मोदी जाणार शिवसेनाप्रमुखांच्या वाटेने ? भावनिक साद हाच पर्याय  

By संदीप प्रधान | Published: December 1, 2017 02:13 AM2017-12-01T02:13:57+5:302017-12-01T02:14:25+5:30

गुजरातमध्ये ‘विकास’ वेडा झाला आणि धार्मिक धृवीकरणाच्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश येत नसल्याने प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदारांना भावनिक साद घालतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

 Will Modi go by Shivsena chief? Emotional Sad Hatch Options | मोदी जाणार शिवसेनाप्रमुखांच्या वाटेने ? भावनिक साद हाच पर्याय  

मोदी जाणार शिवसेनाप्रमुखांच्या वाटेने ? भावनिक साद हाच पर्याय  

googlenewsNext

वलसाड : गुजरातमध्ये ‘विकास’ वेडा झाला आणि धार्मिक धृवीकरणाच्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश येत नसल्याने प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदारांना भावनिक साद घालतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भावनिक राजकारणाच्या मळवलेल्या वाटेवरूनच या वेळी मोदींना प्रथमच वाटचाल करावी लागेल, असे दिसत आहे.
गेली विधानसभा निवडणूक व नंतरची लोकसभा निवडणूक मोदींनी विकासाचा मुद्दा पुढे करून लढवली. मात्र या वेळी आधीच गुजरातमध्ये विकास वेडा झाल्याचा बोभाटा झाला. त्यामुळे धार्मिक फुटीचे कार्ड चालवून पाहण्याचा प्रयत्न भाजपाने केला. ‘गुजरातमधील भाजपाची सत्ता गेली तर काँग्रेसचे अहमद पटेल मुख्यमंत्री होतील’, ‘अहमदाबादमध्ये चक्की और चाकू चलेंगे’ असे मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर पसरवले. अहमदाबाद रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी देणारा निनावी फोन आल्याची आवई उठवली. एक मुलगी एका धार्मिक स्थळाजवळून जात असताना भेदरल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केले. मात्र हे कार्ड चालले नाही. त्यामुळे आता मोदींकडे भावनिक कार्ड खेळणे बाकी आहे. तुम्ही भाजपाला पराभूत केल्यास पंतप्रधानपदाची संधी गुजराती माणसाला कधीच मिळणार नाही. माझे राजकारण संपेल, गुजरातचा विकास थांबेल, अशी भाषा अखेरच्या टप्प्यात मोदी वापरतील. मोदी भावूक होतील. अश्रू ढाळतील, अशी शक्यता आहे. यापूर्वी मतदारांना साष्टांग दंडवत घालून किंवा उद्धव-आदित्यला सांभाळा, असे भावनिक आवाहन बाळासाहेब ठाकरे खेळले होते. मोदींवर अशी वेळ आली आहे.
अमित शहा व काही नेते आम्हाला १४५ ते १५० जागा मिळतील, असा दावा करीत असले तरी भाजपा ११० ते १२० दरम्यान रोखली जाईल, असे जाणकारांना वाटते. गेल्या वेळपेक्षा कमी जागा मिळाल्यास तो भाजपा व मोदींचा नैतिक पराभव असेल. विकासाचा मुद्दा आता भाजपाऐवजी काँग्रेस बोलत आहे. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर, जिग्नेश मेवाणी या नेत्यांनी आव्हान उभे केले आहे. दीर्घकाळानंतर पुन्हा सोशल इंजिनीअरिंगमध्ये काँग्रेस यशस्वी झाल्याचे दिसत आहे. महागडे शिक्षण, कंत्राटी, कमी पगाराच्या नोकºया, नोटाबंदी, जीएसटीचा बसलेला फटका अशा समस्यांमुळे मतदारांत असंतोष आहे. भाजपा नको, पण काँग्रेस, पटेल, ठाकूर, मेवाणी हेही नकोत, अशी मतदारांची मानसिकता असेल तर मतदानाची टक्केवारी कमी होईल. मात्र २०१४ मध्ये काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी मतदारांनी जसे भाजपाला मत दिले, तसे काँग्रेसला यंदा झाल्यास, भाजपाची अवस्था ‘दे माय धरणी ठाय’, अशी होईल. या दोन्ही शक्यतांमुळेच मोदी भावनिक साद घालू शकतील.

गुजरातमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून लोकांमध्ये नाराजी आहे हे वास्तव आहे. मात्र अखेरच्या टप्प्यात मोदी कोणती खेळी करतात त्यावर बरेच अवलंबून आहे. अन्यथा ईव्हीएम मशीनमध्ये निकाल अनुकूल करण्याची ताकद आहेच.
- नचिकेत देसाई, ज्येष्ठ पत्रकार

गुजरातच्या विकासाच्या मॉडेलला प्रथमच आव्हान दिले गेले आहे. मोदींच्या त्याच त्याच भाषणांना लोक आता विटले असून सभांची गर्दी ओसरली आहे. लोकांच्या मनातील रागाला काँग्रेस मतांमध्ये कसे परावर्तित करते हाच मुख्य मुद्दा आहे.
- प्रा. हेमंतकुमार शाह,
स्तंभलेखक व पदाधिकारी, नागरिक स्वातंत्र्य संघटन

राजकीय किंमत चुकविण्यास आम्ही तयार - नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच्या यूपीए सरकारवर टीका करताना गुरुवारी येथे स्पष्ट केले की, भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणतीही राजकीय
किंमत चुकविण्यास आपण तयार आहोत.

आपणास अशी व्यवस्था
तयार करायची आहे, जी भ्रष्टाचारमुक्त व लोककेंद्रित
असेल, असेही मोदी यांनी सांगितले.

मोदी म्हणाले की, २०१४ मध्ये आम्ही सत्तेत आलो तेव्हा अर्थव्यवस्था, राजकोषिय व्यवस्था आणि बँकिंग सिस्टीम बिघडलेली होती. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. नोटाबंदीनंतरचा सकारात्मक बदल आपण पाहत आहात.


गुजराती व्यक्तीवर ३७ हजारांचे कर्ज - राहुल गांधी

राहुल गांधी यांनी गुुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. आपल्या आर्थिक गैरव्यवस्थापन आणि प्रसिद्धीची किंमत गुजरातच्या जनतेने का मोजावी, असा सवाल त्यांनी मोदी यांना केला.
त्यांनी म्हटले आहे की, मोदी यांना दुसरा प्रश्न आहे की, १९९५ मध्ये गुजरातवर ९,१८३ कोटींचे कर्ज होते. २०१७ मध्ये २ लाख ४१ हजार कोटींचे कर्ज आहे. म्हणजेच प्रत्येक गुजराती व्यक्तीवर ३७ हजारांचे कर्ज आहे.
तुमच्या गैरव्यवस्थापनाची किंमत जनतेने का मोजावी? राहुल गांधी गुरुवारी गुजरातमध्ये होते. बोटाड जिल्ह्यातील स्वामीनारायण मंदिरात ते गेले होते.

सट्टा बाजारात भाजपाला ११० जागा

जैसलमेर : विधानसभा निवडणुका गुजरातमध्ये असल्या तरी राजस्थानातील सट्टाबाजार सध्या तेजीत आहे. देशात कोठेही निवडणुका असो फलौदी आणि बिकानेरचा सट्टाबाजार जोरात असतो. येथील सट्टेबाजांच्या अंदाजानुसार भाजपाला १०७ ते ११० जागा मिळतील. म्हणजेच त्यांच्या जागा काही प्रमाणात कमी होतील. पण, सत्ता भाजपाचीच येईल. काँग्रेसला ७० ते ७२ जागा मिळतील असा अंदाज आहे. यंदा भाजपासाठी ५० पैसे तर, काँग्रेससाठी २ रुपयांचा रेट सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांनंतर कल बदलून जाईल, असाही अंदाज बांधला जात आहे.
गुजरातमध्ये २०१२ साली १८२ पैकी भाजपाला ११५ जागा तर, काँग्रेसला ६८ जागा मिळाल्या होत्या. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सट्टेबाजारात रक्कम वाढेल, असे सांगितले जाते. (वृत्तसंस्था)

केडर तुटल्याचा फटका
गेली २२ वर्षे गुजरातमध्ये सत्ता नसल्याने काँग्रेसचे केडर तुटले आहे. अनेक कार्यकर्ते एक तर भाजपात गेले वा त्यांनी राजकारण सोडले. राहुल गांधी यांना प्रतिसाद मिळू लागल्याने काँग्रेसमध्ये धुगधुगी आली आहे. मात्र काँग्रेससमोर आव्हान आहे भाजपाच्या केडरचे. त्यामुळे काँग्रेसची सुप्त लाट नसेल तर केडरच्या पाठिंब्याखेरीज गुजरातमध्ये सत्तापरिवर्तन कठीण आहे. जागावाटप व बंडखोरी यामुळे ४० ते ४२ जागा ‘खराब’ झाल्याचे काँग्रेसचीच मंडळी खासगीत सांगतात.

Web Title:  Will Modi go by Shivsena chief? Emotional Sad Hatch Options

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.