डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दृष्टिपथात; पहिल्या टप्प्याचे आज उद्घाटन, आठ वर्षांची प्रतीक्षा संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 05:39 AM2017-11-01T05:39:56+5:302017-11-01T05:40:41+5:30

ऐरोलीमध्ये उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे १ नोव्हेंबरला उद्घाटन होत आहे. आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्मारक दृष्टिपथात येऊ लागले आहे. स्मारकासाठीच्या जागेपासून ते डोमला मार्बल लावण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर आंबेडकरी जनतेला संघर्ष करावा लागला आहे.

Dr. Babasaheb Ambedkar memorial is in sight; Inauguration of the first phase of the first phase, eight years of waiting has been completed | डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दृष्टिपथात; पहिल्या टप्प्याचे आज उद्घाटन, आठ वर्षांची प्रतीक्षा संपली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दृष्टिपथात; पहिल्या टप्प्याचे आज उद्घाटन, आठ वर्षांची प्रतीक्षा संपली

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : ऐरोलीमध्ये उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे १ नोव्हेंबरला उद्घाटन होत आहे. आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्मारक दृष्टिपथात येऊ लागले आहे. स्मारकासाठीच्या जागेपासून ते डोमला मार्बल लावण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर आंबेडकरी जनतेला संघर्ष करावा लागला आहे. पहिल्या टप्प्याचे उद्घाटन हा आनंदाचा क्षण असला तरी स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी डोळ्यात तेल घालून दक्ष राहावे लागणार आहे.
‘शिका संघटित व्हा व संघर्ष करा’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेला मूलमंत्र दिला. देशभरातील आंबेडकरी जनतेला महामानवाचे स्मारक उभारण्यासाठीही संघर्ष करावा लागत असून, नवी मुंबईही त्यासाठी अपवाद ठरली नाही. देशातील सर्वात भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय महानगरपालिकेने २००९ मध्ये घेतला. १० फेब्रुवारी २००९ मध्ये सर्वसाधारण सभेने ऐतिहासिक निर्णय घेतला. मुलुंडवरून नवी मुंबईत प्रवेश करत असताना मुख्य रोडला लागून असलेल्या मैदानामध्ये स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी आंबेडकरी जनतेने केली, परंतु त्या भूखंडावर मैदानाचे आरक्षण होते. आरक्षण बदलण्याचे अधिकार राज्य मंत्रिमंडळाला होते.
महापालिकेने हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला व तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आरक्षण बदलून स्मारकाच्या कामास हिरवा कंदील दाखविला. निविदा प्रक्रिया पूर्ण करून ६ एप्रिल २०११ रोजी प्रत्यक्ष स्मारकाचे काम सुरू करण्यात आले. ५ एप्रिल २०१३ रोजी काम पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु काम पूर्ण करण्याची मुदत संपली तरी प्रत्यक्षात डोमच्या कामालाही सुरवात झाली नव्हती. प्रथम ६०० मीटर व्यासाची भूमिगत जलवाहिनी स्थलांतर करण्यासाठी विलंब झाला. बांधकामासाठी रेतीचा तुटवडा निर्माण झाला. व्हीजेटीआयकडून स्टेजिंग व शटरिंग डिझाइन मंजूर होण्यास झालेला विलंब व डोमचे रखडलेले काम या विविध कारणांनी स्मारकाचे काम वेळेत होऊ शकले नाही.

महापौरांचा पाठपुरावा : शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्यात यावी अशी मागणी विद्यमान महापौर सुधाकर सोनावणे यांनी ते नगरसेवक असताना सभागृहात केली. तेव्हापासून दहा वर्ष सतत त्यांनी या विषयाचा पाठपुराव केला आहे. २०१६ मध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी डोमला मार्बल लावण्यास विरोध केल्यानंतर सोनावणे यांनी सर्व पक्षीय नगरसेवक व जनतेला एकत्र करून संघर्ष उभा केला व हा प्रश्न मार्गी लावला.

आंबेडकरी जनतेचे योगदान : स्मारक उभारण्यामध्ये शहरामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालविणाºया संस्था, संघटना व राजकीय पदाधिकाºयांनीही महत्वाची भुमीका बजावली. आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओहोळ यांनीही दहा वर्ष या विषयाचा पाठपुराव केला. काँगे्रसच्या गटनेत्या हेमांगी सोनावणे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून या विषयी आवाज उठविला. शिवसेनेचे संजू वाडे यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाचा जाहीर निशेध करून आंदोलनामध्ये सक्रीय सहभाग घेतल्या. यांच्याबरोबर अनेक सामाजीक व राजकीय कार्यकर्त्यांनी नेहमीच स्मारकासाठीच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवले होते.

‘लोकमत’चाही दहा वर्षे पाठपुरावा
नेरूळमधील आगरी कोळी भवन व ऐरोलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्यासाठी ‘लोकमत’ने सर्वाधिक पाठपुरावा केला. स्मारकाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी सातत्याने विशेष वृत्त प्रसिद्ध केले. तुकाराम मुंढे यांनी डोमला मार्बल लावण्यास विरोध केल्यानंतर आंबेडकरी जनतेच्या भावनांना सातत्याने प्रसिद्धी दिली. ‘लोकमत’च्या पाठपुराव्याची दखल घेऊन यापूर्वीच आंबेडकरी जनतेने वरिष्ठ पत्रकार नारायण जाधव यांना पुरस्कार देऊनही सन्मानित केले होते.

उद्घाटनाला दिग्गजांची उपस्थिती
पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. या वेळी महापौर सुधाकर सोनावणे यांच्या जीवनावर लिहिलेल्या ‘परीस गवसलेला माणूस’ या आत्मचरित्राचेही प्रकाशन करण्यात येणार आहे. आठ वर्षांपासून आंबेडकर भवनच्या उद्घाटनाची प्रतीक्षा होती.

देशातील सर्वात भव्य स्मारक उभे राहावे ही सर्वांचीच इच्छा असल्याने यासाठी निधीची कमतरता भासणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली. २०१६ मध्ये डोमला मार्बल लावण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु मार्बलच्या प्रस्तावास तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विरोध केला व पुन्हा नवीन संघर्ष निर्माण झाला.
सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व आंबेडकरी जनता मार्बलच्या मुद्द्यावर ठाम होती. यासाठी महापालिका सभागृहात लक्षवेधीही मांडण्यात आली. रोडवर उतरून आंदोलने करण्यात आली. अखेर शासनाने मुंढे यांची बदली केली व विद्यमान आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी लोकभावनेचा आदर करून मार्बलच्या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला.
सजावटीचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे. स्मारकामधील एका सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले असल्यामुळे त्याचे उद्घाटन १ नोव्हेंबरला केले जात असून त्यामुळे आंबेडकरी जनतेमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आंबेडकर स्मारकाच्या उभारणीतील टप्पे
- सर्वसाधारण सभेमध्ये १० फेब्रुवारी २००९ ला प्रशासकीय मंजुरी
- १९ डिसेंबर २००९ रोजी प्रथम सुधारित प्रशासकीय मंजुरी
- फेब्रुवारी २०१० मध्ये सर्वसाधारण सभेमध्ये द्वितीय सुधारित प्रशासकीय मंजुरी
- ९ मार्च २०११ मध्ये स्मारकाच्या बांधकामाची निविदा मंजूर
- २६ जून २०१३ रोजी महासभेच्या अधीन राहून सुधारित खर्चास मंजुरी
- मार्च २०१६ मध्ये डोमला मार्बल लावण्याचा निर्णय.
- जुलै २०१६ - तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी डोमला मार्बल लावण्याचा प्रस्ताव रद्द केला
- १६ आॅगस्ट २०१६ - आयुक्तांच्या निर्णयाविरोधात काँगे्रसच्या हेमांगी सोनावणे यांनी लक्षवेधी मांडली
- १४ आॅक्टोबर २०१६ - रिपाइंचे अध्यक्ष सिद्राम ओहोळ यांनी स्मारकासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला
- २९ आॅक्टोबर २०१६ -स्मारकासाठी महापौरांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली
- नोव्हेंबर २०१६ - लक्षवेधीनंतरही आयुक्तांनी मार्बलला विरोध करणारा अहवाल शासनाला सादर केला
- १५ नोव्हेंबर २०१६ - स्मारक समितीच्या बैठकीमध्ये आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय
- जानेवारी २०१७ - आरपीआयचे अध्यक्ष सिद्राम ओहोळ यांनी रामदास आठवले यांची भेट घेतली
- २५ जानेवारी २०१७ - स्मारकासाठी आंबेडकरी जनतेने आंदोलनाचा इशारा दिला
- २७ जानेवारी २०१७ - आंबेडकरी जनतेने वाशीमध्ये निदर्शने करून राज्यव्यापी आंदोलनाची सुरवात केली
- मार्च २०१७ - आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाली.
- एप्रिल ते सप्टेंबर २०१७ - आयुक्त रामास्वामी एन. यांनी स्मारकाच्या कामाला गती दिली.
- १९ आॅक्टोबर २०१७ - स्मारकाच्या अंतर्गत सजावटीच्या प्रस्तावास मंजुरी दिली

कामास झालेल्या विलंबाची कारणे
- मुख्य वास्तूच्या खालून जाणारी ६०० मीटर व्यासाची भूमिगत जलवाहिनी स्थलांतर करण्यात लागलेला वेळ
- बांधकामासाठी लागणारा रेतीचा तुटवडा
- वास्तूच्या मूळ डिझाइनमध्ये वेळोवेळी झालेले बदल
- व्हीजेटीआयकडून स्टेजिंग व शटरिंग डिझाइन मंजूर होण्यास झालेला विलंब
- ५०० मीटर उंचीचा आरसीसी डोम बांधण्याचे काम अवघड असल्याने झालेला विलंब

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar memorial is in sight; Inauguration of the first phase of the first phase, eight years of waiting has been completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.