... and a briefly retired encounter, the four-wheeler was caught and chased | ...अन् थोडक्यात टळला एन्काउंटर, पाठलाग करून पकडले चौघांना

नवी मुंबई : बडोदा बँक लुटणारी टोळी पकडण्याकामी पोलिसांना अनेक ठिकाणी जीवावर उदार व्हावे लागले. त्यापैकी गुन्ह्यातील पहिल्या चौघांना अटक करतेवेळी बैंगणवाडी येथे पोलिसांना पाच किलोमीटर गुन्हेगारांचा फिल्मी स्टाइलने पाठलाग करावा लागल्याने त्या ठिकाणी एन्काउंटरचा प्रसंग निर्माण झाला होता.
सुमारे अंदाजे २५ फूट लांब भुयार खोदून बडोदा बँक लुटल्याची जुईनगर येथील घटना देशात दुसरी व राज्यात पहिली होती. यामुळे सदर गुन्ह्याचा उलगडा करून टोळीला अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले होते. बँक लुटणारे सराईत गुन्हेगार असल्याने त्यांनी मागे कसलाही पुरावा ठेवलेला नव्हता. अखेर भुयारामध्ये सापडलेले वर्तमानपत्र पोलिसांना महत्त्वाचा सुगावा ठरले. हे वृत्तपत्र उत्तर प्रदेशचे असल्याने पोलिसांना ऐन वेळी तपासाची दिशा बदलावी लागली. या दरम्यान, भुयार खोदण्यासाठी दुकान भाड्याने घेतल्यानंतर त्यावर लावलेल्या साईन बोर्डवर लिहिलेला मोबाइल नंबर पोलिसांनी तपासला असता, ठरावीक दिवसांसाठीच तो वापरून बंद झाल्याचेही समजले. त्यामधून मालेगावच्या राजेंद्र वाघ याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे एक पथक त्याच्यावर पाळत ठेवून असताना, त्यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला होता. दरम्यान, वाघच्या संपर्कातील मुंबईतील संशयिताची माहिती लागली. त्याआधारे एक पथक चेंबुरमध्ये सापळा रचून असतानाच, गुन्ह्या वेळी बडोदा बँकेच्या आवारात थांबलेल्या संशयित कारची माहिती हाती लागली. तीच कार चेंबुरमध्ये असून संशयित व्यक्तीही त्यातून फिरत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार वाशी टोलनाक्यासह चेंबुर परिसरात पोलिसांनी सापळा रचला होता. या वेळी चेंबुरमधील पथकाच्या नजरेसमोरून संशयित कार गेल्याने त्यांनीही खासगी कारमधून पाठलाग सुरू केला; परंतु गुन्हेगारांना याची चाहूल लागल्याने तेही पोलिसांना चकमा देण्याच्या प्रयत्नात वेगाने कार पळवू लागले.
नजरेस पडलेले गुन्हेगार हातून निसटतील, या भीतीने जीवावर उदार होऊन पोलिसांनी सुमारे पाच कि.मी.चा पाठलाग करून गुन्हेगारांच्या कारसमोर त्यांची कार लावली. यामुळे आपल्याला पोलिसांनी घेरल्याचे लक्षात येताच गुन्हेगारांनी कारचे दरवाजे लॉक करून स्वत:ला कोंडून घेतले; परंतु त्यांच्या हालचाली प्रतिहल्ल्याच्या दिसल्याने पोलिसांना बचावासाठी त्यांच्या दिशेने बंदूक रोखावी लागली.
या प्रकारामुळे काही मिनिटांसाठी बैंगणवाडीत भररस्त्यात थरार नाट्य सुरू होते. मात्र, आपली सुटका अशक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर गुन्हेगारांनी स्वत:कडील शस्त्रे खाली टाकल्यानंतर पोलिसांनी झडप टाकून त्यांना ताब्यात घेतले. त्यामध्ये हाजीद शेख, श्रावण हेगडे उर्फ सतीश कदम, मोमीन खान व अंजन महांतो यांचा समावेश होता. त्यापैकी हाजीद हाच गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले. झडतीमध्ये त्यांच्याकडे रामपुरी चाकूसह इतरही धारदार शस्त्रे आढळून आली.