सासरी शौचालय नसल्याने महिलेने मागितला घटस्फोट, न्यायालयाने केला अर्ज मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 05:10 PM2017-08-19T17:10:44+5:302017-08-19T17:25:48+5:30

सासरी शौचालय नसल्याने संतप्त झालेल्या महिलेने कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता

Woman files for divorce as in laws house did not have toilet | सासरी शौचालय नसल्याने महिलेने मागितला घटस्फोट, न्यायालयाने केला अर्ज मंजूर

सासरी शौचालय नसल्याने महिलेने मागितला घटस्फोट, न्यायालयाने केला अर्ज मंजूर

Next

मेवाड, दि. 19 - सध्या सगळीकडे खिलाडी अक्षय कुमारच्या 'टॉयलेट - एक प्रेम कथा' चित्रपटाची चर्चा सुरु आहे. घरात शौचालय नसल्याने महिलेने पुकारलेला लढा या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे. दरम्यान अशीच एक घटना रिअल आयुष्यातही पाहायला मिळत आहे. राजस्थानमधील कौटुंबिक न्यायालयात सासरी शौचालय नसल्याने एका महिलेने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने महिलेचा अर्ज स्विकारला आहे. मेवाड येथील भिलवाडा येथील ही घटना आहे. 

सासरी शौचालय नसल्याने संतप्त झालेल्या महिलेने कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता, जो न्यायालयाने स्विकारला आहे. एकीकडे चित्रपटगृहांमध्ये अक्षय कुमारचा 'टॉयलेट - एक प्रेम कथा' रिलीज झाला असून, सामाजिक विषयावर भाष्य करत असताना, या घटनेमुळे परिस्थिती किती गंभीर आहे हे समोर येत आहे. 

महिलेने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केल्यानंतर न्यायाधीशांनी गंभीरता लक्षात घेत हे अत्यंत क्रूर असल्याचं सांगत अर्ज स्विकारला आहे. महिलेचे वकिल राजेश यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'मी सासरच्यांनी घरी शौचालय असावं यासाठी वारंवार विनंती करत होती. पण कोणीही माझं काहीच ऐकलं नाही. याउलट मला मारहाण केली', असा दावा महिलेने केला आहे. 

महाराष्ट्रात महिलेने शौचालयासाठी मंगळसूत्र ठेवलं होतं गहाण
घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी ग्रामीण भागातल्या एका महिलेनं स्वतःचं मंगळसूत्र विकल्याची घटना वाशिम जिल्ह्यात घडली होती. यानंतर पंकजा मुंडे यांनी स्व:खर्चानं मंगळसूत्र देऊन या महिलेच्या क्रांतीकारी पावलाचं कौतुक केलं होतं. संगीता आव्हाळे असं या महिलेचं नाव आहे. वाशिम जिल्ह्याच्या मंगरूळपीर तालुक्यातल्या सायखेडा गावात त्या राहतात.

आपल्या सासरी शौचालय नसल्यानं संगीताच्या कुटुंबीयांना शौचासाठी उघड्यावर जावं लागायचं. त्यातच मुलगी देखील 11 वर्षांची झाल्यानं संगीताची कुचंबणा आणखी वाढली. तिनं शौचालय बांधण्याचं ठरवलं. एवढंच नाही तर पैसे कमी पडले म्हणून तिनं चक्क आपलं सौभाग्याचं लेणं म्हणजे मंगळसूत्र विकून टाकलं होतं. पंकजा मुंडे यांनीही संगीताच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली होती. एवढंच नव्हे पंकजा मुंडेंनी स्वखर्चाने संगीताला नवं मंगळसूत्र बनवून दिलं होतं. यानंतर संगीता आव्हाळे यांची जिल्हा प्रशासनाच्या स्वच्छता अभियानाच्या ब्रँड अँम्बॅसिडर म्हणून निवड करण्यात आली होती.

Web Title: Woman files for divorce as in laws house did not have toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.