Dr. Domboy marble cover of Ambedkar memorial | डॉ. आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बल आच्छादन
डॉ. आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बल आच्छादन

नवी मुंबई : ऐरोली सेक्टर-१५मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकास मार्बल आच्छादन लावण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर मार्बल लावण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. १३ कोटी चार लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. अंतर्गत सजावटीचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला असून, दहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
महानगरपालिकेने ऐरोलीमध्ये उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बल आच्छादन लावण्याचा प्रस्ताव २०१६मध्ये सर्वसाधारण सभेने मंजूर केला होता; पण तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी डोमला मार्बल लावण्याचा प्रस्ताव रद्द करून सफेद रंग लावण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे लोकप्रतिनिधींनी व नागरिकांनी आंदोलन करून मार्बलच बसविण्यात यावे, असा आग्रह धरला होता. मुंढे यांची बदली झाल्यानंतर विद्यमान आयुक्त रामास्वामी एन. यांनी लोकआग्रहास्तव मार्बल लावण्याचा निर्णय घेऊन निविदा प्रक्र्रिया सुरू केली होती. मंगळवारी या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली. या स्मारकाची भव्यता लक्षात घेता, दिल्लीतील लोटस टेंपलप्रमाणे मार्बल लावण्यात येणार असून, अंबाजी मार्बलची निवड करण्यात आली आहे. १३ कोटी चार लाख ७८ हजार ४०० रुपयांना हे काम अश्विनी इन्फ्राडेव्हलपमेंट कंपनीला देण्यात आले आहे. एका वर्षामध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. स्थायी समितीने गतआठवड्यात स्मारकाच्या अंतर्गत सजावटीच्या प्रस्तावासही मंजुरी दिली आहे. स्मारकामधील फ्लोरिंगमध्ये किरकोळ बदल करणे, फर्निचर व इतर कामे करण्यासाठीचा ठेका श्रीस्टी इंटरप्रायझेस कंपनीला देण्यात आला आहे. यासाठी १० कोटी ३३ लाख रुपये खर्च येणार आहे. एका वर्षामध्ये अंतर्गत सजावटीचे कामही पूर्ण केले जाणार आहे. मार्बल व अंतर्गत सजावटीचे काम पूर्ण झाल्यानंतर स्मारकाचे काम पूर्ण होणार आहे. दोन्ही कामे वेळेत पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली आहे.
>ठेकेदाराच्या पात्रतेविषयी शंका
अश्विनी इन्फ्राडेव्हलपमेंट या ठेकेदाराने अंतर्गत सजावटीचा ठेका घेण्यासाठी निविदा सादर केली होती; पण त्यांना तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरवले होते. श्रीस्टी या ठेकेदाराला अंतर्गत सजावटीचे काम दिले; पण डोमचे काम अश्विनीला देण्यात आले आहे. यावर पुन्हा सदस्यांनी आक्षेप घेतला. दोन वेगवेगळे ठेकेदार एकाच कालावधीत काम कसे पूर्ण करणार? असा प्रश्नही उपस्थित केला.


Web Title: Dr. Domboy marble cover of Ambedkar memorial
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.