Confusion of opponents on the transfer of garbage question | कचरा प्रश्न हस्तांतरणावरून विरोधकांचा गोंधळ

पनवेल : पालिका क्षेत्रातील सिडको नोडमधील कचरा हस्तांतरणावरून गुरुवारी पालिकेच्या विशेष सभेत विरोधक व सत्ताधाºयांमध्ये खडाजंगी झाली. तीन महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या या विशेष सभेत दुसºया क्रमांकाच्या कचरा हस्तांतरणाच्या विषयावरून हा गोंधळ पाहावयास मिळाला. दोन वेळा सभा तहकूब करण्यात आली. शेवटी सत्ताधाºयांनी हा ठराव मतदानास ठेवून २७ विरुध्द ४६ ने मंजूर करून घेतला.
नाट्यगृहात महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर चारु शीला घरत व आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत या विशेष महासभेला दुपारी ३ वाजता सुरु वात झाली. सर्वप्रथम आयुक्तांना आलेल्या धमकीच्या पत्राचा विरोधक, सत्ताधाºयांनी निषेध केला. या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी भाजपा नगरसेवक नितीन पाटील यांनी केली. महापालिका २०१७ -१८ या आर्थिक वार्षिक मंजूर अर्थसंकल्पाचे विविध लेखाशीर्षातील रकमांचे पुनर्नियोजन करण्याबाबत या पहिल्या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर नगरसेवक संतोष शेट्टी यांनी कचरा हस्तांतरणाच्या विषयावर चर्चा सुरू के ली. या विषयावर चर्चा केल्यानंतर सत्ताधाºयांनी हा ठराव मंजुरीसाठी ठेवल्यानंतर विरोधकांनी विरोध करीत आजची सभा केवळ चर्चेसाठी असल्याचे सांगत सभागृहात व्यासपीठावर बसून सत्ताधाºयांविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी सत्ताधाºयांनी गोंधळामुळे नगरसेवकांना निलंबित करण्याची मागणी पीठासन अधिकाºयांकडे केली. पीठासन अधिकारी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी देखील गोंधळ घालणाºया नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
तिसरा विषय सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मांडला होता. रस्ते, कचरा, सेप्टीक लाइन व इतर सेवा पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरित करून अद्ययावत नागरी सुविधा देण्याच्या दृष्टीने सखोल सर्वेक्षण करण्यासाठी थर्ड पार्टी आॅडिट करण्यासाठी एजन्सी नेमण्यासंदर्भात हा विषय मांडण्यात आला होता.

कंत्राटे घेण्यासाठी घाई
सत्ताधारी कचरा प्रश्न हस्तांतरण केवळ कंत्राटे मिळविण्यासाठी करीत आहेत. पालिका क्षेत्रात आज सिडको स्थानिकांच्या घरांवर कारवाई करीत आहे त्याचे काय या गोष्टी देखील सिडकोशी निगडित असताना सत्ताधारी केवळ कंत्राटे घेण्याच्या दृष्टीने कचरा व आरोग्य सेवा घेण्यासाठी धडपडत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केला. नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, सतीश पाटील यांनी देखील ठेके घेण्यासाठी सत्ताधारी कचराप्रश्नी घाई करीत असल्याचा आरोप यावेळी केली.

आरोग्य सुविधा हस्तांतरणाची मागणी
पनवेल महानगर पालिका क्षेत्रात सर्वत्र फेरफटका मारल्यास कचराच कचरा दिसतो. आयुक्तांना पालिका स्वच्छ, सुंदर स्मार्ट करायची आहे. मात्र शहर स्वच्छ नाही तर सुंदर आणि स्मार्ट कसे होणार? असा प्रश्न भाजपा नगरसेवक संतोष शेट्टी यांनी उपस्थित करीत लवकरात लवकर कचरा व आरोग्य सुविधा हस्तांतरणाची मागणी केली.