महाराष्ट्र बंदला शहरात उत्स्फू र्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 06:45 AM2018-01-04T06:45:45+5:302018-01-04T06:46:03+5:30

भारिप बहुजन महासंघाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नवी मुंबईतून विविध संघटनांनी पाठिंबा देत, बंद १०० टक्के यशस्वी केला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने, व्यापारी संकुल सकाळपासूनच बंद होते.

 Excellent response to Maharashtra Bandala city | महाराष्ट्र बंदला शहरात उत्स्फू र्त प्रतिसाद

महाराष्ट्र बंदला शहरात उत्स्फू र्त प्रतिसाद

googlenewsNext

नवी मुंबई - भारिप बहुजन महासंघाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नवी मुंबईतून विविध संघटनांनी पाठिंबा देत, बंद १०० टक्के यशस्वी केला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने, व्यापारी संकुल सकाळपासूनच बंद होते. तर अनेकांनी विनाकारण घराबाहेर निघायचे टाळल्याने, शिवाय शाळा बंद असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता.
भीमा कोरेगाव येथील आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी महाराष्टÑ बंदची घोषणा केली होती. त्यानुसार राज्यभरासह नवी मुंबईतही कडकडीत बंद पाळण्यात आला. या दरम्यान, भीमसैनिकांनी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. दिघा येथे भीमसैनिकांनी शेकडोच्या संख्येने रस्त्यावर उतरून ठाणे-बेलापूर मार्ग बंद केला. शहराच्या प्रवेशद्वारावरच झालेल्या या आंदोलनामुळे ठाण्याकडून नवी मुंबईत येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पर्यायी पटनी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली होती. याकरिता रबाळे येथून दिघाच्या दिशेने जाणारा मार्ग रहदारीसाठी बंद करण्यात आला होता. दुपारच्या सुमारास आंदोलनांचे लोन संपुर्ण शहरात पसरले. या दरम्यान, तुर्भे, सीबीडी, सानपाडा, वाशी या ठिकाणी जमावाने रास्ता रोको करून आपला निषेध नोंदवला. या दरम्यान परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, याकरिता सर्वच ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. त्यांच्याकडून आंदोलकांना मार्गावरून हटवले जात असल्याने, काही ठिकाणी किरकोळ वादाचे प्रकार घडूनही ते सामंजस्याने मिटवले जात होते. घणसोली व कोपरखैरणे येथे शांततेत भव्य रॅली काढण्यात आली होती. आरपीआय व भारिप बहुजन महासंघ यांच्यासह रिपाई व इतर संघटनांच्या सहभागातून शहरात आंदोलने सुरू होती. या दरम्यान सिद्राम ओहोळ, मुकेश गायकवाड, विजय कांबळे, यशपाल ओहोळ, रमेश गांगुर्डे, सोमनाथ गायकवाड, प्रदीप वाघमारे, सतीश केदारे यांनी प्रत्येक ठिकाणी भेट देऊन आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन केले. रबाळे व तुर्भे रेल्वेस्थानकांत भीमसैनिकांनी रेल रोको करून आंदोलन केले. सुमारे ४० मिनिटांहून अधिक वेळ त्या ठिकाणी आंदोलन सुरू होते. यामुळे तणाव निर्माण झाला असता, पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढून रेल्वेवाहतूक सुरळीत केली.
या दरम्यान तुर्भे येथे रेल्वेवर दगड फेकल्याची घटना घडली. तर ठाणे-बेलापूर मार्गावर भूषण चौक येथे रास्ता रोको सुरू असताना, पोलिसांनी काही वाहने सोडण्याचा प्रयत्न केला. यामुळे आंदोलक व पोलिसांमध्ये वाद होऊन काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. सीबीडी पुलाखाली एका जमावाने रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला असता, वाहतूक पोलिसांनी त्यांना इतरत्र वळवून संभाव्य वाहतूककोंडी टाळली.

आंदोलनकर्त्यांनी द्रुतगती महामार्ग रोखला

आंबेडकरी संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पनवेल परिसरात प्रतिसाद मिळाला. कळंबोली, कामोठे वसाहतीत कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच भीमसैनिकांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग रोखला. त्याचबरोबर कळंबोली सर्कलला चारही बाजूने वाहने अडवली. यामुळे जेएनपीटी रोडवर दोन कि.मी.पेक्षा जास्त वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मानसरोवर रेल्वेस्थानकावर लोकलही रोखण्यात आली होती.
कामोठे वसाहतीत तर मंगळवारी सायंकाळपासून दुकाने बंद करण्यात आली होती. बुधवारी सकाळीही ती उघडली नाहीत. त्यामुळे मुख्य रस्त्यावर शुकशुकाट होता. कळंबोली वसाहतीतही या घटनेच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला. महिला, पुरुष त्याचबरोबर तरुण-तरुणी रस्त्यावर उतरले होते.
११ वाजण्याच्या सुमारास कामोठे आणि कळंबोलीतील आंबेडकरी अनुयायांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग रोखला.
कळंबोली सर्कलवरही आंदोलनकर्त्यांनी चारही बाजूने जाणाºया वाहनांना अडवून धरले. त्यामुळे अवजड वाहनांची रांग दुपारपर्यंत डी पॉइंटपर्यंत गेली होती. परिमंडळ -२ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजेंद्र माने, वाहतूक विभागाचे उपायुक्त नितीन पवार यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दंगल नियंत्रक पथकालाही पाचारण केले होते. कामोठे वसाहतीतील भीमसैनिकांनी मानसरोवर येथे रेल रोको केला.
पनवेल परिसरात हिंसक घटना घडल्यांची नोंद नाही. २ वाजता आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन थांबविले. त्यामुळे वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली. एसटी, एनएमएमटी, केडीएमटी, बेस्ट बसेस बंद असल्याने पनवेल परिसरातील प्रवाशांचे हाल झाले. काही काळ रेल्वेसेवा, रिक्षासुद्धा बंद होत्या, त्यामुळे तळोजा, पळस्पे या भागांत जाणाºया-येणाºया प्रवाशांचे हाल झाले. चार ते पाच तास प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले.
पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे, खारघर परिसरातील दुकाने, व्यवहार, व्यवसाय बंद पाडण्यात आले. आंदोलकांनी कळंबोली येथे सायन-पनवेल मार्ग रोखून धरला. दुकाने बंद ठेवण्यात आली होती. पेट्रोल पंप, बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या. मेडिकल, हॉस्पिटल, दवाखाने सुरू होते. शहरातील अनेक शाळांनी मुलांना पुन्हा घरी पाठवले. काही भागात सकाळी स्कूलव्हॅन अडविण्याच्या घटना घडल्या होत्या.

प्रवाशांचे हाल

पनवेलमध्ये आंदोलकांनी पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलाखाली सकाळपासून गाड्या अडवून ठेवल्या होत्या. त्यामुळे नागरिकांचा खोळंबा झाला. या वाहतूककोंडीचा रामशेठ ठाकूर यांनादेखील अडकून राहावे लागले. खारघर येथील मोर्चेकरांनी डिव्हायडरच्या कुंड्या रस्त्यावर फेकून दिल्या. अनेक ठिकाणची वाहने आंदोलनकर्त्यांनी अडवून ठेवली होती. तर नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपूलही अडवून ठेवण्यात आला होता. रिक्षा वाहतूक तुरळक प्रमाणात सुरू होती.

मेडिकल, हॉस्पिटल सुरू
नवी मुंबई १०० टक्के बंद होती; पण बंद करताना रुग्णांचे हाल होणार नाहीत, याची काळजी घेतली होती. शहरातील सर्व मेडिकल सुरू ठेवण्यात आली होती. आंदोलकांनीही मेडिकल चालकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली. रुग्णालयेही सुरू ठेवली होती. मेडिकल चालकांनीही आंदोलकांचे कौतुक केले. यामुळे शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणाºया रुग्णांची गैरसोय झाली नाही.
सर्व रस्ते मोकळे
बंदमुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. सायन-पनवेल महामार्गावरही वाहतूक तुरळक होती. कळंबोली व सानपाडा येथे महामार्ग रोखण्यात आला होता. अंतर्गत रोडवरही खूप कमी वाहने रोडवर दिसत होती. सायंकाळी संप मागे घेतल्यानंतर वाहतूक पूर्ववत होऊ लागली.
रिक्षा-टॅक्सी वाहतूक बंद
शहरात सकाळी काही प्रमाणात टॅक्सी व रिक्षा वाहतूक सुरू झाली होती; पण आंदोलनाची तीव्रता वाढताच रिक्षा व टॅक्सी वाहतूक पूर्णपणे बंद होती. काही टॅक्सींमध्ये चालक बसले होते; परंतु प्रवाशांना नम्रपणे, बंद असल्यामुळे सेवा देता येणार नसल्याचे सांगत होते.
शाळा-महाविद्यालयांत तुरळक उपस्थिती
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची किरकोळ उपस्थिती दिसून आली. सुरक्षेच्या कारणास्तव अनेकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविलेच नाही. शिवाय स्कूलबस आणि व्हॅनचालकांनी बंदला मंगळवारीच पाठिंबा दर्शविला होता. शिवशक्ती विद्यार्थी वाहतूक सेवाभावी संस्थेनेही या बंदला पाठिंबा दिला होता. संस्थेच्या सर्व स्कूल व्हॅन पूर्णत: बंद ठेवण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी दिली.

Web Title:  Excellent response to Maharashtra Bandala city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.