नवी मुंबई : शहरात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे रहिवाशांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गुन्हेगारांना जरब बसावा यादृष्टीने शहरात सीसीटीव्ही कॅमेºयाचे जाळे विणले जाणार आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नातून येत्या काळात संपूर्ण शहरात जवळपास पंधराशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. आमदार निधीतून हे कॅमेरे बसविले जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. विधानसभेच्या बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही मतदार संघात हे कॅमेरे बसविले जाणार असल्याची माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकारांना दिली.
मागील काही महिन्यांपासून शहरात खून, दरोडे, वाहन चोरी, महिलांवरील अत्याचार अशा गंभीर गुन्ह्यात वाढ झाली आहे. सुनियोजित शहरातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनला असून त्याला प्रतिबंध घालण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. सध्या शहरात महापालिकेच्या माध्यमातून जवळपास बाराशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यात हे कॅमेरे अपुरे पडू लागले आहेत. ही बाब लक्षात घेवून आमदार मंदा म्हात्रे यांनी आमदार निधीतून आणखी कॅमेरे बसविण्याची इच्छा राज्य सरकारकडे व्यक्त केली होती. नागरिकांची सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर विशेष बाब म्हणून राज्य सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यानुसार पोलीस, महापालिका आणि सिडकोच्या सहकार्याने ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रात १४९३ नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
शाळा, महाविद्यालये, मार्केट परिसर, उद्याने, रेल्वे स्थानक परिसर, चौक, तलाव, बस डेपो व गृहनिर्माण सोसायट्यांचा परिसर आदी सार्वजनिक ठिकाणी हे कॅमेरे बसविले जाणार आहेत.
हे कॅमेरे स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत थेट पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाला जोडले जाणार आहेत. त्यामुळे गुन्हेगारांवर नजर ठेवणे सोपे होणार आहे. नागरिकांच्या विनंतीनुसार आवश्यक तेथे संवेदनशील जागेवर कॅमेरे बसविले जातील, अशी माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.