कळंबोली शाळेजवळील बॉम्ब प्रकरण: बॉम्ब ठेवणाऱ्याचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 04:18 AM2019-06-19T04:18:36+5:302019-06-19T04:19:01+5:30

मध्यरात्री स्फोट घडवून फोडला सिमेंटचा ब्लॉक; अवशेष तपासणीसाठी प्रयोगशाळेत

Bomb Case Against Kalamboli School: Video of the bomb holder in the hands of the police | कळंबोली शाळेजवळील बॉम्ब प्रकरण: बॉम्ब ठेवणाऱ्याचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती

कळंबोली शाळेजवळील बॉम्ब प्रकरण: बॉम्ब ठेवणाऱ्याचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती

googlenewsNext

नवी मुंबई/ पनवेल : कळंबोलीमध्ये सापडलेला बॉम्बचा सोमवारी मध्यरात्री रोडपाली परिसरामध्ये स्फोट घडविण्यात आला. सिमेंटच्या बॉक्समध्ये सापडलेल्या सर्व वस्तू तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या आहेत. दरम्यान शाळेसमोर बॉम्ब ठेवणाºयाचे व्हिडीओ चित्रीकरण पोलिसांच्या हाती लागले आहे. या चित्रीकरणावरून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेसह मुंबई एटीएसचे पथक या गुन्ह्याचा तपास करत असून लवकरच आरोपी पकडला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कळंबोली सेक्टर १ येथील सुधागड एज्युकेशनच्या शाळेबाहेरील रस्त्यावर सोमवारी दुपारी बॉम्ब आढळून आला. हातगाडीवर ठेवलेल्या खोक्यामध्ये घड्याळाला वायरी जोडून त्या दुसºया एका बॉक्सला जोडलेल्या होत्या. याची माहिती मिळताच बॉम्बशोधक आणि निकामी पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहणीअंती या वस्तू वेगवेगळ्या केल्या आहेत. त्यामध्ये घड्याळाला जोडलेल्या चार वायर ज्या सिमेंटच्या ब्लॉकमध्ये अडकवण्यात आल्या होत्या, तर त्याच्या बाजूलाच एका छोट्या पेटीमध्ये खिळे व इतर धारदार धातू ठेवण्यात आलेल्या होत्या. शिवाय विद्युत प्रवाहासाठी १२ व्होल्टची बॅटरी वापरण्यात आली होती. स्फोट घडवण्यासाठी घड्याळातील बॅटरीही पुरेशी असताना, त्याला १२ व्होल्टेजची बॅटरी का जोडण्यात आली? असा प्रश्न पोलिसांना पडलेला आहे. अखेर त्या सिमेंटच्या ब्लॉकमध्ये नेमके काय आहे, हे जाणून घेण्यासाठी रोडपाली लगतच्या एकांताच्या ठिकाणी पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री १ च्या सुमारास स्फोटके वापरून हा सिमेंटचा ब्लॉक फोडला. त्यानंतर सकाळी बीडीडीएसच्या पथकाने त्या सिमेंटच्या ब्लॉकचे तुकडे एकत्र करून ते फॉरन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत. सिमेंटमध्ये कोणत्या स्फोटकाचा वापर झालेला होता का? याचा उलगडा फॉरेन्सिकच्या अहवालातून होणार आहे; परंतु हा सिमेंटचा ब्लॉक फोडण्यासाठी झालेल्या स्फोटाच्या आवाजामुळे शाळेबाहेर सापडलेल्या त्या बॉम्बचाच स्फोट झाल्याच्या अफवा परिसरात पसरल्या होत्या. दरम्यान, मंगळवारी दुपारी दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख देवेन भारती यांनी घटनास्थळाला भेट देऊन पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्यासोबत गोपनीय बैठक घेतली.

पोलिसांंच्या तपासात रविवारी रात्री ९च्या सुमारास टोपी घातलेल्या एका व्यक्तीने ती हातगाडी त्या ठिकाणी ठेवल्याचे समोर आले. हा प्रकार तिथल्या सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याद्वारे सदर व्यक्तीचा शोध सुरू आहे. चित्रीकरणामध्ये संबंधित आरोपीने डोक्यावर टोपी घातली आहे. स्वत:चा चेहरा कॅमेºयामध्ये येणार नाही याची काळजी त्याने घेतली आहे. पोलिसांनी सदर व्यक्ती ज्या रस्त्याने गेली तेथील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली असून लवकरच आरोपी हाती लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, मंगळवारी उशिरापर्यंत पोलिसांनी अधिकृतपणे काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

तपासासाठी विविध पथके
कळंबोलीमधील घटनास्थळी मंगळवारी एटीएसप्रमुख देवेन भारती यांनी भेट दिली. त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजीव कुमार व इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नवी मुंबई गुन्हे शाखेची तीन युनिट, नवी मुंबईच्या विविध पोलीस स्टेशनमधील महत्त्वाचे अधिकारी व मुंबई एटीएसचे पथकही या गुन्ह्याचा तपास करत आहेत. संशयास्पद व्यक्तीच्या व्हिडीओसह इतर सर्व बाजूने तपास सुरू करण्यात आला आहे.

तळेगावमधून पाचारण केले विशेष पथक
सुधागड शाळेजवळ सापडलेला बॉम्ब निकामी करण्यासाठी तळेगाव-पुणे येथून विशेष पथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकाने सिमेंटचा बॉक्स रोडपालीजवळील निर्जन स्थळी नेला. तेथे स्फोट घडवून तो फोडण्यात आला आहे. या बॉक्समधील सर्व वस्तू एकत्र करून फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. हा बॉक्स निर्जन स्थळी घेऊन जाण्यासाठी सीआरपीएफच्या पथकाची मदत घेतली.

स्फोटामुळे नागरिकांमध्ये घबराट
रोडपाली परिसरामध्ये मध्यरात्री स्फोट घडवून सिमेंटचा बॉक्स फोडण्यात आला. त्या आवाजामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बॉम्बविषयी अनेक तर्क-वितर्क लढविले जात होते. दिवसभर कळंबोलीसह पनवेलमध्ये त्याच विषयावर चर्चा सुरू होती.

शाळेसमोरच बॉम्ब ठेवण्याचा उद्देश काय?
कळंबोलीमधील सुधागड शाळेच्या समोर पदपथाला लागून हातगाडीवर बॉम्ब ठेवण्यात आला. शाळेच्या समोर ही वस्तू ठेवण्यामागे उद्देश काय याचाही तपास सुरू आहे. शाळेसमोर घातपात घडवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होता काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. सोमवारी शाळेचा पहिला दिवस होता. त्याच दिवशी हा प्रकार घडल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Bomb Case Against Kalamboli School: Video of the bomb holder in the hands of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.