ठळक मुद्देअमृतसरमधील गँगस्टर सराज संधू याने थेट फेसबुकवरच आपल्या हत्येची कबुली दिली आहेगँगस्टर सराज संधू याने फेसबूकवर आपणच हिंदू संघर्ष सेनाचा नेता विपन शर्मा याची हत्या केल्याचं सांगितलं आहे30 ऑक्टोबर रोजी भरदिवसा विपन शर्मा यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती

चंदिगड - अमृतसरमधील गँगस्टर सराज संधू याने थेट फेसबुकवरच आपल्या हत्येची कबुली दिली आहे. दरम्यान गँगस्टरने थेट सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपला गुन्हा अशाप्रकारे कबुल करत एकाप्रकारे पंजाब पोलिसांनाच आव्हान दिलं आहे. गँगस्टरची दिलेली ही कबुली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, गँगस्टर सराज संधू याने फेसबूकवर आपणच हिंदू संघर्ष सेनाचा नेता विपन शर्मा याची हत्या केल्याचं सांगितलं आहे. इतकंच नाही, तर वॉण्टेड असणारा गँगस्टर सराज संधू याने पोलिसांना या हत्येचा धर्माशी कोणताही संबंध जोडला जाऊ नये असं सांगितलं आहे. विपन शर्मा यांच्या हत्येप्रकरणी सराज संधू वॉण्टेड आहे. 

विपन शर्मा यांनी 30 ऑक्टोबर रोजी हत्या झाली होती, आणि तेव्हापासूनच सराज संधू फरार आहे. सराज संधूच्या फेसबुक पोस्टमुळे खडबडून जागे झालेल्या पंजाब पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. 'ही पोस्ट स्वत: सराज संधूने टाकली होती, की अन्य कोणी केली होती याची माहिती आम्ही मिळवत आहोत, तो कदाचित काही लोकांच्या संपर्कात असावा', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

आपण केलेली हत्या योग्य असल्याचं सांगताना सराज संधू याने आपण बदला घेण्यासाठीच ही हत्या केल्याचा दावा केला आहे. आपल्या मित्राच्या वडिलांची हत्या करण्याचा कटात विपन शर्मा यांचा मुख्य हात होता असाही दावा सराज संधूने केला आहे.  गेल्याच आठवड्यात पंजाब पोलिसांनी सराज संधूची आई सुखराज कौर यांना अमृतसरमधील सुलतानविंद येथून अटक केली आहे. आपला मुलगा गँगस्टर सराज संधू आणि इतर गुन्हेगारांना आश्रय दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

सीसीटीव्हीमधून सराज संधू याने विपन शर्मा यांच्यावर सात गोळ्या झाडून हत्या केल्याचं निष्पन्न झालं होतं. यावेळी सराज संधूसोबत असणा-या साथीदाराने गोळीबार केला होता. त्याने आपला चेहरा झाकून ठेवला होता. 30 ऑक्टोबर रोजी भरदिवसा विपन शर्मा यांची हत्या करण्यात आली होती. दोन्ही हल्लेखोरांनी दाढी ठेवल्याने तसंच पगडी घातली असल्याने या हत्येमागे कोणी शीख आहेत का यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला होता. 

गेल्या दोन वर्षात अनेक खलिस्तान समर्थकांनी पंजाबमध्ये पुन्हा सक्रिय होण्याच्या प्रयत्नात हिंदू नेत्यांवर हल्ले केले आहेत. हिंदू संघर्ष सेनाचे जिल्हाध्यक्ष असणा-या विपन शर्मा यांची बाटला रोडवरील भारत नगर परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येत किमान चारजण सामील असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. गेल्या आठवड्यात पोलिसांनी दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त केला होता. यावेळी पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला होता.