दिल्लीला धुरक्याचा विळखा का पडतो? फटाके आणि गाड्यांपेक्षा धोकादायक काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 11:13 AM2017-11-08T11:13:36+5:302017-11-08T11:41:42+5:30

कालपासून राजधानी नवी दिल्लीमध्ये धुरके (स्मोग) चा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. धूर आणि धुके एकमेकांमध्ये मिसळले की या प्रकारचे धुरके तयार होते. राजधानी क्षेत्रामध्ये गाड्यांमुळे होणारे प्रदूषण यासाठी कारणीभूत असल्याचे वरवर वाटत असले तरी याची मुख्य कारणे वेगळीच आहेत.

Why Delhi suffers from hazardous smog? | दिल्लीला धुरक्याचा विळखा का पडतो? फटाके आणि गाड्यांपेक्षा धोकादायक काय आहे?

दिल्लीला धुरक्याचा विळखा का पडतो? फटाके आणि गाड्यांपेक्षा धोकादायक काय आहे?

googlenewsNext
ठळक मुद्देदिल्लीमध्ये 66 लाख 48 हजार 73 नोंदणी झालेल्या दुचाकी आहेत. आयआयटी कानपूरच्या अभ्यासानुसार वाहनांच्या प्रदुषणात 46 टक्के वाटा ट्रक्सद्वारे होणाऱ्या प्रदुषणाचा आहे तर दुचाकीचा वाटा 33 टक्के इतका आहे. दिल्लीमधील कचराभूमींमध्ये अनेक आठवडे आग धूमसत असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. काही ठिकाणी कचरा अपघाताने किंवा मुद्दामही पेटवला जातो

नवी दिल्ली- कालपासून राजधानी नवी दिल्लीमध्ये धुरके (स्मोग) चा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. धूर आणि धुके एकमेकांमध्ये मिसळले की या प्रकारचे धुरके तयार होते. राजधानी क्षेत्रामध्ये गाड्यांमुळे होणारे प्रदूषण यासाठी कारणीभूत असल्याचे वरवर वाटत असले तरी याची मुख्य कारणे वेगळीच आहेत.

1) दिल्ली राजधानी क्षेत्र हे राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब या राज्यांनी वेढलेले आहे. या राज्यांमध्ये नवे पिक घेण्यासाठी शेतजमिनीवरच आधीच्या पिकाचे पाचट आणि इतर तण जाळले जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात धूर होतो आणि परिणामी सर्वच क्षेत्राची हवा प्रदुषित होते. मागील वर्षी दिल्ली हायकोर्टाने या राज्यांना ही शेतजमिनीवर गवत, पाचट जाळण्याची पद्धती बंद करावी अशा अत्यंत कडक शब्दांमध्ये सूचना दिल्या होत्या. त्याचे पालन न झाल्यास संबंधित राज्याच्या मुख्य सचिवाला जबाबदार धरू असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. यावरुनच दिल्लीची हवा प्रदुषित करण्यामध्ये याचा किती मोठा हात आहे ते समजते. दिल्लीमधील वाहने प्रदुषणास हातभार लावतात हे खरे असले तरी त्यापेक्षाही जास्त प्रदुषण हे शेतजमिनीवर गवत जाळण्यामुळे होते. या शेतकऱ्यांना गवत, पाचट जाळण्यापासून परावृत्त केले तरच दिल्लीच्या हवेमध्ये सुधारणा होऊ शकते.

2) राजधानी दिल्लीचे क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहे. रस्ते, मेट्रो तसेच गृहप्रकल्पांची येथे सतत बांधणी सुरु असते. या प्रकल्पांमध्ये खोदकाम तसेच जमिनीखाली होणारे बांधकाम (बोगदे काढणे) यांचाही समावेश आहे. त्यामुळे सतत बारिक धूळ निर्माण होऊन नव्या प्रदुषकांची निर्मिती होत राहते.


3) जमिनी जाळणे, बांधकाम यांच्याबरोबर प्रदुषणात भर घालणारे एक कारण म्हणजे कचराभूमी (डम्पिंग ग्राऊंड). दिल्ली शहरामध्ये दररोज लाखो टन कचरा तयार होतो. त्यात औद्योगिक, घरगुती, हिरवा, वैद्यकीय, जैविक, रासायनिक कचऱ्याचा समावेश असतो. या कचऱ्यातून अनेक प्रकारचे वायू बाहेर पडतात. तसेच रसायनांमुळे कचऱ्याचे तापमान वाढून आग लागण्याचा धोका संभवतो. कचऱ्यामध्ये मिथेन वायू तयार होतो आणि तो ज्वलनशील असल्यामुळे कचरा पेटतो. दिल्लीमधील कचराभूमींमध्ये अनेक आठवडे आग धूमसत असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. काही ठिकाणी कचरा अपघाताने किंवा मुद्दामही पेटवला जातो. त्यामुळे शहराच्या सीमावर्ती प्रदेशात असणाऱ्या कचराभूमींमधून सतत प्रदुषणाची निर्मिती होत राहते.




4) दिल्ली परिक्षेत्राची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. लाखो लोक दररोज शहराच्या या भागातून दुसऱ्या भागात कामासाठी प्रवास करतात. मात्र मुंबईप्रमाणे दिल्लीमधील लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत नाहीत. किंबहुना मुंबईसारखी सार्वजनिक वाहतूक विकसित नसल्यामुळे तेथे लोक चारचाकी व दुचाकीचा वापर मोठ्या संख्येने करतात. यामुळे प्रदुषणात भर पडते. जानेवारी 2017 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये 66 लाख 48 हजार 73 नोंदणी झालेल्या दुचाकी आहेत. आयआयटी कानपूरच्या अभ्यासानुसार वाहनांच्या प्रदुषणात 46 टक्के वाटा ट्रक्सद्वारे होणाऱ्या प्रदुषणाचा आहे तर दुचाकीचा वाटा 33 टक्के इतका आहे. ऑड इव्हन या योजनेत दुचाकींना सूट देण्यात आली होती. यासर्व कारणांमुळे सध्या फटाक्यांचे प्रदुषण नसले तरीही दिल्लीमध्ये इतर अनेक कारणे मोठ्या प्रमाणात प्रदूषणात भर घालत आहेत.

Web Title: Why Delhi suffers from hazardous smog?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत