखभाल करण्याची यंत्रणाच निर्माण करण्यात आली नाही.


नवी मुंबईपेक्षा पनवेल परिसरामध्ये स्थिती बिकट आहे. स्वच्छ भारत अभियानासाठी तयार केलेल्या कंपोस्ट पीटचे कचरा कुंडीत रूपांतर झाले आहे. प्रसाधनगृहांचीही दुरवस्था झाली आहे. शहरात कचºयाचे ढिगारे वेळेवर उचलण्यात येत नाहीत. उघड्या वाहनांमधून कचºयाची वाहतूक केली जात आहे. स्वच्छ भारत अभियानावर केलेला सर्व खर्च व्यर्थ झाला आहे. पनवेलमध्ये ओला व सुका कचरा वेगळा केलाच जात नाही. दोन्ही महानगरपालिका स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचा दावा करत आहेत. परंतु प्रत्यक्षात फक्त स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय टीम येणार असली की स्वच्छतेवर लक्ष दिले जाते. स्पर्धा संपली की पुन्हा दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


पालिकेची मेहनत व्यर्थ
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., घनकचरा व्यवस्थापनाचे उपआयुक्त तुषार पवार व पालिकेचे सर्व अधिकारी स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लोकसहभाग वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रॅली आयोजित केल्या जात आहेत. परंतु प्रत्यक्षात नागरिक या चळवळीमध्ये सहभागीच होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जिथे स्वच्छतेचा संदेश देणारे फलक लावले आहेत त्याच ठिकाणी कचरा टाकला जात आहे. नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे या मोहिमेमध्ये सहभागी होण्याची आवश्यकता असून यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत काही अधिकारी व कर्मचाºयांनी व्यक्त केले आहे.

नवी मुंबईमधील स्वच्छतेची स्थिती
कचºयाचे ढिगारे वेळेवर उचलले जात नाहीत
स्वच्छतेचा संदेश लिहिलेल्या ठिकाणीच कचरा टाकला जात आहे
उद्यान व शाळेतील कंपोस्ट पीटची दुरवस्था झाली आहे
ओला व सुका कचरा वेगळा करण्याकडे दुर्लक्ष
अनेक ठिकाणी स्वच्छतागृह बंद अवस्थेमध्ये आहेत
स्वच्छतागृहांची देखभाल करण्यासाठी यंत्रणाच नाही

पनवेलमधील सद्यस्थिती पुढीलप्रमाणे
कचरा वाहतूक उघड्या वाहनांमधून केली जात आहे
कचºयाचे ढिगारे वेळेवर उचलले जात नाहीत
सार्वजनिक प्रसाधनगृहांची नियमित साफसफाई केली जात नाही
कचरा वर्गीकरण केले जात नाही
कंपोस्ट पीटचे कचरा कुुंडीत रूपांतर झाले आहे

Web Title: The expenditure on Swachh Bharat Abhiyan was waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.