अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंची नवी मुंबईत उपेक्षा, शहरात एकही ट्रॅक नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 02:52 AM2019-06-27T02:52:21+5:302019-06-27T02:52:48+5:30

नियोजित शहर असल्याचा दावा करणाऱ्या नवी मुंबईमध्ये अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंची उपेक्षा सुरू आहे. सराव करण्यासाठी ४०० मीटर लांबीचा एकही ट्रॅक उपलब्ध नाही.

Athletics players ignore Navi Mumbai, there is no track in the city | अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंची नवी मुंबईत उपेक्षा, शहरात एकही ट्रॅक नाही

अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंची नवी मुंबईत उपेक्षा, शहरात एकही ट्रॅक नाही

googlenewsNext

- नामदेव मोरे
नवी मुंबई -  नियोजित शहर असल्याचा दावा करणाऱ्या नवी मुंबईमध्ये अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंची उपेक्षा सुरू आहे. सराव करण्यासाठी ४०० मीटर लांबीचा एकही ट्रॅक उपलब्ध नाही. खेळाडू जीव धोक्यात घालून पामबीचसह अंतर्गत रोडवर सराव करत असून मुंब्रा येथील ठाणे महापालिकेच्या ट्रॅकचा आधार घ्यावा लागत आहे. सिडकोसह महानगरपालिकेनेही या समस्येकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे खेळाडूंसह क्रीडाप्रेमी नाराजी व्यक्त करू लागले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातून चांगले खेळाडू घडविण्यासाठी उत्तम कामगिरी करणाºया खेळाडूंचा सर्वसाधारण सभेमध्ये सत्कार करण्याचे धोरण निश्चित केले आहे.

वर्षभर विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. सिडकोने शहर विकसित करताना प्रत्येक नोडमध्ये क्रीडांगणासाठी भूखंड राखीव ठेवले आहेत. प्रत्येक खासगी व महानगरपालिकेच्या शाळेला मैदानाचा भूखंड उपलब्ध करून दिला आहे. परंतु प्रत्यक्षात या भूखंडावर चांगली क्रीडांगणे विकसित करण्याकडे महापालिका व सिडको प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट व फुटबॉल स्टेडियम आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा गोल्फ कोर्सही उभारण्यात आला आहे. परंतु अ‍ॅथलेटिक्सचा सराव करण्यासाठी ४०० मीटर लांबीचा एकही ट्रॅक शहरात उपलब्ध नाही. यामुळे येथील धावपटूंची प्रचंड गैरसोय होत आहे. खेळाडूंना ट्रॅकसाठी मुंब्रा येथील ठाणे महानगरपालिकेच्या मैदानावर जावे लागत आहे. तेथे ट्रॅक उपलब्ध असून तेथे आठवड्यातून दोन दिवस सराव करत आहेत. या व्यतिरिक्त दुसरा पर्याय उपलब्ध नाही.

नवी मुंबईमध्ये राज्य व राष्ट्रीय स्थरावर अ‍ॅथलेटिक्समध्ये नावलौकिक मिळविणारे अनेक खेळाडू आहेत. परंतु त्यांना सरावासाठी ट्रॅक नसल्यामुळे पामबीच रोडवर व अंतर्गत रोडवर जीव धोक्यात घालून सराव करावा लागत आहे. रोडवर सराव करताना अपघात होण्याची भीती असते. परंतु दुसरा पर्याय नसल्यामुळे खेळाडू रोडवरच धावत आहेत. अनेक तरुण अ‍ॅथलेटिक्समध्ये नाव मिळविण्यासाठी परिश्रम घेत आहेत. गैरसोयींवर मात करून जिद्दीने सराव करत आहेत. नवी मुंबईमध्ये बेलापूर व ऐरोली दोन्ही विधानसभा मतदार संघामध्ये चांगले ट्रॅक असावे अशी मागणी खेळाडूंनी व क्रीडाप्रेमी नागरिकांनी केली आहे.

नवी मुंबईमध्ये अनेक गुणवान खेळाडू आहेत. सीवूड परिसरामध्येच २५ पेक्षा जास्त युवक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळवत आहेत. शहरात ट्रॅक नसल्यामुळे त्यांना जीव धोक्यात घालून पामबीच रोडवर सराव करावा लागत असून महापालिका व सिडको प्रशासनाने प्रत्येक विभागात आॅलिंपिक दर्जाचा ट्रॅक उपलब्ध करून द्यावा.
- किरण ढेबे, सामाजिक कार्यकर्ते
रेस वॉकिंग खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. चार वर्षांपासून नियमित सराव करत आहे. नवी मुंबईमध्ये ट्रॅक नसल्यामुळे पामबीच रोडवर सराव करावा लागत असून ट्रॅकसाठी आठवड्यातून दोन दिवस मुंब्रा येथे जातो.
- योगेश राठोड, खेळाडू
अ‍ॅथलेटिक्समध्ये १०० व २०० मीटर स्पर्धांवर लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रीय व राज्य स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागही घेतला आहे. नवी मुंबईमध्ये सिंथेटिक ट्रॅक नसल्यामुळे गैरसोय होत असून सरावासाठी इतर ठिकाणी जावे लागत आहे.
- जय शासन भोईर, अ‍ॅथलेटिक्स खेळाडू

दहा किलोमीटर स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले आहे.चार वर्षांपासून सराव करत आहे. पामबीच रोड व अंतर्गत रस्त्यावर सराव करावा लागत आहे. नवी मुंबईमध्ये चांगले ट्रॅक असावे अशी अपेक्षा आहे.
- प्रणव महादेव पाटील, खेळाडू

अ‍ॅथलेटिक्समध्ये २०० मीटर अंतराच्या स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले आहे. चार वर्षांपासून सराव करत आहे. सरावासाठी चांगल्या ट्रॅकची आवश्यकता असून महापालिका व सिडको प्रशासनाने ही सुविधा उपलब्ध करून द्यावी.
- सिद्धेश घाडगे, खेळाडू

दहा किलोमीटर अंतराच्या स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले आहे. खेळामध्ये चांगली कामगिरी करावी अशी इच्छा असून त्यासाठी सराव करत आहे. सरावासाठी प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
- श्रीकांत खटके, खेळाडू

Web Title: Athletics players ignore Navi Mumbai, there is no track in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.