अभियांत्रिकी विभागाचा डोलारा ढासळतोय, कनिष्ठ अभियंत्यांची कमतरता : शहरातील विकासकामांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 03:06 AM2017-10-14T03:06:50+5:302017-10-14T03:07:03+5:30

शहरातील विकासाचे नियोजन व अंमलबजावणी करणा-या अभियांत्रिकी विभागाचा डोलारा ढासळू लागला आहे. पालिकेत ४२ कनिष्ठ अभियंत्यांची कमतरता आहे.

 Engineering Department's Dolara Dhasalotey, shortage of junior engineers: Impact on development work in the city | अभियांत्रिकी विभागाचा डोलारा ढासळतोय, कनिष्ठ अभियंत्यांची कमतरता : शहरातील विकासकामांवर परिणाम

अभियांत्रिकी विभागाचा डोलारा ढासळतोय, कनिष्ठ अभियंत्यांची कमतरता : शहरातील विकासकामांवर परिणाम

Next

नामदेव मोरे 
नवी मुंबई : शहरातील विकासाचे नियोजन व अंमलबजावणी करणा-या अभियांत्रिकी विभागाचा डोलारा ढासळू लागला आहे. पालिकेत ४२ कनिष्ठ अभियंत्यांची कमतरता आहे. दोन कार्यकारी अभियंता निलंबित झाले असून दोघे निवृत्त झाले आहेत. व्यवस्थेला कंटाळून एक वरिष्ठ अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या मार्गावर आहे. मनुष्यबळ कमी असल्याचा परिणाम विकासकामांवर होवू लागला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू आहे. २५ वर्षांच्या कार्यकाळात महापालिकेने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सर्व महत्त्वाचे पुरस्कार मिळविले आहेत. देशातील आठव्या क्रमांकाचे व राज्यातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणूनही पुरस्कार मिळाला आहे. मलनि:सारण, पाणीपुरवठा, ई-गव्हर्नन्स, पावसाळी पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठीची यक्षम यंत्रणा उभी करण्यासाठीही महापालिकेला पुरस्कार मिळाला आहे. शहराचा नावलौकिक वाढविण्यामध्ये महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाचा मोठा वाटा आहे. नुकत्याच २९ आॅगस्टला झालेल्या अतिवृष्टीमध्ये मुंबई, ठाणे, पनवेलमध्ये हाहाकार उडाला. जनजीवन सुरळीत होण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागला. परंतु नवी मुंबईमध्ये अभियांत्रिकी विभागाच्या दक्षतेमुळे पाऊस बंद होताच दोन तासात सर्व स्थिती पूर्वपदावर आली. अभियांत्रिकी विभागाने शहरामध्ये पाणीपुरवठ्याचे सक्षम जाळे उभे केले आहे. पावसाळी गटारे, महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण, मलनि:सारण वाहिनी, डंपिंग ग्राउंड उभारण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परंतु दोन वर्षांपासून या विभागाकडे अक्षम्य दुर्लक्ष होवू लागले आहे. अभियांत्रिकी विभागातील अधिकाºयांचे खच्चीकरण करण्याचे काम महापालिकेमध्ये पद्धतशीरपणे सुरू आहे. वारंवार आरोपीच्या पिंजºयामध्ये उभे केले जात असून या विभागाच्या समस्या सोडविण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होवू लागले आहे.
शहरातील गटार दुरुस्तीपासून सर्व बांधकामांची जबाबदारी असलेल्या अभियांत्रिकी विभागामध्ये कनिष्ठ अभियंत्यांपासून ते कार्यकारी अभियंता पदापर्यंत मनुष्यबळाची प्रचंड कमतरता आहे. मोरबे धरण प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या जसवंत मिस्त्री व कार्यकारी अभियंता रवींद्र भोगावकर निवृत्त झाले आहेत. कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे व शंकर पवार या दोघांना निलंबित करून एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे. त्यांचे निलंबन रद्द झालेले नाही व चौकशी करून ठोस कार्यवाहीही झालेली नाही. दोन कार्यकारी अभियंता निवृत्त व दोन निलंबित झाले आहेत. याशिवाय हरीश चिचारीया हे अजून एक कार्यकारी अभियंता स्वेच्छा निवृत्ती घेण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे महत्त्वाच्या पदांवर अधिकारीच नसून जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. कनिष्ठ अभियंता हा अभियांत्रिकी विभागाचा कणा आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये तब्बल ४२ कनिष्ठ अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे विकासकामांची फाईल तयार करण्यासाठीच मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने अत्यावश्यक कामे होण्यास विलंब होतो. आवश्यक मनुष्यबळ कधी उपलब्ध होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एका झाकणासाठी
दीड वर्ष निलंबन
महापालिकेमधील मदन वाघचौडे व शंकर पवार या दोघांना तुकाराम मुंढे आयुक्त असताना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय तुर्भे विभाग कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या संजय खरात या उपअभियंत्यांलाही जुलै २०१६ मध्ये निलंबित केले आहे. गटारावर एक झाकण वेळेवर लावले नसल्याने कारवाई करण्यात आले. जवळपास दीड वर्षाचा कालावधी होत असून क्षुल्लक चुकांसाठी एवढी शिक्षा का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
अभियंत्यांच्या कामाचे कौतुक नाही
महापालिकेला मिळालेल्या पुरस्कारांमध्ये अभियांत्रिकी विभागाचा वाटा महत्त्वाचा आहे. पाणीपुरवठा, रस्ते, मलनि:सारण वाहिन्यांसह सर्व प्रकारच्या दर्जेदार सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्यानंतरही त्यांच्या कामांचे कौतुक होत नाही. उलट त्यांनाच वारंवार आरोपीच्या पिंजºयामध्ये उभे केले जात आहे. यामुळे मोठ्याप्रमाणात खच्चीकरण होत असून ते कधी थांबविले जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चार महत्त्वाची पदे रिक्त
अभियांत्रिकी विभागामधील दोन कार्यकारी अभियंता निवृत्त झाले असून दोन निलंबित झाले आहेत. हरिष चिचारीया हे अजून एक कार्यकारी अभियंता स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे महापालिकेच्या कामाचा डोलारा ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विकासकामांवर परिणाम होवू लागला असून लवकरात लवकर ही चारही पदे भरण्यात यावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title:  Engineering Department's Dolara Dhasalotey, shortage of junior engineers: Impact on development work in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.