सुपर स्मार्ट सिटीच्या दिशेने शहराची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 02:50 AM2017-12-26T02:50:41+5:302017-12-26T02:50:51+5:30

नवी मुंबई : देशातील ४०४१ शहरांमध्ये स्वच्छता अभियान सुरू आहे. नवी मुंबईने यामध्ये आघाडी घेतली असून अभियानाला चळवळीचे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे

The city's journey towards the super-smart city | सुपर स्मार्ट सिटीच्या दिशेने शहराची वाटचाल

सुपर स्मार्ट सिटीच्या दिशेने शहराची वाटचाल

Next

नवी मुंबई : देशातील ४०४१ शहरांमध्ये स्वच्छता अभियान सुरू आहे. नवी मुंबईने यामध्ये आघाडी घेतली असून अभियानाला चळवळीचे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. माझा कचरा माझी जबाबदारी व माझी नवी मुंबई माझा अभिमान ही घोषवाक्ये घेऊन स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहचविला जात आहे. नवी मुंबईला सुपर स्मार्ट सिटी बनविण्याचे व देशात अव्वल क्रमांक मिळविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविणारे मनपा आयुक्त रामास्वामी एन. यांनी लोकमत कॉफी टेबलमध्ये स्वच्छतेच्या चळवळीविषयी सविस्तर भूमिका व्यक्त केली.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान २०१७ मध्ये नवी मुंबईला देशात आठवा व राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. शहरामध्ये पायाभूत सुविधा उत्तम आहेत. अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, अत्याधुनिक डम्पिंग ग्राउंड, पाणीपुरवठा योजना, शहर स्वच्छता या सर्वच गोष्टींमध्ये आपण आघाडीवर होतो. काही प्रमाणात उणीव राहिली ती लोकसहभागामध्ये. गतवर्षीच्या त्रुटी दूर करून स्वच्छता अभियान २०१८ साठी महापालिका सज्ज झाली आहे. गतवर्षी देशातील ४३१ शहरांनी सहभाग घेतला होता. या वर्षी तब्बल ४०४१ शहरांनी सहभाग नोंदविला आहे. नवी मुंबईच देशातील सर्वात स्वच्छ व सुंदर शहर बनविण्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला हे अभियान आपले वाटले पाहिजे. स्वच्छतेची चळवळ सुरू झाली पाहिजे. यासाठीच माझा कचरा माझी जबाबदारी व माझे शहर माझा अभिमान ही दोन घोषवाक्ये तयार केली आहेत. आपल्या शहराचा बहुमान वाढविण्यासाठी व देशात प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. शहर स्वच्छ ठेवणे ही फक्त महापालिकेची जबाबदारी नाही. प्रत्येक नागरिकाला ही वैयक्तिक जबाबदारी वाटावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येकाने ओला व सुका कचरा वेगळा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याला चांगला प्रतिसाद मिळू लागला असून ७५ टक्के कचºयाचे वर्गीकरण होऊ लागले आहे. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांनी कचरा वर्गीकरणाबरोबर त्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील रस्ते, भिंती, उड्डाणपूल, सार्वजनिक प्रसाधानगृह कुठेही पाहिले तरी स्वच्छतेच्या चळवळीचीच माहिती मिळाली पाहिजे यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. भिंती रंगवल्या जात आहेत. त्यावर स्वच्छतेविषयी जनजागृती करणारे संदेश रेखाटण्यात आले आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या भिंतींवरही जाहिराती करण्यात येणार आहेत. रेल्वे स्टेशन व परिसराच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जात आहे. नागरिक व लोकप्रतिनिधींनीही या चळवळीमध्ये योगदान देण्यास सुरुवात केली असून नवी मुंबई देशातील पहिली सुपर स्मार्ट सिटी होईल, असा विश्वास रामास्वामी एन. यांनी व्यक्त केला आहे.
>लोकसहभाग महत्त्वाचा
स्वच्छता अभियानामध्ये गतवर्षी लोकसहभागामध्ये नवी मुंबई मागे राहिली. ही उणीव दूर करण्यात येत आहे. स्वच्छता अभियानाला चळवळीचे स्वरूप देण्यात आले आहे. लोकसहभाग वाढू लागला आहे. शहरवासीयांनी आपल्या घरातील कचºयाचे वर्गीकरण करावे. स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी व्हावे. कचरा व अस्वच्छता दिसल्यास त्याची माहिती प्रशासनास द्यावी. केंद्राचे पथक शहरात आल्यानंतर त्यांनी अभियानाविषयी माहिती विचारल्यास ती देता आली पाहिजे. नागरिकांनी सहभाग घेतल्यास नवी मुंबईचा देशात प्रथम क्रमांक आल्याशिवाय राहणार नाही.
>७५ टक्के
कचरा वर्गीकरण
कचरा वर्गीकरणामध्येही नवी मुंबईने आघाडी घेतली आहे. ७५ टक्के कचºयावर वर्गीकरण केले जात आहे. डम्पिंग ग्राउंडवरही ओल्या कचºयापासून खतनिर्मिती केली जात आहे. प्लॅस्टिक वेगळे केले जात आहे. ज्या कचºयावर प्रक्रिया केली जात नाही तोच डम्पिंगमध्ये टाकला जात आहे. रामनगर झोपडपट्टीमध्ये ८५ टक्के कचºयावर प्रक्रिया केली जात आहे. अनेक मोठ्या गृहनिर्माण सोसायटी व हॉटेल चालकांनीही कचºयावर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे.
>विद्यार्थ्यांचाही सहभाग : शहरातील प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छता अभियानाची माहिती दिली जात आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छतादूत बनवून त्यांना त्यांच्या घरामध्ये कचरा वर्गीकरण करावे, असे आवाहन केले जात आहे. त्यांना माहितीपत्रक देऊन जनजागृती करण्याचे आवाहन केले जात असून यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
>शाळा व उद्यानांमध्ये प्रकल्प
महापालिकेने कचºयावर प्रक्रिया करण्याची सुरुवात स्वत:पासूनच केली आहे. प्रत्येक उद्यानामध्ये व महापालिकेच्या शाळेमध्ये कचºयावर प्रक्रिया करणारा छोटा प्रकल्प सुरू केला आहे. शाळा व उद्यानातील कचरा बाहेर टाकला जाणार नाही. त्यापासून खतनिर्मिती करून त्याचा वापर उद्यानासाठीच केला जात आहे. शहरातील हॉटेल, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांनाही यासाठी आवाहन केले आहे.
>प्रत्येक प्रभागात जनजागृती
शहरातील सर्व प्रभागांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष वाहन तयार केले आहे. एलईडी स्क्रीन तयार केली आहे. प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छता अभियानाची माहिती दिली जाणार आहे. स्थानिक नगरसेवकांचे संदेशही या वेळी एलईडी स्क्रीनवर दाखविला जाणार असून नागरिकांना या चळवळीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे.
>स्वच्छता अ‍ॅपचा वापर करावा
महापालिकेने स्वच्छता अ‍ॅप सुरू केले आहे. प्रत्येक नागरिकाने त्यांच्या मोबाइलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करावे. शहरात कुठेही कचरा दिसल्यास त्याचे फोटो काढून अ‍ॅपवर टाकावे. चोवीस तासांमध्ये कचरा साफ करून तेथील फोटो टाकले जातील. यावर नागरिकांनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदविणे आवश्यक असून जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे.

Web Title: The city's journey towards the super-smart city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.