शहरात आधार नोंदणीचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 01:42 AM2018-01-16T01:42:14+5:302018-01-16T01:42:31+5:30

शासनाने सर्वच प्रक्रियांमध्ये आधारची सक्ती केल्यामुळे पुन्हा एकदा आधार नोंदणीसाठी अथवा त्यात सुधारासाठी रांगा वाढू लागल्या आहेत

City block registration | शहरात आधार नोंदणीचा बट्ट्याबोळ

शहरात आधार नोंदणीचा बट्ट्याबोळ

Next

नवी मुंबई : शासनाने सर्वच प्रक्रियांमध्ये आधारची सक्ती केल्यामुळे पुन्हा एकदा आधार नोंदणीसाठी अथवा त्यात सुधारासाठी रांगा वाढू लागल्या आहेत. परंतु शहरात नव्याने सुरू झालेली नोंदणी कार्यालये सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने बंद पडत आहेत. त्यामध्ये सर्व्हर डाउन हे रोजचेच कारण झाल्यामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
मागील काही महिन्यांपासून बँक, सिमकार्ड यासाठी शासनाने आधारची नोंदणी सक्तीची केली आहे, तर लहान मुलांनाही शाळेत प्रवेशासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा आधारच्या नोंदणीसाठी अनेकांची धावपळ सुरू झाली आहे, तर ज्यांना पूर्वी काढलेल्या आधार कार्डवर त्रुटी आढळून आल्या आहेत, त्यात बदल करून घेण्यासाठीही अनेकांनी हालचाली चालवल्या आहेत. त्यांच्याकरिता महापालिकेच्या सर्वच विभाग कार्यालयांमध्ये आधार नोंदणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. परंतु सर्वाधिक वेळ ही केंद्र बंदच असल्याचा अनुभव आधार काढण्यासाठी गेलेल्यांना येवू लागला आहे. यामुळे अनेकांची आधार नोंदणी आजची उद्यावर, तर उद्याची नोंदणी परवावर जावू लागली आहे. याचा परिणाम त्यांच्या नियोजित कामकाजावर उमटत आहे.
सोमवारी देखील शहरातील बहुतांश ठिकाणची आधार नोंदणी ठप्प झाली होती. सॉफ्टवेअरमध्ये सुरू असलेल्या सुधारामुळे सतत सर्व्हर डाउन होत असल्याचे नोंदणी कर्मचाºयांकडून नागरिकांना सांगण्यात येत आहे. परंतु यासंदर्भातची अधिक कसलीच माहिती तिथल्या कर्मचाºयांना देखील वरिष्ठांकडून देण्यात येत नसल्याने त्यांचाही गोंधळ उडत आहे. अशाच प्रकारातून नेरुळच्या नोंदणी केंद्रावर काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. सध्या ठिकठिकाणी विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशाच्या हालचाली पालकांकडून सुरू आहेत. यासाठी पाल्याचेही आधार आवश्यक असल्याने त्यांनाही नोंदणी केंद्र शोधत एका विभागातून दुसºया विभागात धाव घ्यावी लागत आहे.

शाळेत प्रवेशासाठी मुलीचे आधारकार्ड काढण्यासाठी कोपरखैरणे विभाग कार्यालयात गेलो असता, तिथले केंद्र बंद होते. यामुळे घणसोली, ऐरोली व दिघा येथील नोंदणी कार्यालयात जावून पाहणी केली असता, तिथेही मशिन बंदची कारणे सांगण्यात आली. यामुळे नियोजित कामकाजावर परिणाम होवून मनस्तापही सहन करावा लागला.
- राकेश किसन सावंत,
रहिवासी-कोपरखैरणे

Web Title: City block registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.