ऐरोलीत पूर्ववैमनस्यातून एकावर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 05:28 AM2019-07-16T05:28:02+5:302019-07-16T05:28:09+5:30

ऐरोली येथे रस्त्याने पाठलाग करीत गोळीबार केल्याची घटना रविवारी रात्री घडली.

Airlift premeditated firing on one | ऐरोलीत पूर्ववैमनस्यातून एकावर गोळीबार

ऐरोलीत पूर्ववैमनस्यातून एकावर गोळीबार

googlenewsNext

नवी मुंबई : ऐरोली येथे रस्त्याने पाठलाग करीत गोळीबार केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी रबाळे पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून संशयिताचा शोध घेतला जात आहे. या गोळीबारात आदित्य क्षीरसागर हा थोडक्यात बचावला असून, त्याचा विरोधक अमित भोगले याने हा हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऐरोली सेक्टर ९ येथील रस्त्यावर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्ग बारमध्ये (गरम मसाला) आदित्य क्षीरसागर हा सागर जाधव व इतर दोन साथीदारांसह जेवण करण्यासाठी बसला होता. काही वेळानंतर एक पुरुष व दोन महिलादेखील येवून त्यांच्यासोबत बसल्या. त्यानंतर काही वेळातच बारच्या वरच्या मजल्यावरून सात ते आठ जण त्याठिकाणी आले. त्यांना पाहताच आदित्यने बारच्या मागच्या दरवाजाने बाहेर अंधारात पळ काढला. त्यामुळे हल्लेखोरांनी आदित्यचा पाठलाग करत गोळ्या झाडण्यास सुरवात केली. या हल्ल्यातून बचावासाठी त्याने रहिवासी सोसायटीच्या भिंतीवरून आतमध्ये उडी मारल्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला.
या वेळी भिंतीवरून उडी मारताना क्षीरसागर हा त्या ठिकाणी उभ्या असलेल्या कारवर पडल्याने त्याला दुखापत झाली असून कारचेही नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलीसठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनकर मोहिते, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष निकम यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. चौकशीत क्षीरसागरवर पाच राउंड गोळ्या झाडण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. त्यापैकी सुरवातीचे दोन राउंडनंतर शेवटच्या तीन राउंडला ट्रिगर दाबूनही गोळीबार झाला नाही. त्यानुसार घटनास्थळावरून दोन पुंगळ्या जप्त केल्या आहेत. भररस्त्यात झालेल्या या गोळीबाराच्या आवाजामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
>ठाण्याच्या नगरसेवकाची चौकशी
या गोळीबार प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांकडून कसून तपासाला सुरूवात करण्यात आली आहे. यामध्ये इतर कोणाचे हात गुंतले आहेत का याचाही उलगडा केला जाणार आहे. याकरिता भोगले व क्षीरसागर यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे. त्यानुसार ठाण्याचे सेनेचे नगरसेवक संजय भोईर यांची सुमारे चार तासाहून अधिक वेळ रबाळे पोलिसांकडून चौकशी सुरू होती. मात्र त्याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली.
>टोळीचा शोध सुरू
क्षीरसागर याचा मुलुंडच्या एलबीएस मार्गावरील बांधकामाच्या साइटवरून अमित भोगले याच्यासोबत वाद सुरू आहे. गेल्यावर्षी त्यांच्यात या बांधकामाच्या ठिकाणी वाद उफाळून आला होता. तो एका माथाडी कामगार संघटनेचा पदाधिकारी देखील आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून गोळीबार करणाऱ्या टोळीचा शोध सुरू असल्याचे सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांनी सांगितले.

Web Title: Airlift premeditated firing on one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.