Will there be a cricket match in India or Pakistan? Sushma Swaraj made clear | भारत - पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने होणार की नाही ? सुषमा स्वराज यांनी केलं स्पष्ट

नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट संबंध सुधारण्यासंबंधीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सीमारेषेपलीकडून वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन होत असल्या कारणाने भारत - पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका होण्यासाठी सध्या योग्य परिस्थिती नसल्याचं सांगितलं जात आहे. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी परराष्ट्रमंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत दोन्ही देशांमधील क्रिकेट मालिकेवरुन केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. परराष्ट्र सचिव एस जयशंकरदेखील या बैठकीला उपस्थित होते. सरकारने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर भारत - पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका होण्याची शक्यता थोडी कमीच आहे. 

केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली असता त्यांना दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध सुधारण्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांनी मानवतेच्या आधारे महिला आणि ज्येष्ठ कैद्यांना सोडण्याचं सुचवलं. त्यांनी स्पष्ट केलं की, सीमारेषेपलीकडून वारंवार होत असलेल्या फायरिंगमुळे क्रिकेट मालिका सुरु करण्यासाठी सध्या अनुकूल परिस्थिती नाहीये. सुषमा स्वराज यांनी या बैठकीत 2017 मध्ये सीमारेषेपलीकडून फायरिंगच्या 800 घटना घडल्याच्या घटना घडल्याचा उल्लेखही यावेळी केला. मात्र 2016 मध्ये हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला ठार करण्यात आल्यानंतर जम्मू काश्मीरमधील हिंसेच्या घटनांमध्ये घट झाल्याचा दावा केला जात आहे. कुलभूषण जाधव प्रकरणामुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. 

दोन्ही देशांमधील तणाव पाहता सध्या क्रिकेट सामने खेळले जात नाहीयेत. पाकिस्तानने दोन वेळा भारताचा दौरा केला आहे, मात्र भारताने अद्यापही पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. याआधी सामान्य परिस्थितीतही दोन्ही देशांमध्ये किमान एकतरी क्रिकेट मालिका खेळली जात असे. मात्र पाकिस्तानने आपली आडमुठी भूमिका कायम ठेवल्याने भारताने त्यांच्यासोबत क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. सुषमा स्वराज यांच्या भुमिकेनंतर भारत - पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका होण्याची शक्यता फार कमी आहे.