भाजपामुळे समीकरणे बदलली, किंगमेकर काँग्रेसमध्येच बंडखोरी, विरोधकांमधील मतभेद राष्ट्रवादीच्या पथ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 04:09 AM2017-11-04T04:09:35+5:302017-11-04T04:09:43+5:30

महापौर-उपमहापौर पदासाठीच्या उमेदवारीची उत्सुकता अखेर थांबली. भाजपाने शेवटच्या क्षणी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने सत्ता मिळविण्याचे शिवसेनेचे स्वप्न जवळपास धुळीस मिळाले आहे. पराभव समोर दिसताच शेवटच्या क्षणी उमेदवार बदलण्याची वेळ पक्षावर आली.

The equation changed due to BJP, Rajmekar Congress rebelled, anti-opposition differences on NCP's path | भाजपामुळे समीकरणे बदलली, किंगमेकर काँग्रेसमध्येच बंडखोरी, विरोधकांमधील मतभेद राष्ट्रवादीच्या पथ्यावर

भाजपामुळे समीकरणे बदलली, किंगमेकर काँग्रेसमध्येच बंडखोरी, विरोधकांमधील मतभेद राष्ट्रवादीच्या पथ्यावर

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : महापौर-उपमहापौर पदासाठीच्या उमेदवारीची उत्सुकता अखेर थांबली. भाजपाने शेवटच्या क्षणी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने सत्ता मिळविण्याचे शिवसेनेचे स्वप्न जवळपास धुळीस मिळाले आहे. पराभव समोर दिसताच शेवटच्या क्षणी उमेदवार बदलण्याची वेळ पक्षावर आली. अडीच वर्षे किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या काँगे्रसमध्येच बंडखोरी होवून उपमहापौरपदासाठी दोन अर्ज दाखल झाले आहेत. विरोधकांमधील मतभेद राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडले. त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला असून, मतांसाठीचा घोडेबाजारही जवळपास थांबला आहे.
नवी मुंबईचे १३ वे महापौर कोण होणार याविषयी दोन महिन्यांपासून शहरात उत्सुकता निर्माण झाली होती. राष्ट्रवादी काँगे्रसकडून महापालिकेची सत्ता हिसकावून घेण्याची रणनीती शिवसेनेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आखली होती. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली होती. राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये फूट पाडून काँगे्रस व अपक्षांच्या मदतीने महापौरपद मिळविण्यात येणार होते. राष्ट्रवादीचे सहा नगरसेवक शिवसेनेने फोडले होते. अजून सहा जण संपर्कात होते. काँगे्रसचा एक गटही शेवटपर्यंत सेनेला पाठिंबा देण्याची भाषा बोलू लागला होता. शिवसेनेच्या हालचालीमुळे राष्ट्रवादीचे धाबे दणाणले होते. स्वत: गणेश नाईक प्रत्येक नगरसेवकांना भेटून दगा देवू नका, असे आवाहन करत होते. राष्ट्रवादीला धक्का बसणार हे जवळपास निश्चित झाले असताना वरिष्ठ पातळीवरून अचानक सूत्रे हलली. गुरुवारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही. मतदानाच्यावेळी भूमिका स्पष्ट करू असे सांगितल्यामुळे शिवसेना नेत्यांचे अवसान गळाले व शुक्रवारी सकाळी अचानक महापौरपदासाठी सोमनाथ वास्कर यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना करण्यात आल्या. उपमहापौरपदासाठीही गटनेते द्वारकानाथ भोईर यांनी अर्ज भरला. अर्ज भरताना पक्षाचा एकही महत्त्वाचा नेता हजर नसल्याने सेनेने पराभव मान्य केल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात पसरली होती.
निवडणुकीपूर्वीच भाजपाने शिवसेनेला जबरदस्त झटका दिला असून महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न जवळपास धुळीस मिळविले आहे. भाजपाच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँगे्रसच्या गोटामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अडीच वर्षांमध्ये काँगे्रस किंगमेकरच्या भूमिकेमध्ये होती. त्यांच्या पाठिंब्यामुळेच राष्ट्रवादीची सत्ता टिकून आहे. तरीही २०१६ मध्ये काँगे्रसच्या एक मताच्या बळावर राष्ट्रवादीने स्थायी समितीचे सभापतीपद मिळविले होते. महापौर पदाच्या निवडणुकीमध्येही त्यांचा भाव वधारला होता. पण उपमहापौर पदासाठी जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांच्या पत्नी वैजयंती भगत यांचा पत्ता कापून पक्षश्रेष्ठींनी मंदाकिनी म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे काँगे्रसमधील गटबाजी उघड झाली आहे. भाजपाच्या तटस्थतेमुळे शिवसेनेच्या संपर्कात असलेल्या काँगे्रसनेही सेना नेत्यांना नकार कळविला आहे.

कुठे कमी पडलो हे पक्षश्रेष्ठींना विचारणार - दशरथ भगत
काँगे्रसचे जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांच्यावरच बंडखोरी करून पत्नीचा उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली आहे. याविषयी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पक्षाशी एकनिष्ठपणे काम करत आहे. नवी मुंबईमध्ये काँग्रेस वाढविण्यासाठी प्रयत्न केले. आंदोलने केली. अनेक उपक्रम राबविले. पक्षाकडून कोणतीही अपेक्षा केली नाही. घरातील तीन नगरसेवक असतानाही दोन वर्षे स्थायी समितीसाठी पक्षातील महिला सदस्यांना प्राधान्य दिले. उपमहापौरपदासाठी नाव निश्चित असताना शेवटच्या क्षणी त्यामध्ये बदल का केला हे समजले नाही. पक्षश्रेष्ठींची भेट घेवून कुठे कमी पडलो याविषयी विचारणा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पक्षातील इतर नगरसेवकही नाराज आहेत. पक्षाचा आदेश म्हणून ते अर्ज भरताना निरीक्षकांसोबत होते असेही त्यांनी स्पष्ट केले असून सविस्तर भूमिका लवकरच मांडणार असल्याचेही स्पष्ट केले.

जातीच्या दाखल्यामुळे सेनेने उमेदवार बदलला
शिवसेनेच्यावतीने विजय चौगुले यांची उमेदवारी अंतिम समजली जात होती. भाजपाच्या तटस्थतेमुळे व काँगे्रसनेही शेवटच्या क्षणी पाठिंब्याला नकार दिल्याने उमदेवार बदलण्यात आल्याची चर्चा आहे. परंतु जातीच्या दाखल्यातील तांत्रिक चुकीला कोकण आयुक्तांनी आक्षेप घेतला. विजय चौगुले यांच्या दाखल्यामध्ये विजयकुमार असा उल्लेख होता. तांत्रिक अडचणीमुळे चौगुले यांनी उमेदवारी मागे घेतली असल्याचे स्पष्टीकरण पक्षाच्यावतीने देण्यात आले आहे. शिवसेना पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढविणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सौ सोनार की एक लोहार की
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष अनंत सुतार यांनी महापौर राष्ट्रवादीचाच होणार असल्याचा दावा केला. विरोधकांनी आमच्या पक्षात फूट पाडण्याच्या वल्गना केल्या होत्या. घोडेबाजार सुरू असल्याची चर्चा होती. आम्ही शांत राहून सर्व पहात होतो. आमचे नेते गणेश नाईक यांची रणनीती यशस्वी झाली असून सौ सोनार की एक लोहार की हे शहरवासीयांना पटले असून प्रत्यक्ष निवडणुकीमध्येही आमचे एकही मत फुटणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

तटस्थ राहण्याचा मुख्यमंत्र्यांचा निरोप
भाजपाचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सद्यस्थितीमध्ये महापौर व उपमहापौर निवडणुकीमध्ये भाजपाची काहीही भूमिका नाही. पक्षनेतृत्वाने तटस्थ राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे ९ नोव्हेंबरला कोणाच्या बाजूने मतदान करायचे की तटस्थ राहायचे हे निश्चित केले जाईल असे स्पष्ट केले. घरत यांनी स्पष्ट केले नसले तरी मुख्यमंत्र्यांनीच तटस्थतेच्या सूचना दिल्या असल्याची चर्चा शहरामध्ये सुरू आहे.

९ नोव्हेंबरला होणार शिक्कामोर्तब
महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले असून ९ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. दोन महिन्यांपासून सत्तांतर होण्याची चर्चा उमेदवारी अर्ज भरताना थांबल्याचे चित्र पहावयास मिळाले. हात वर करून मतदान होणार असल्याने शक्यतो मतांची विभागणी होणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेने सत्ता मिळविणारच असा दावा केला आहे. यामुळे अजून शेवटच्या क्षणी ते काय धक्कातंत्राचा वापर करणार की राष्ट्रवादीची सत्ता विनासायास येणार हे मतदानादिवशीच स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादीची चाणक्यनीती
महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने सत्ता मिळविण्याच्या घोषणा अनेक वेळा केली. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही पुढचा महापौर सेनेचाच अशी घोषणा ऐरोलीत केली होती. परंतु राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी काहीही भाष्य केले नाही. नाराज नगरसेवकांच्या घरी जावून भेट घेतली. भेटीला बोलावून आवाहन केले.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगून काँगे्रसच्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधला. शरद पवार यांनी भाजपाच्या नेत्यांशीही संवाद साधल्याचे बोलले जात आहे. स्वत: गणेश नाईक दोन दिवस हॉटेल ताजमध्ये थांबून वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलवत होते.

प्रदेशअध्यक्षांच्या निष्ठेचा म्हात्रेंना लाभ
काँगे्रसने शेवटच्या क्षणी उपमहापौरपदासाठी मंदाकिनी म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निरीक्षक भाई जगताप, विद्यमान उपमहापौर अविनाश लाड यांच्यासह पक्षाचे तीन वगळता उर्वरित सर्व ७ नगरसेवक उपस्थित होते. म्हात्रे यांचे पती रमाकांत म्हात्रे हेही यापूर्वी उपमहापौर होते. प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. चव्हाण उद्योगमंत्री, मुख्यमंत्री ते प्रदेशअध्यक्ष प्रत्येक टप्प्यावर म्हात्रे त्यांच्यासोबत निष्ठावानपणे वावरत असल्यामुळेच त्यांच्या उपमहापौरपदाची उमेदवारी मिळाल्याचे बोलले जात आहे. याशिवाय मागील अडीच वर्षे बेलापूर मतदार संघाला उमेदवारी होती यामुळे यावेळी ऐरोली मतदार संघास प्राधान्य दिल्याचेही बोलले जात आहे.

काँगे्रस एकसंध राहील - भाई जगताप
काँगे्रसची भूमिका पक्षाचे निरीक्षक भाई जगताप यांनी व्यक्त केली. पक्षात सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पक्षाच्यावतीने मंदाकिनी रमाकांत म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांच्या पत्नी वैजयंती भगत यांनीही अर्ज दाखल केला आहे. परंतु त्यांची समजून घातली जाईल. मतदानादिवशी काँगे्रस एकसंध असल्याचे चित्र सर्वांना पहावयास मिळेल. भगत हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. युवक काँगे्रसचे अध्यक्ष व नंतर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले काम केले असून त्यांची नाराजी दूर केली जाईल, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.

Web Title: The equation changed due to BJP, Rajmekar Congress rebelled, anti-opposition differences on NCP's path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.