सिडकोची उदासीनता उलवेकरांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:44 AM2018-01-17T01:44:48+5:302018-01-17T01:45:40+5:30

सिडकोच्या उदासीन धोरणाचा फटका उलवे नोडमधील रहिवाशांना बसू लागला आहे. उघड्या गटारांमुळे अपघात होऊ लागले आहेत.

CIDCO's indifference lies on Ulwekar | सिडकोची उदासीनता उलवेकरांच्या मुळावर

सिडकोची उदासीनता उलवेकरांच्या मुळावर

Next

नामदेव मोरे
नवी मुंबई : सिडकोच्या उदासीन धोरणाचा फटका उलवे नोडमधील रहिवाशांना बसू लागला आहे. उघड्या गटारांमुळे अपघात होऊ लागले आहेत. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. प्राथमिक सुविधाही मिळत नसल्याने सिडकोकडून फसवणूक झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होऊ लागली आहे.
राज्य शासनाने ठाणे, उरण व पनवेल तालुक्यांमधील जमीन संपादित करून नवी मुंबई वसविण्याचा निर्णय घेतला. शहर वसविण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली. सिडकोने नवी मुंबई महापालिका व पनवेल तालुक्यातील नोडचा विकास केला व तिसºया टप्प्यात उरण तालुक्याला प्राधान्य दिले व उलवे नोड विकसित करण्यास सुरुवात केली. या परिसरामधील विकासाला चालना देण्यासाठी उन्नती गृहनिर्माण प्रकल्प सुरू केला व २०१२मध्ये नागरिकांना घरांचे वितरण केले. याशिवाय खासगी विकासकांनी शेकडो इमारतींचे बांधकाम सुरू केले. सद्यस्थितीमध्ये १९, २०, २१ सेक्टरचा विकास झपाट्याने सुरू आहे. अनेक ठिकाणी नागरिक राहण्यासाठीही आले आहेत; परंतु येथे राहण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये फसवणुकीची भावना निर्माण झाली आहे. सिडकोकडून मलनि:सारण वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी मलनि:सारणाचे पाणी रोडवरून वाहत असून, प्रचंड दुर्गंधी निर्माण होऊ लागली आहे. रोडवरील गटारांवर झाकणे बसविलेली नाहीत. काही दिवसांपूर्वी गरोदर महिला गटारात पडल्याची घटना घडली होती. लहान मुलगाही येथील गटारात पडला होता. नागरिकांनी तक्रारी करूनही काहीच दखल घेतली नसल्याने त्याच गटारात पडून एका व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे. पूर्ण उलवे नोडमध्ये गटारांची स्थिती गंभीर असून, अजून किती नागरिकांचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
उलवे नोडमधील रस्त्याची स्थिती गंभीर आहे. मुख्य रस्त्याची स्थिती ठीक असली, तरी अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहने चालविणे अशक्य होऊ लागले असून, वारंवार अपघात होऊ लागले आहेत. पथदिवेही बसविण्यात आलेले नाहीत. गटारांची स्थितीही अत्यंत गंभीर आहे. गटारांची साफसफाई केली जात नसल्याने पाणी रोडवरून वाहू लागले आहे. नोडमध्ये धुळीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांना श्वसनाचे आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उलवेमध्ये राहण्यासाठी गेलेले नागरिक नोकरीसाठी मुंबई, ठाणे व इतर परिसरामध्ये जात असून, त्यांच्यासाठी वाहतुकीची काहीही साधने नाहीत. एनएमएमटीची बस वेळेत येत नसून, रेल्वे प्रकल्पाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. शाळा, रुग्णालय व इतर सर्वच प्रश्न गंभीर झाले आहेत.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व्यवस्थित नाही. एनएमएमटी वेळेत येत नाही. रेल्वे प्रकल्प रखडला आहे. उलवेमधून नवी मुंबई व इतर ठिकाणी जाण्यासाठी पुरेशा सुविधाच नाहीत.
- प्रकाश गोगावले, रहिवासी, उलवे
सेक्टर २१ मधील गटारात पावसाळ्यात एक मुलगा पडला होता. काही दिवसांपूर्वी गरोदर महिलाही गटारात पडली होती. मंगळवारी गटारात पडून एकाचा मृत्यू झाला आहे. अजून किती जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे.
- मंजुळा तळे,
सामाजिक कार्यकर्त्या सेक्टर २१
उलवे नोडमधील मलनि:सारण वाहिन्यांचे काम रखडले आहे. डासांचे प्रमाण प्रचंड वाढले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
- श्रीराग कमलासनन,
उपाध्यक्ष, शेतकरी कामगार पक्ष
सिडकोने उलवे नोडमधील समस्या सोडविण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. नोडचा विकास धीम्या गतीने सुरू आहे. रोड, गटार, पथदिवे, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण व इतर सर्व सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले असून, नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
- कृष्णा पाटील, सामाजिक कार्यकर्ते
उलवे नोडमध्ये परवडणारी घरे उपलब्ध असल्याने चार वर्षांपासून अनेकांनी घरे खरेदी केली आहेत; परंतु सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना घरे बंद ठेवावी लागली आहेत. सिडको प्रशासन नागरिकांना सुविधा देण्यात अपयशी ठरले आहे. अजून किती दिवस गैरसोयी सहन करायच्या?
- राकेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: CIDCO's indifference lies on Ulwekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.