कोपरीतील अ‍ॅम्युझमेंट पार्कची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 02:52 AM2018-05-21T02:52:11+5:302018-05-21T02:52:11+5:30

सुटीच्या दिवसात मुलांची गैरसोय : वर्षाच्या आतच खेळण्यांची मोडतोड

Amusement Park's mishap in Kopri | कोपरीतील अ‍ॅम्युझमेंट पार्कची दुरवस्था

कोपरीतील अ‍ॅम्युझमेंट पार्कची दुरवस्था

Next

नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने कोपरी येथे उभारण्यात आलेल्या अ‍ॅम्युझमेंट पार्कची उद्घाटनानंतर अवघ्या वर्षभरात दयनीय अवस्था झाली आहे. अनेक खेळणी तुटली असून काही खेळण्यांचे लोखंडी भाग तुटून लटकत आहेत. यामुळे सदर उद्यान खेळासाठी बंद असून ऐन सुटीच्या दिवसात परिसरातील मुलांची गैरसोय होत आहे.
पालिकेच्या वतीने कोपरी येथे आकर्षक अ‍ॅम्युझमेंट पार्क उभारण्यात आले आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये त्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. मात्र उद्घाटनापासून हे उद्यान स्थानिकांच्या गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे उद्यानाच्या कामाच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. सुरवातीला उद्यानात पाण्याची, तसेच विजेची समस्या भेडसावत होती. अशातच काही महिन्यांपासून उद्यानातील लहान मुलांची खेळणी तुटल्याने त्यांचा वापर बंद करण्यात आलेला आहे, तर विद्युत दिव्याची कामे अद्यापही सुरूच आहेत. यामुळे परिसरात उद्यान असूनही लहान मुलांसह नागरिकांना ते उपयोगी ठरत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक दिवसांपासून नादुरुस्त स्थितीतली ही खेळणी कधी दुरुस्त होतील याकडे मुलांचे लक्ष लागले आहे. तर नादुरुस्त खेळण्यावर एखादे लहान मूल चढल्यास त्याला दुखापत होण्याची दाट शक्यता आहे.
नवी मुंबई महापालिका हे उद्यानांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. प्रत्येक विभागात एकापेक्षा जास्त चांगली उद्याने व पार्क पालिकेने उभारले आहेत. मात्र त्याची योग्य निगा राखली जात नसल्याने साहित्य मोडकळीस येत आहेत. उन्हाळ्याची सुटी म्हटले की लहान मुलांची मौजमजा असते. परंतु कोपरी परिसरातील मुलांची यंदाचीही सुटी उद्यानातील गैरसोयीमुळे निरुपयोगी ठरत आहे. उद्यानाच्या उद्घाटनानंतर अवघ्या काहीच महिन्यात उद्यानाची दयनीय अवस्था असल्याने तिथल्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर अद्यापही बरीच कामे सुरू असल्याने पालिकेने वर्षभरापूर्वीच अपूर्ण उद्यानाच्या उद्घाटनाचा घाट का घातला असाही प्रश्न उपस्थित होत आहे. हीच परिस्थिती शहरातल्या इतरही ठिकाणच्या उद्यानांची आहे.

Web Title: Amusement Park's mishap in Kopri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.