The crackdown on unauthorized actions | अनधिकृत चायनिजवर कारवाईचा धडाका

नवी मुंबई : कोपरखैरणे परिसरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या सात चायनिज सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली आहे. चायनिज सेंटरवर मद्यपींच्या पार्ट्या रंगत असून, त्यामधून वादाचे प्रकार घडत आहेत. यासंदर्भातच्या तक्रारी पोलिसांकडे येऊ लागल्याने कारवाईची मोहीम हाती घेतलीआहे.
शहरातील मोकळ्या जागा अनधिकृत चायनिज सेंटरने बळकावल्या आहेत. सद्यस्थितीला प्रत्येक विभागात साधारण आठ ते दहापेक्षा जास्त चायनिज सेंटर सुरू आहेत. या सर्वच ठिकाणी रात्रीच्या वेळी मद्यपींच्या पार्ट्या रंगत आहेत. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर या पार्ट्यांचे प्रमाण अधिकच वाढणार आहे. हॉटेल अथवा बारमध्ये मद्यपान करणाºयांपेक्षा चायनिज सेंटरवर अथवा उघड्यावर मद्यपान करणाºयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे चायनिज सेंटरच्या ठिकाणी, मद्यविक्री केंद्राबाहेर तसेच आडोशाच्या जागी मद्यपींचे अड्डे तयार झाले आहेत. परिणामी, पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. यामुळे कोपरखैरणे पोलिसांनी गतमहिन्यात उघड्यावर मद्यपान करणाºयांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत १५७ मद्यपींवर दंडात्मक कारवाई झालेली आहे. त्यांच्याकडून दंड स्वरूपात दोन लाख ६८ हजार ८०० रुपये जमा झाले आहेत. या मोहिमेनंतर कोपरखैरणे पोलिसांनी चायनिज सेंटरवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार परिसरातील सात चायनिज सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात बालाजी चित्रपटगृह परिसरातील चायनिजचाही समावेश आहे. त्या ठिकाणी यापूर्वी सिडकोने दोनदा कारवाई करूनही हे सेंटर चालवले जात होते. त्याशिवाय इतर गर्दीच्या ठिकाणी रस्त्यालगत काही चायनिज सेंटर चालवले जायचे. यामुळे वाहतुकीला खोळंबा होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होत होता. यामुळे चायनिज सेंटरवरच कारवाई करून उघड्यावर मद्यपान करणाºयांना आळा घालण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.