सेनेतील मतभेद चव्हाट्यावर, पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 02:32 AM2018-01-20T02:32:10+5:302018-01-20T02:32:25+5:30

पक्षाच्या गटनेत्यांनी राजीनाम्याचे पत्र खरे असून, नवीन सदस्याचे नाव पुढील सभेत निश्चित केले जाईल, असे स्पष्ट केले आहे.

The differences in the army, on the other side of the party | सेनेतील मतभेद चव्हाट्यावर, पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

सेनेतील मतभेद चव्हाट्यावर, पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

Next

नवी मुंबई : विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेतील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. चौगुले यांनी राजीनामा दिला नसल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. पक्षाच्या गटनेत्यांनी राजीनाम्याचे पत्र खरे असून, नवीन सदस्याचे नाव पुढील सभेत निश्चित केले जाईल, असे स्पष्ट केले आहे. पालिका सभागृहात पक्षातील मतभेद उघडकीस आले असून, पक्षात फूट पडणार असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
महापौर निवडणुकीदरम्यान पालिकेवर भगवा फडकवण्याचा दावा शिवसेनेने केला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांमधील गटबाजी थांबविण्यात तात्पुरते यश मिळविले होते; परंतु निवडणूक होताच गटबाजी पुन्हा सुरू झाली आहे. ३ जानेवारीला विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी वैयक्तिक कारणास्तव स्थायी समितीचा राजीनामा दिल्याचे पत्र पक्षाचे गटनेते द्वारकानाथ भोईर यांनी महापौरांकडे दिले. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. विजय चौगुले यांनी सचिवांना पत्र देऊन मी राजीनामा दिलेला नाही. राजीनामा पत्रावरील सही माझी नसल्याचा दावा केला होता. यानंतरही त्यांचा राजीनामा मंजूर करून नवीन सदस्य निवडीसाठीचा प्रस्ताव गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडला. महासभा सुरू होताच विजय चौगुले यांचे समर्थक मनोज हळदणकर, बहादूर बिष्ठ व जगदीश गवते यांनी चौगुले यांनी राजीनामा दिलेला नसल्याने तो मंजूर करू नये, अशी मागणी केली. भविष्यात कोणीही कोणाचा राजीनामा सादर करेल व चुकीची प्रथा पडेल, यामुळे या विषयी काहीही निर्णय घेऊ नये, अशी मागणी केली.
विजय चौगुले यांचे समर्थक सभागृहात आक्रमक झाले होते; परंतु त्यांचा दावा पक्षाचे गटनेते द्वारकानाथ भोईर यांनी खोडून काढला. शिवसेना हा शिस्तबद्ध पक्ष आहे.
पक्षातील कोणताही राजीनामा पदाधिकारी प्रथम पक्षाचे नेते किंवा स्थानिक गटनेत्यांकडे सादर करतात. त्याप्रमाणे हाही राजीनामा सादर करण्यात आला आहे. याविषयी जी काही चौकशी करायची असेल ती करावी; पण प्रथम राजीनामा मंजूर करावा. नवीन सदस्याचे नाव निश्चित झालेले नाही. पुढील सभेमध्ये सदस्याचे नाव दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापौर जयवंत सुतार यांनीही चौगुले गटाचा दावा खोडून काढला. राजीनामा नियमाप्रमाणे मंजूर करण्यात आलेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, नवीन सदस्याची निवड पुढील बैठकीत होणार असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादीऐवजी
सेनेतच फूट
महापौर निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँगे्रसमध्येफूट पाडून महापौरपद मिळविण्याचा निर्धार शिवसेनेने केला होता. राष्ट्रवादीचे जवळपास १२ नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला होता. काँगे्रसच्या मदतीने महापौरपद मिळविण्यात येणार होते; परंतु महापौर निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्येच उभी फूट पडली. जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांच्या पत्नी वैजयंती भगत यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंड पुकारले होते. काँगे्रसमधील मतभेद व भाजपाने केलेल्या असहकार्यामुळे शिवसेनेचे स्वप्न धुळीस मिळाले व राष्ट्रवादीचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली नाहीच; परंतु महापौर निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये मतभेद वाढले व पक्षातच उभी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने राष्ट्रवादीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चौगुले यांची अनुपस्थिती
सर्वसाधारण सभेमध्ये चौगुले यांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाले होते; परंतु या सभेमध्ये विजय चौगुले, त्यांचे चिरंजीव ममीत चौगुले उपस्थित नव्हते. जवळपास १५ दिवस शहरात या विषयावर चर्चा सुरू असून, अद्याप त्यांनी काहीही भूमिका स्पष्ट केलेली नसून ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विजय चौगुले यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिलेला नाही. याविषयी त्यांनी स्वत: सचिव विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. राजीनाम्याचे जे पत्र सादर करण्यात आले आहे, त्यावर त्यांची सही नसल्याने तो मंजूर केला जाऊ नये.
- मनोज हळदणकर,
शिवसेना नगरसेवकशिवसेनेत पदाधिकारी नेत्यांकडे किंव गटनेत्यांकडे त्यांचा राजीनामा सादर करतात. त्याप्रमाणे चौगुले यांनी राजीनामा दिला होता. गटनेता म्हणून तो पुढील कार्यवाहीसाठी महापौरांकडे देण्यात आला. राजीनामा मंजूर करण्यात यावा. नवीन सदस्याचे नाव अद्याप निश्चित केलेले नसून पुढील सभेत ते सादर केले जाईल.
- द्वारकानाथ भोईर,
गटनेते, शिवसेनातिघांनीच घेतली बाजू
नवी मुंबई शिवसेनेत विजय चौगुले व विजय नाहटा यांचे दोन गट झाले आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार राजन विचारे यांनीही नाहटा गटाला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. यामुळे सभागृहातही विजय चौगुले यांची तिघांनीच बाजू घेतली.

Web Title: The differences in the army, on the other side of the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.