भाजपासाठी का उघडलं नाही दक्षिणद्वार?, कसे जिंकले केसीआर?

By महेश गलांडे | Published: December 12, 2018 08:39 PM2018-12-12T20:39:54+5:302018-12-12T20:46:02+5:30

दक्षिण भारतात कमळ फुलविण्याचं ध्येय बाळगून तेलंगणात 119 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या भाजपाला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे.

Why is not the open door for BJP in telangana, how did KCR win? | भाजपासाठी का उघडलं नाही दक्षिणद्वार?, कसे जिंकले केसीआर?

भाजपासाठी का उघडलं नाही दक्षिणद्वार?, कसे जिंकले केसीआर?

मुंबई - तेलंगणा विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण भारतात कमळ फुलविण्याचं ध्येय बाळगून तेलंगणात 119 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या भाजपाला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. तर चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने 88 जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला. विशेष म्हणजे गतवर्षीच्या निवडणुकीत भाजपाला तेलंगणात 5 जागांवर यश मिळाले होते. पण, यंदा हातच्या 4 जागाही भाजपाने गमावल्या आहेत. त्यामुळे भाजपासाठी उघडलंच नाही दक्षिणद्वार अन् पुन्हा एकदा जिंकले केसीआर, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

*मुदतपूर्व निवडणुका

तेलंगणात मुदतीआधीच सरकार बरखास्त करून एकहाती सत्ता स्थापन करण्याचं केसीआर यांच स्वप्न सत्यात उतरलं आहे. तीन महिने आधीच प्रचाराची संधी मिळाल्याने टीआरएसच्या उमेदवारांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच घरोघरी गाठीभेटी सुरू केल्या होत्या. त्यामुळेच विरोधकांनी आश्चर्यकारकरित्या एकजूट बांधून केलेल्या आघाडीचा म्हणावा तसा परिणाम झाला नाही. मुदतपूर्व सरकार बरखास्त करण्याचा निर्णय केसीआर यांच्या पथ्थ्यावरच पडला आहे. तेलंगणात 119 जागांसाठी निवडणूक झाली. यापैकी 105 उमेदवारांची घोषणा केसीआर यांनी 6 सप्टेंबर रोजी सरकार बरखास्त केल्यानंतर काही मिनिटांतच केली होती. त्यामुळे मुदतपूर्व निवडणुका अन् त्याच प्लॅनिंग केसीआर यांच्या राजकारणाचा एक डाव होता, हेही सिद्ध झालं आहे.  

*भाषिक मुद्द्यांवर प्रचार 

चंद्रशेखर राव यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर निशाणा साधत 'तेलंगणा गौरव' हा मुद्दा जिवंत ठेवला. तेलुगू भाषिक लोकांमध्ये जय तेलंगणाचा नारा देत भाषिक आणि प्रांतिक मुद्द्यांवरुन लोकांना आपलसं केले. विशेष म्हणजे तेलंगणा निवडणुकीतील प्रचारामध्येही राव यांनी भाषिक मुद्द्यांवर जोर दिला. आपल्या प्रचाराच्या एका व्हिडीओ जाहिरातीमध्येही 1975 सालची देशातील स्थिती दर्शवली आहे. त्यामध्ये एक पंजाबी पुरुष तेलुगू तरुणाला हैदराबादचे नाव सांगताच, ओये मद्रासी असं हिनवत असल्याचं दिसत. तर 1995 मध्येही तीच परिस्थिती दिसून येते. 1995 मध्ये तोच तरुण मध्यमवयस्क झालेला असतो, त्या तरुणाला य वयस्कर गुजराती कुठं चालला असा प्रश्न करतो. त्यावर, हैदराबाद म्हणताच, आंध्रा तेलुगू असं म्हणून हिणवतो. पण, सध्याच्या म्हणजेच 2018 मध्ये दिल्लीच्या त्याच स्टेशनवर एक तरुण 1975 सालच्या त्या तरुणाला (जो आता वृद्ध असतो) त्याला कुठं जाणार विचारतो. तो वृद्ध हैदराबाद सांगताच तो तरुण खुश होतो. वा हैदराबाद, तेलंगणा... केसीआर... ग्रेट म्हणून कौतूक करतो. त्यावेळी तो वृद्ध आपल्या मिशांवर ताव मारत, तेलंगणा गौरवचा अनुभव घेतो, अशी ही जाहिरात केसीआर यांच्या प्रचारात महत्त्वाची ठरली आहे. 

*भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा फेल

तेलंगणातील हैदराबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्या सभा झाल्या. मात्र, या सभांमध्ये विकासाचा कुठलाही मुद्दा न घेता, भाजपाने हिंदुत्वाचा अंजेडा थोपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुळातच भाषिक अन् प्रांतिक अस्मिता जपणाऱ्या तेलुगू लोकांना हा मुद्दा पचनी पडला नाही. कारण, योगी आदित्यनाथ यांनीही आपल्या भाषणात हैदराबाद अन् करिमनगरचे नाव बदलण्याची घोषणा केली. मात्र, हैदराबाद ही तेलंगणाची ओळख बनली आहे. एकप्रकारे ही ओळखच पुसून टाकण्याचं योगी यांनी आव्हान दिलं. त्यामुळे हैदराबादी अन् तेलुगू लोकांच्या ते पचनी पडलं नाही. कारण, हैदराबाद नावात जरी हैदर असला तरी तेलुगू लोकांना हैदराबादचं हवयं, हेही या निकालातून स्पष्ट झालंय. कारण, मोदी, शहा अन् योगींनी सभा घेतलेल्या सर्वच मतदारसंघात भाजपाचा मोठा पराभव झाला आहे. केवळ गोशामहलमधून राजासिंग यांचा विजय झाला आहे.

*वचन अन् विकास  

स्वतंत्र तेलंगणाचा नारा देत केसीआर यांनी 1983 मध्ये तेलुगू देसम पक्षात प्रवेश केला. त्यानंतर, 1985 साली त्यांनी सिद्दीपेट मतदारसंघातून ते आमदार बनले. तर, एनटी रामाराव यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली. त्यानंतर तेलंगणा गौरव अन् जय तेलंगणाचा नारा देत 2001 मध्ये स्वतंत्र तेलंगणाचा मुद्दा पुन्हा उचलत केसीआर यांनी तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना केली. या मुद्दयासोबत जाऊन 2004 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी केली. मात्र, स्वतंत्र तेलंगणाबाबत काँग्रेस गंभीर नसल्याचं सांगत केसीआर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर स्वतंत्र तेलंगणासाठी 11 दिवस आमरण उपोषणही केले. जनसहभाग आणि वाढता दबाव लक्षात घेऊन काँग्रेस सरकारने अखेर स्वतंत्र तेलंगणा राज्याला संमती दिला. त्यामुळे जनतेला दिलेलं वचन केसीआर यांनी पूर्ण केलं. विकासाच्या बाबतीतही राव यांनी तेलंगणाता महत्वपूर्ण पाऊल उचलत धाडसी निर्णय घेतले आहेत. केवळ 4 वर्षात तेलंगणा अन् हैदराबादच्या विकासासाठी त्यांनी अनेक प्रकल्प हाती घेतली आहे. तसेच लोक-कल्याणकारी योजनाही राबविल्या आहेत. त्यामुळे राव यांच्यावर लोकांनी यंदाही विश्वास दाखवला.

* एमआयएमची छुपी साथ अन् टीडीपीचा काँग्रेसला हाथ

तेलंगणातील विधानसभा निवडणुकांमध्ये एमआयएम पक्षाला 7 जागांवर विजय मिळाला आहे. मुस्लीमबहुल भागात ओवैसींच्या एमआयएमला घवघवीत यश मिळाले. मात्र, एमआयएमने इतरत्र आपले उमेदवार उभे केले नाहीत. त्यामुळे केसीआर यांना एकप्रकारे त्याचा फायदाच झाला आहे. ओवैसींनी आपल्या प्रचारसभांमध्येही तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू, काँग्रेस अन् भाजपावर टीका केली. मात्र, सत्ताधारी केसीआर यांच्याबाबत बोलताना ओवैसी बंधुंनी संयम बाळगला. तर, काँग्रेस, भाजप अन् चंद्राबाबू यांनीही केसीआर यांनाच टार्गेट केलं. अर्थातच तेलुगू अस्मिता जपलेल्या तेलंगणाच्या महानायकाला सर्वच दिग्गजांनी लक्ष्य केल्यानं तेलंगणात केवळ केसीआर अन् केसीआर अशीच चर्चा सुरू राहिली. त्यामुळे तेलंगणात अब की बार केसीआर आणि जय तेलंगणा म्हणत लोकांनी चंद्रशेखर यांनाच तेलंगणाचे राव बनविण्याचा निर्णय घेतल्याचं दिसलं आहे. 

दरम्यान, तेलंगणा राज्याच्या द्वितीय पंचवार्षिक निवडणुकीत टीआरएस पक्षाला 88 जागांवर विजय मिळाला. 119 जागांच्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमतासाठी 60 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे टीआरएसचे हे यश ऐतिहासिक विजय ठरला आहे. तर भाजपाचा केवळ एक उमेदवार निवडून आल्यानं भाजपचा मोठा पराभव झाला आहे. काँग्रेसलाही केवळ 21 जागा जिंकता आल्या आहेत.
 

Web Title: Why is not the open door for BJP in telangana, how did KCR win?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.