मी 'लेफ्टनंट' गौरी प्रसाद महाडिक... पती बॉर्डरवर शहीद झाला, ती बनली सैन्यात अधिकारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 12:18 PM2019-02-25T12:18:30+5:302019-02-25T12:18:38+5:30

गौरी महाडिक सध्या चेन्नईतील ऑफिसर ट्रेनिंग अॅकॅडमी येथे प्रशिक्षण घेत आहेत. या प्रशिक्षण केंद्रातून आपलं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 2020 मध्ये त्या लेफ्टनंट गौरी प्रसाद महाडिक होणार आहेत

Widow of Major from Mumbai to join Army, calls it tribute to him | मी 'लेफ्टनंट' गौरी प्रसाद महाडिक... पती बॉर्डरवर शहीद झाला, ती बनली सैन्यात अधिकारी!

मी 'लेफ्टनंट' गौरी प्रसाद महाडिक... पती बॉर्डरवर शहीद झाला, ती बनली सैन्यात अधिकारी!

Next

मुंबई - अरुणाचल प्रदेशमधील इंडो-चायना बॉर्डरवर तवांग येथे 2017 मध्ये मेजर प्रसाद महाडिक शहीद झाले होते. आपल्या पतीला गमावल्यानंतरही त्यांच्या पत्नीने सैन्यात भरती होण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. मी सैन्यात दाखल होतेय, हीच माझ्या पतीला श्रद्धांजली असल्याचे गौरी महाडिक यांनी म्हटलंय. तसेच, मी लवकरच सैन्यात रुजू होत असून त्यानंतर, मी लेफ्टनंट गौरी प्रसाद महाडिक असेल, असेही त्यांनी अभिमानाने सांगितले. गौरी यांनी सैन्यातील लेफ्टनंट पदासाठीच्या दोन परीक्षा पास केल्या आहेत.

गौरी महाडिक सध्या चेन्नईतील ऑफिसर ट्रेनिंग अॅकॅडमी येथे प्रशिक्षण घेत आहेत. या प्रशिक्षण केंद्रातून आपलं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 2020 मध्ये त्या लेफ्टनंट गौरी प्रसाद महाडिक होणार आहेत. विरार येथील रहिवासी असलेल्या 32 वर्षीय गौरी महाडिक यांचे आणि प्रसाद महाडिक यांच्याशी 2015 मध्ये लग्न झाले होते. मात्र, अरुणाचल प्रदेशच्या इंडो-चायना बॉर्डवरील तवांग येथे एका चकमकीत मेजर प्रसाद महाडिक यांना वीरमरण आले होते. आपल्या पतीला वीरमरण प्राप्त झाल्यानंतरही गौरी यांनी सैन्यात भरती होण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. सध्या चेन्नईतील ऑफिसर ट्रेनिंग अॅकॅडमी येथून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या लेफ्टनंटपदी रुजू होतील. 

सर्व्हीस सिलेक्शन बोर्डतर्फे 30 नोव्हेबर ते 4 डिसेंबर 2018 या कालावधीत घेण्यात आलेल्या परीक्षेत गौरी यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यासाठी 16 जणांनी परीक्षा दिली होती. त्यामध्ये गौरी यांनी टॉप करुन सैन्यात भरती होण्याच्या दिशेने आपले पहिले पाऊल टाकले. सध्या त्या 49 आठवड्यांच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. एप्रिल महिन्यात त्यांच्या प्रशिक्षण कालावधीला सुरुवात होणार असून पुढील वर्षी म्हणजेच मार्च 2020 मध्ये गौरी यांचे प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. 

दरम्यान, सैन्यातील शहीद जवानांच्या पत्नीसाठी एसएसबी बोर्डाकडून ही परीक्षा घेण्यात येते. त्यासाठी जवळपास 16 परीक्षार्थी पत्नींची निवड करण्यात येत असून बंगळुरू, भोपाळ आणि अलाहाबाद येथे ही परीक्षा घेण्यात आल्याचे गौरी यांनी सांगितले. त्यानंतर, भोपाळ येथे तोंडी परीक्षाही घेण्यात आल्याचे गौरी यांनी सांगितले. तसेच भोपाळमधील परीक्षेवेळी मला जो चेस्ट नंबर (28) मिळाला होता, तोच चेस्ट नंबर माझ्या शहीद पतींना मिळाला होता. हा माझ्या आयुष्यातील खूप मोठा योगायोग असल्याचेही गौरी यांनी सांगितले. 

गौरी यांनी सीएस म्हणजेच कंपनी सेक्रेटरीचा कोर्स पूर्ण केला असून त्या एलएलबी पदवीधर आहेत. सन 2015 मध्ये त्यांनी प्रसाद महाडिक यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर, कोर्टात वकिली करत होत्या. मात्र, 2017 मध्ये पतीच्या निधनानंतर गौरी यांनी कोर्टातील आपला वकिला व्यवसाय बंद करून भारतीय सैन्य भरतीच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती. त्यानुसार, गौरी यांचे स्वप्न सत्यात उतरत असून लवकरच त्या लेफ्टनंट गौरी प्रसाद महाडिक बनणार आहेत. आपल्या शहीद पतीला हीच माझ्याकडून श्रद्धांजली असेल, असेही त्यांनी अभिमानाने म्हटले. देशासाठी शहीद झालेल्या जवानाच्या पत्नीचे हे बोल देशातील लक्षावधी मुलींना प्रेरणा देणार आहेत. तर वीरमाता आणि वीरपत्नींचे धैर्य वाढवणार आहेत. 

Web Title: Widow of Major from Mumbai to join Army, calls it tribute to him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.