नवी मुंबई : मारहाण करणार्‍या तरुणाविरोधात तक्रार करायला गेलेल्या महिलेची तक्रार न घेताच तिला परत पाठवल्याचा प्रकार तुर्भे गाव येथील महिलेसोबत घडला. ही महिला घरात एकटीच असताना त्याच परिसरातील तरुणाने घरात घुसून तिला मारहाण केली होती. याची तक्रार करण्यासाठी महिला एपीएमसी पोलीस ठाण्यात गेली असता त्या तरुणाला समजावतो असे सांगून पोलिसांनी पीडित महिलेलाच तिथून पिटाळून लावले. पोलिसांच्या या भूमिकेमुळे भयभीत झालेल्या या कुटुंबाने शहर सोडण्याची तयारी केली आहे.
तुर्भे गावात पती व दोन मुलांसह राहणार्‍या २५ वर्षीय महिलेला शनिवारी सकाळी तिच्याच घरात मारहाण झाली. पती मार्केटमध्ये कामाला गेल्यानंतर सकाळी ६ च्या सुमारास ही महिला मुलांसह घरात एकटीच होती. यावेळी परिचयाच्याच तरुणाने घरात घुसून तिला मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. काही महिन्यांपूर्वी तुर्भे कॉलनीत हा तरुण त्यांच्या शेजारीच राहायला होता. त्यावेळीही या माथेफिरू तरुणाने तिला त्रास दिल्याने त्यांनी घर बदलले होते. अखेर शनिवारी सकाळी पुन्हा त्याने महिलेसोबत गैरवर्तन केले. रात्री पती घरी आल्यानंतर महिलेने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. परंतु हा तरुण एका माथाडी नेत्याच्या कार्यालयात कामाला असल्याने त्याच्यावर कारवाई होईल की नाही अशी त्यांना शंका होती. त्यानंतरही धाडस करून रात्री ११.३०च्या सुमारास आपल्या भावासह ही महिला एपीएमसी पोलीस ठाण्यात गेली. यावेळी तिथे उपस्थित पोलिसांनी तिच्याकडून तरुणाची संपूर्ण माहिती घेतली, मात्र तक्रार दाखल न करताच महिलेला घरी पाठवले. त्या मुलाला आम्ही समजावतो, तुम्ही निश्चिंत राहा असे मोघम आश्वासन यावेळी पोलिसांकडून मिळाल्याचे पीडित महिलेच्या पतीने सांगितले. त्यामुळे पोलिसांवर विश्वास ठेवायचा कसा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. अखेर तरुणाकडून सततच्या होणार्‍या त्रासाला कंटाळून त्यांनी शहर सोडण्याचाही निर्णय घेतला आहे.(प्रतिनिधी)