Dumping ground issue, anti-people aggressor: warning of closure of Standing Committee | नवी मुंबई : डम्पिंग ग्राउंडचा विषय पेटणार, लोकप्रतिनिधी आक्रमक : स्थायी समितीचे कामकाज बंद पाडण्याचा इशारा

नवी मुंबई : तुर्भे डम्पिंग ग्राउंडच्या विषयावरून लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत. शासनाकडून तत्काळ जमीन हस्तांतर करून घ्यावी. योग्य मार्ग निघाला नाही, तर पुढील स्थायी समितीची सभा होऊ देणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपली आहे. कचºयाची टेकडी तयार होऊ लागली आहे. कचºयामुळे तुर्भे स्टोअर्स परिसरामध्ये तीव्र दुर्गंधी पसरू लागली आहे. येथील रहिवासी व शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासनाने नवीन जमीन देण्यासाठी पैशांची मागणी केली असल्यामुळे जमीन हस्तांतरण रखडले आहे. या विषयाचे पडसाद स्थायी समितीमध्ये उमटले. राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी प्रशासनास धारेवर धरले.
डम्पिंग ग्राउंडची क्षमता व मुदत संपली आहे. कचºयाचे ढिगारे उभे केले जात आहेत. आम्ही एक वर्षापासून सेल बंद करण्याची मागणी करत आहोत; परंतु प्रशासन दुर्लक्ष करत आहे. राज्य शासनाकडेही पाठपुरावा केला आहे; पण पालिकेने स्मार्ट सिटीसाठी केलेल्या विरोधामुळे शासनाकडून सहकार्य होत नाही. जमिनीसाठी पैशांची मागणी केली जात आहे. महापालिका श्रीमंत आहे. यामुळे वेळ पडल्यास शासनाकडे पैसे भरून जमीन ताब्यात घ्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असे स्पष्ट केले. महानगरपालिका प्रशासनाने एक आठवड्यात ठोस निर्णय घ्यावा. डम्पिंग ग्राउंडचा विषय सोडविला नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. पुढील आठवड्यात स्थायी समितीची बैठक चालू देणार नसल्याचा इशाराही सुरेश कुलकर्णी यांनी दिला आहे. यामुळे पुढील काळात कचºयाचा प्रश्न पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.