पुलाच्या सुरक्षा कठड्याला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 02:42 AM2018-06-23T02:42:09+5:302018-06-23T02:42:12+5:30

उरण फाटा येथील पुलाच्या सुरक्षा कठड्याला भगदाड पडले असून अनेक ठिकाणी तडे गेल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

Bridges | पुलाच्या सुरक्षा कठड्याला भगदाड

पुलाच्या सुरक्षा कठड्याला भगदाड

Next

- सूर्यकांत वाघमारे 
नवी मुंबई : उरण फाटा येथील पुलाच्या सुरक्षा कठड्याला भगदाड पडले असून अनेक ठिकाणी तडे गेल्याचे देखील पाहायला मिळत आहे. यामुळे पुलांवरून दररोज शेकडो वाहनांमधून ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, तर गतवर्षात याच पुलावर सर्वाधिक गंभीर अपघात घडलेले असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराकडून परिस्थितीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
सायन-पनवेल मार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. त्यात उरण फाटा येथील पुलाचाही समावेश आहे. मुंबई-पुणे मार्गावर प्रवास करणारी वाहने व जेएनपीटीकडे जाणारे कंटेनर यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी व्हायची. शिवाय अपघातांच्या घटना देखील त्याठिकाणी घडत होत्या. यामुळे त्याठिकाणी हा उड्डाणपूल उभारण्यात आलेला आहे. मात्र पुलाचे काम झाल्यापासूनच त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे प्रसंग त्याठिकाणी घडत आहेत. गतवर्षी पुलावर डांबरीकरणात झालेल्या निष्काळजीमुळे वाहनांच्या अपघाताची मालिका सुरू होती. त्यात एकाचा प्राण देखील गेला असून याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा देखील झाला होता. त्यानंतरही या पुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. काही वर्षातच या पुलाच्या सुरक्षा कठड्याला जागोजागी तडे गेले आहेत. सीबीडीकडून वाशीकडे येणाºया मार्गाच्या कठड्यावर हे तडे सर्वाधिक दिसून येत आहेत. तडे गेल्याने सुरक्षा कठड्याचे वेगवेगळे भाग झाले असून, ते देखील कोणत्याही क्षणी कोसळतील अशा स्थितीत आहेत. अशावेळी एखाद्या जड वाहनाचा अपघात होवून त्याची पुलाच्या कठड्याला धडक बसल्यास ते वाहन कठड्यासह खाली कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते.
पुलावरील त्याच मार्गाच्या उतारापूर्वी काही अंतर अगोदर सुरक्षा कठड्याचा मोठा भाग कोसळलेला आहे. कठड्याचा हा भाग मागील पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून त्याच ठिकाणी ठेवलेला आहे. यामुळे पुलावरून उतरत असलेले एखादे भरधाव वाहन त्याठिकाणी पुलावरून खाली कोसळण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. अशातच भर पावसात पुलावरून पाण्याचे पाट वाहत आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी पुलाच्या कडेला ठरावीक अंतरावर होल करण्यात आले आहेत. मात्र पाण्यासोबत वाहत आलेला मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा त्यात अडकल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे पुलावरील पाण्याचा निचरा होत नसून ते पुलावरूनच उताराच्या दिशेने वाहत आहे. यामुळे अगोदरच निसरडा असलेल्या पुलावरून वाहणाºया पाण्यामुळे भरधाव वेगाने धावणाºया वाहनांसाठी अपघातजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. पुलावरील या दुरवस्थेचे उघड दर्शन घडत असतानाही त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजिक बांधकाम विभागासह ठेकेदाराचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. परंतु त्यांचा हा निष्काळजीपणा भविष्यात दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतो. यामुळे पुलावरून ये-जा करणाºया प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
>कठड्याची उंची धोकादायक
उरण फाट्यावरील पुलासह सायन-पनवेल मार्गावरील इतरही पुलांच्या सुरक्षा कठड्याच्या उंचीमुळे देखील अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. कठड्याची उंची कमी असल्याने एखाद्या अपघातामध्ये दुचाकीस्वार अथवा जड वाहन कठड्यावरून खाली कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच भीतीने दुचाकीस्वारांना डाव्या बाजूने जाताना कठड्यापासून काहीसे लांबूनच चालावे लागत आहे. त्यामुळे मधल्या लेनमध्ये दुचाकी आल्यास पाठीमागून येणाºया दुसºया भरधाव वाहनांची त्यांना धडक बसणार नाही याची खबरदारी बाळगावी लागत आहे.उरण फाटा येथील पुलावर डांबरीकरणावेळी झालेल्या त्रुटीमुळे रस्ता गुळगुळीत होवून अपघात घडत होते. त्याचवेळी पोलिसांनी तिथल्या परिस्थितीची कल्पना सार्वजनिक बांधकाम विभागासह ठेकेदाराला दिली होती. त्यानंतरही दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने २ जुलै २०१७ रोजी पुलावर एकापाठोपाठ अनेक वाहने घसरून घडलेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झालेला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ठेकेदाराने पुलावर जागोजागी आडव्या पट्ट्या मारल्या आहेत. मात्र उर्वरित जागी गतवर्षासारखीच परिस्थिती असल्याने यंदाच्या पावसाळ्यात देखील हा पूल वाहनचालकांसाठी धोकादायक ठरू शकतो.

Web Title: Bridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.