यशवंत सिन्हा यांचा भाजपाला रामराम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:26 AM2018-04-22T00:26:18+5:302018-04-22T00:26:18+5:30

पक्षीय राजकारणातून संन्यास : लोकशाहीच्या रक्षणासाठी लढणार

Yashwant Sinha's BJP Ram Ram! | यशवंत सिन्हा यांचा भाजपाला रामराम!

यशवंत सिन्हा यांचा भाजपाला रामराम!

Next

पाटना : अटलबिहार वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती सांभाळणारे आणि मोदी सरकार सत्तारूढ झाल्यापासून भाजपाविरोधात सातत्याने टीकेचा सूर आवळणारे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी अखेर भाजपालाच राम राम ठोकला. त्यांनी पक्षीय राजकारण कायमचे सोडून लोकशाहीच्या रक्षणासाठी काम करत राहणार असल्याची घोषणाही केली.
पाटना येथे झालेल्या राष्ट्रीय मंचच्या एका सभेत सिन्हा यांनी ही घोषणा केली. यावेळी भाजपचे बंडखोर नेते खासदार शत्रुघ्न सिन्हा, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी, आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग, आशुतोष आदी हजर होते.
राष्ट्रीय पातळीवर नरेंंद्र मोदी यांचा उदय होण्याआधी यशवंत सिन्हा भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये गणले जात असत. १९९८ ते २००४ या कालखंडात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात सिन्हा यांनी परराष्ट्रमंत्री आणि अर्थमंत्री ही महत्त्वाची पदे सांभाळली होती.

गैरव्यवस्थापनामुळे नोटाटंचाई
देशातील सध्याच्या चलन तुटवड्याबाबत सिन्हा यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या आर्थिक गैरव्यवस्थापनाला लक्ष्य केले. सिन्हा म्हणाले की, अर्थमंत्री आणि सरकारकडून सांगितल्या जाणाऱ्या साºया सबबी चुकीच्या आहेत. नोटा छपाईचा संबंध थेट देशाच्या वाढच्या जीडीपीसोबत असतो. याबाबत सरकार काहीही स्पष्टीकरण देऊ शकलेले नाही. पैसे काढून घेण्याचे प्रमाण अचानक खूप वाढल्याने चलन तुटवडा निर्माण झाला, हा युक्तीवाद कुणालाही न पटणारा आहे.

मोदींवर टीका
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारनेच संसदेचे कामकाज न होऊ दिले नाही. अर्थ संकल्पीय अधिवेशन पूर्णपणे वाया जात असल्याची सरकारला अजिबात फिकीर नव्हती. विरोधकांची मते जाणून घेण्यासाठी या काळात पंतप्रधानांनी एकही बैठक घेतली नाही. नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय मंचचे पुढे राजकीय पक्षात रुपांतर करण्याचा आमचा उद्देश नाही. परंतु देशातील सध्याच्या परिस्थितीवर जर आपण बोललो नाही तर येणाºया पिढ्या यासाठी आपल्यालाच जबाबदार धरतील.

नेत्याला जाब विचारा; खासदारांना खुले पत्र
मागच्या आठवड्यात यशवंत सिन्हा यांनी भाजपाच्या सर्व खासदारांना खुले पत्र लिहीले होते. त्यात सिन्हा म्हणाले होते की, २०१४ च्या निवडणुकीमध्ये आपण यूपीए सरकारला जोरदार विरोध केला आणि आपले सरकार निवडून दिले. परंतु या सरकारने आपला पुरता भ्रमनिरास केला आहे. आता
जागे व्हा, आगामी निवडणुकीच्या आधी आपल्या नेत्याला जाब विचारा. तरच काही सुधारणा करणे शक्य होईल.

मोदी विदेशात फिरतात; इथे पोलीस पीडितेला विचारतात कितने आदमी थे!
यावेळी काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की, देशात बलात्कार होत आहेत आणि पोलीस पीडित मुलीला विचारत आहेत, ‘कितने आदमी थे!’. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौºयावरही त्यांनी निशाणा साधला. त्या म्हणाल्या, आज देशात अशी (मुलींवर अत्याचार होत आहेत) स्थिती आहे आणि अशी स्थिती असतानाच पंतप्रधानांना परदेश दौºयांवर जायला आवडते. महिला सन्मान काय असतो हे त्यांना माहित नाही. त्यांनी बायकोला सोडून दिलेले आहे. केवळ लोकप्रियतेसाठी त्यांनी आपल्या वयोवृद्ध आईला रांगेत उभे केले होते. स्वत:ला मुलगी नसल्याने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’शी त्यांचा काय संबंध असणार?

Web Title: Yashwant Sinha's BJP Ram Ram!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.