मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, सोसाट्याच्या वा-यामुळे नागरिकांची तारांबळ; महामार्गासह सखल भागात साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 02:33 AM2017-09-20T02:33:55+5:302017-09-20T02:33:57+5:30

शहरात मंगळवारी दुपारपासून पावसाने पुन्हा जोर धरला. सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या जोरदार सरींमुळे नवी मुंबईकरांची तारांबळ उडाली. वादळी वाºयामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या तर शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले होते.

Due to heavy rains, people's lives are disrupted due to heavy rains; Water in the lower areas with highway | मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, सोसाट्याच्या वा-यामुळे नागरिकांची तारांबळ; महामार्गासह सखल भागात साचले पाणी

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, सोसाट्याच्या वा-यामुळे नागरिकांची तारांबळ; महामार्गासह सखल भागात साचले पाणी

Next

नवी मुंबई : शहरात मंगळवारी दुपारपासून पावसाने पुन्हा जोर धरला. सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या जोरदार सरींमुळे नवी मुंबईकरांची तारांबळ उडाली. वादळी वा-यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या तर शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले होते. झोपडपट्टी परिसरातील घरांवरील पत्रे उडाल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. पावसाच्या या दमदार हजेरीमुळे सायन-पनवेल महामार्ग, तसेच ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
पावसामुळे वातावरणातही बदल झाला आहे. अशा वातावरणामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता आहे. पावसाबरोबर सोसाट्याच्या वाºयामुळे हवेत गारवा पसरला आहे. शहरात अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. महानगरपालिका आपत्कालीन विभाग, तसेच अग्निशमन दलाला मिळालेल्या माहितीनुसार नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यात आली. सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत बेलापूर विभागात ७९.३ मि.मी., नेरुळ विभागात ६६.६ मि.मी., वाशी विभागात ६२.२ मि.मी. आणि ऐरोली विभागात २३.३ मि.मी. पावसाची नोंद झाली. शहरात सरासरी ५७.९५ मि.मी. पाऊस झाला. महानगरपालिकेच्या वतीने हिवताप, डेंग्यू यासारख्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. नागरिकांनी पाणी साठवून ठेवलेली भांडी रिकामी करावीत, तसेच पावसाचे पाणी साचलेल्या जागेवरील पाण्याचाही निचरा करावा, असे आवाहन केले जात आहे.
>विजेचा लपंडाव
सोसाट्याच्या वाºयासह झालेल्या या पावसामुळे अनेक परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. वारा आणि पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि झाडांच्या फांद्या कोसळल्या. त्यामुळे काही भागात वीजवाहिन्या तुटल्या. तसेच काही भागात भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. काही ठिकाणी खबरदारी म्हणून महावितरणच्या वतीने वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
>पनवेलला झोडपले
पनवेल तालुक्यात ठिकठिकाणी पाणी साचले होते. सायन-पनवेल महामार्ग, मुंबई-गोवा महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. अवघ्या काही तासांत पनवेल शहरात १०० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. मंगळवारी दुपारनंतर पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली. सायन- पनवेल महामार्गावर कळंबोली, खारघर टोल नाक्याजवळ दोन लेन पाण्याखाली गेल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने कामावरून परतणाºया नोकरदारांचे हाल झाले. पावसाने उसंत घेतल्याने बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले होते. मात्र पावसाने कामात अडथळा आणल्याने खड्डे जैसे थे राहणार आहेत.
>भुयारी मार्ग पाण्यात
सानपाडा रेल्वे स्थानकातील भुयारी मार्गात पाणी साचले असून, आपत्कालीन विभागाच्या वतीने या पाण्याचा निचरा करण्यात आला. तसेच घणसोली येथील भुयारी मार्गात पाणी साचल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पाणी साचल्याने गाड्या बंद पडल्याच्या घटना घडल्या असून, यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली.
>उरणकरांना पावसाने झोडपले
मंगळवारी दुपारी १ वाजल्यापासून कोसळणाºया जोरदार पावसाने उरणकरांना झोडपून काढले. पावसाच्या संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले असून, उरण शहर आणि परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार कोसळणाºया पावसामुळे आणि खराब हवामानामुळे दुपारनंतर स्पीड बोटीची वाहतूक वगळता भाऊचा धक्का ते मोरा आणि भाऊचा धक्का ते रेवस दरम्यानची वाहतूक बंद पडली आहे. याठिकाणी पावसादरम्यान काही तास बत्ती गुल झाली होती. शहरातील वैष्णवी हॉटेल ते कुंभारवाडा, आपला बाजार ते साठे हॉटेल, एनआय हायस्कूल, गणपती चौक आदी रस्त्यावर पाणी जमा झाले होते. ग्रामीण भागातील चिरनेर, भेंडखळ, नवघर, करंजा, केगाव, पागोटे आदी गावात पावसाचे पाणी शिरले होते. जेएनपीटी परिसरातील काही रस्तेही पाण्याखाली गेले होते. उरण परिसरात पावसाच्या दमदार एंट्रीने शहर, गावातील नाले, गटारे तुडुंब भरून वाहू लागले आहे. खराब हवामानामुळे दुपारनंतर स्पीड बोटीची वाहतूक वगळता भाऊचा धक्का ते मोरा आणि भाऊचा धक्का ते रेवस दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
>अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या सामन्यांकरिता महापालिकेने शहरातील रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
महामार्गावरील खड्डे बुजविणे तसेच पावसामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. रस्त्यावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू असल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

Web Title: Due to heavy rains, people's lives are disrupted due to heavy rains; Water in the lower areas with highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.