सिडकोच्या भूखंडांची कोटीची उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:44 AM2018-12-14T00:44:34+5:302018-12-14T00:44:43+5:30

दोन लाखांचा दर; तिजोरीत पडणार शंभर कोटींची भर

CIDCO flights to CIDCO plots | सिडकोच्या भूखंडांची कोटीची उड्डाणे

सिडकोच्या भूखंडांची कोटीची उड्डाणे

Next

नवी मुंबई : घणसोली येथील सिडकोच्या भूखंडांना प्रतिचौरस मीटरला चक्क दोन लाख रुपयांचा दर प्राप्त झाला आहे. सिडकोने निवासी आणि वाणिज्य वापराच्या भूखंड विक्रीसाठी काढलेल्या निविदा बुधवारी उघडण्यात आल्या. चार भूखंडांच्या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत १०० कोटींची भर पडणार आहे.

सिडकोच्या भूखंडांना विकासक आणि गुंतवणूकदारांची नेहमीच पसंती राहिली आहे, त्यामुळे सिडकोने मागील काही काळात उपलब्ध मोकळ्या भूखंडाचे टेडर काढून विकण्याचा सपाटा लावला होता. बोली पद्धतीने भूखंड विकल्याने किमतीत अनियंत्रित वाढ झाली. प्रतिचौरस मीटरला लाखोचा दर मिळू लागला. त्यामुळे भूखंडांच्या ट्रेडिंगला चालना मिळाली. त्यातून जमिनीचे दर आणखी वधारले. याचा परिणाम म्हणून सर्वसामान्यांची घरे महागली. दोन वर्षांपूर्वी घणसोली येथील भूखंडाला प्रतिचौरस मीटरला दीड लाख रुपयांचा दर मिळाला होता. आजही हा दर कायम असल्याचे बुधवारी उघडण्यात आलेल्या निविदातून उघड झाले आहे. सिडकोने घणसोली येथील सात भूखंडासाठी निविदा मागविल्या होत्या; परंतु त्यातील तीन भूखंडाच्या निविदा तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आल्या. उर्वरित चार भूखंडांसाठी प्राप्त झालेल्या निविदा बुधवारी उघडण्यात आल्या. त्यातील सेक्टर ५ येथील १०५५ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाला चक्क २ लाख ९ हजार ६५५ रुपयांचा दर मिळाला.

टिटीन्म इन्फ्राकॉनने हा भूखंड घेतला आहे. या भूखंडाची सिडकोची मूळ किंमत प्रतिचौरस मीटरला ४२,९६६ रुपये इतकी होती. सेक्टर २ येथील १७५५ चौरस मीटरच्या भूखंडाला प्रतिचौरस मीटरला १५३९९९ रुपयांचा दर मिळाला. या भूखंडाची मूळ किंमत ४८८२५ रुपये इतकी होती. त्याचप्रमाणे सेक्टर ६ येथील भूखंड क्रमांक ९ या १७५० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाला प्रतिचौरस मीटरला १४७११२ रुपयांचा दर प्राप्त झाला. तर सेक्टर ६ येथील १७५० चौरस मीटरच्या भूखंडाला १४६११४ रुपयांचा दर मिळाला. हे दोन्ही भूखंड निलसिद्धी असोसिएटने विकत घेतले आहेत. या भूखंडांची मूळ किंमत प्रतिचौरस मीटरला ४२९९९ रुपये इतकी होती.

पणन विभागाने घणसोलीतील सात भूखंडांसाठी निविदा काढल्या होत्या; परंतु यातील तीन भूखंडांची यापूर्वीच विक्री झाली होती. संबंधित भूधारक आणि सिडको यांच्यात या भूखंडांवरून वाद सुरू आहे. हा वाद मिटण्यापूर्वीच पणन विभागाने हे भूखंड पुन्हा विक्रीला काढला होता. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर या निवदा प्रक्रियेतून सदर तीन भूखंड वगळ्यात आले.

Web Title: CIDCO flights to CIDCO plots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.