प्रकल्पग्रस्तांचा जेएनपीटी प्रशासनाविरोधात हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 03:57 AM2018-11-17T03:57:17+5:302018-11-17T03:57:35+5:30

संघर्ष समितीच्या चर्चेनंतर आंदोलन स्थगित : जेएनपीटीचे प्रभारी अध्यक्ष नीरज बन्सल फिरकलेच नाहीत

Attack against JNPT administration of project affected people | प्रकल्पग्रस्तांचा जेएनपीटी प्रशासनाविरोधात हल्लाबोल

प्रकल्पग्रस्तांचा जेएनपीटी प्रशासनाविरोधात हल्लाबोल

Next

उरण : जेएनपीटीकडून प्रकल्पग्रस्तांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात शुक्रवारी भाजपा, मनसे वगळता सर्वपक्षीयांच्या वतीने हल्लाबोल करण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत जेएनपीटीचे प्रभारी अध्यक्ष नीरज बन्सल फिरकलेच नाहीत. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी करळफाटा येथे रस्त्यावर उतरून जेएनपीटीची नाकाबंदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती शिवसेना आमदार मनोहर भोईर यांनी दिली. सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या नेत्यांच्या बैठकीनंतरच पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचेही भोईर यांनी यावेळी सांगितले.

आमदार मनोहर भोईर, माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली करळफाटा येथे हल्लाबोल आंदोलनाला सकाळी ११ वाजता सुरु वात करण्यात आली.या सर्वपक्षीयांच्या वतीने आयोजित आंदोलनात उरण-पनवेलमधील सुमारे तीन ते चार हजार नागरिक सहभागी झाले होते. प्रकल्पग्रस्तांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेणारे जेएनपीटीचे प्रभारी चेअरमन नीरज बन्सल यांची हकालपट्टी करावी व त्या ठिकाणी मराठी आयएएस अधिकारी नेमावा, जेएनपीटीचे खासगीकरण रद्द करा, साडेबारा टक्के भूखंडाचा त्वरित ताबा मिळावा, बीएमसीटीपीएल प्रकल्पात मेडिकल झालेल्या त्या १७ मुलींना आणि मुलाखती झालेल्या ४३५ प्रकल्पग्रस्तांना त्वरित नोकरीत सामावून घ्यावे, बीएमसीटीएलमुळे बाधित झालेल्या पाणजे गावातील मच्छीमारांना नुकसान भरपाई द्यावी, डीपीडी धोरण रद्द करावे, उरण तालुका प्रकल्पग्रस्त तालुका म्हणून जाहीर करावा, वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाड्याचे नव्याने पुनर्वसन करावे, जेएनपीटीकडून देण्यात येणारा मालमत्ता कर ग्रामपंचायतींना द्यावा, १८ गावातील सगळ्या प्रकल्पग्रस्तांना मोफत शिक्षण मिळावे, परप्रांतीयांची भरती रद्द करावी, परवानगीपेक्षा जास्त कांदळवनाची कत्तल केल्याप्रकरणी बीएमसीटीपीएलवर गुन्हा दाखल करावा, जेएनपीटी सीएसआर फंड उरण तालुक्यात खर्च करावा या प्रकारच्या अनेक मागण्या या आंदोलनानिमित्त करण्यात आल्या.

कडक बंदोबस्त
आंदोलन सुरू असले तरी जेएनपीटी परिसरातील कंटेनर वाहतूक सुरळीत आणि निर्धोकपणे सुरू होती. तसेच जेएनपीटीसह चारही बंदरातील कामकाज सुरळीतपणे सुरु होते अशी माहिती जेएनपीटीचे वरिष्ठ प्रंबधक जयवंत ढवळे यांनी दिली. पोलिसांनीही डीसीपी अशोक दुधे, एसीपी विठ्ठल दामगुडे, वपोनि. चेतन काकडे, निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

Web Title: Attack against JNPT administration of project affected people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.