नवी मुंबई : व्यापा-याकडून घेतलेल्या कर्जातून सुटका मिळवण्यासाठी दरोड्याचा कट रचणा-या पोलीस पत्नीला साथीदारांसह पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून ८० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला असून त्यांच्या इतर तीन साथीदारांचा शोध सुरु आहे. दरोडा टाकतेवेळी गुन्हेगारांनी व्यापाºयाच्या पत्नीकडे ठरावीक कागदपत्रांची चौकशी केल्यामुळे शिवाय संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाल्यामुळे हा गुन्हा उघडकीस आला.
अनिता म्हसाणे (३९) असे पोलिसांनी अटक केलेल्या पोलीस पत्नीचे नाव आहे. ती खारघरची राहणारी असून पती नवी मुंबई पोलीस दलात आहेत. १७ आॅक्टोबर रोजी वाशीतील व्यापारी अरुण मेनकुदळे यांच्या घरी दरोडा पडला होता. यावेळी दरोडेखोरांनी मेनकुदळे यांच्या पत्नी व मुलीला पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून २ कोटी ९ लाखांचा ऐवज लुटला होता. त्यामध्ये रोख रक्कम, सोन्याचे दागिने तसेच काही महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश होता. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दहाहून अधिक तपास पथके तयार करण्यात आली होती. तपासादरम्यान दरोडेखोरांनी ठरावीक कागदपत्रांची चौकशी केल्याची बाब पोलिसांसमोर आली. त्यामुळे मेनकुदळे कुटुंबाने अनिता म्हसाणे हिच्यावर संशय व्यक्त केला होता. मेनकुदळे यांच्यासोबत केलेल्या व्यवहारातील दीड लाख रुपये अनिता हिच्याकडे होते. मात्र ते देवू न शकल्याने तिने घराची कागदपत्रे मेनकुदळे यांच्याकडे दिली होती. ही कागदपत्रे परत मिळवण्याच्या उद्देशाने व आर्थिक गरज भागवण्यासाठी तिने मेनकुदळे यांच्या घरावर दरोड्याचा कट रचला होता. रिअल इस्टेटच्या व्यवसायातून ओळख असलेल्या शंकर तेलंगे याला तिने मेनकुदळे यांच्याविषयीची माहिती दिली होती. त्यानुसार तेलंगे याने त्याच्या इतर काही साथीदारांसोबत मिळून
कुरिअर पोचवण्याच्या बहाण्याने मेनकुदळे यांच्या घरी जावून दरोडा टाकला होता.
याप्रकरणी पोलिसांनी काही तासातच संशयित म्हणून अनिता म्हसाणे हिला ताब्यात घेतले असता, तिने पोलिसांना आव्हान दिले होते. म्हसाणे हिची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून यापूर्वी तिच्यावर फसवणूक व दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. अखेर वाशी पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांनी राज्यात व राज्याबाहेर सापळा रचून तिच्या सहा साथीदारांना अटक केली आहे.
सुभाष श्रीधर पाटील (३६), खुशी जिब्राईल खान (२७), सनी सुहास शिंदे (२९), शंकर रामचंद्र तेलंगे (३८), जिब्राईल खान (३६) व फिरोज शेख (२७) अशी त्यांची नावे आहेत. सर्व जण मुंब्रा व ठाणे परिसरातील राहणारे आहेत.
दरोड्यानंतर त्यांना विविध राज्यातून अटक केल्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर त्यांच्याकडून गुन्ह्यातील ८० लाखांचा ऐवज जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी सह आयुक्त प्रशांत बुरडे, उपआयुक्त तुषार दोशी, सह आयुक्त नितीन कौसडीकर आदी उपस्थित होते.